क्रिकेटमुळे पॉप कल्चरमध्ये अमर झालेला दुर्लक्षित नट!

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 25 d ago
जावेद खान अमरोही
जावेद खान अमरोही

 

अमेरिकेमध्ये एक रोचक संकल्पना त्यांच्या सिनेमाविषयक लिखाणात वारंवार वापरला जातो. 'That Guy'. सिनेमा बघून सिनेमागृहातून बाहेर आल्यावर तुमच्यावर त्यातल्या एखाद्या नटाचा प्रचंड प्रभाव पडला असतो पण तुम्हाला त्याचं नाव माहित नसतं. अशा नटांसाठी ढोबळमानाने ही संकल्पना वापरली जाते. थोडक्यात त्यांचा चेहरा हीच त्यांची ओळख असते. असे नट बहुतेक करून छोट्या भूमिकांमध्ये असतात आणि त्यांच्या भूमिकांची लांबी जास्त नसते. पण पडद्यावर मिळालेल्या मर्यादित वेळेतच ते आपल्या अभिनयक्षमतेच्या बळावर प्रेक्षकांवर आपली छाप सोडतात. त्यांचं नाव पण प्रेक्षकांना माहित नसणं ही या प्रक्रियेतली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट. 

 
आपल्याकडेही अशी बरीच उदाहरणं आहेत. हरीश पटेल, दीपक डोब्रियाल, इशरत अली, रझ्झाक खान अशी कितीतरी नावं घेता येईल. असे कितीतरी कलाकारांच्या सिनेमातील योगदानाचं मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यासमोर नाव लावून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची गरज आहे. असाच एक चेहरा होता जो अतिशय प्रामाणिकपणे दिग्दर्शकाने दिलेली जबाबदारी पार पाडायचा. भूमिकांची लांबी -रुंदी बघत बसायचा नाही. किंबहुना असं करणं त्याची मजबुरी होती. कारण सर्वशक्तिमान मार्केट त्याला तशी संधी देत पण नव्हतं. हा नट म्हणजे जावेद खान अमरोही.
 
जावेद खान अमरोही यांचं नुकतंच निधन झालं आणि वर्तमानपत्राच्या चौथ्या  पानावर कोपऱ्यात ज्या बातम्या आल्या त्यात आलेला त्यांचा फोटो बघून अनेकांच्या लक्षात आलं, 'अरे आपण याचे सिनेमे बघतच लहानाचे मोठे झालो आहोत.' 'कुली नंबर वन' मध्ये आपल्या मुलीला बघायला आलेल्या गोविंदाला हिडीस फिडीस करून हाकलून देणारा हाच होता . 'हम है राही प्यार के' मधला सह्रदय चोर हाच होता. 'नुक्कड 'मधला सलूनवालाही हाच होता. 'अंदाज अपना अपना'मध्ये रविनाला पटवण्यासाठी हा चक्क अमर आणि प्रेमचा सहकारी होता. 'लाडला'मध्ये मशीनमध्ये ज्या कामगाराचा हात जातो तो हाच तर होता! 
 
थियेटरमधल्या अनेक दिग्गजांना आपला सिनेमा दुय्यम वागणूक देतो असं एक निरीक्षण आहे .जावेद खान हे त्यातलेच. पण भूमिका छोट्या मोठ्या असल्या तरी अनेक मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या चित्रपटांशी जावेद खान यांचा संबंध आलेला आहे. 'अंदाज अपना अपना ' मध्ये पण ते होते. अमर -प्रेम ज्या रविनाला पटवायला निघाले आहेत तिला पटवायला अनेक 'सजीले नौजवान' पण निघाले आहेत. जावेद खान हा त्यांच्यापैकीच एक असतो. पण जेव्हा प्रेक्षकांना कळत की हा 'आनंद अकेला' पण रेसमध्ये आहे तेव्हा जाम खदखदून हसू येतं. 
 
त्यांच्या कितीतरी भूमिका आठवायला लागतात. पण आता उशीर झालाय. फार उशीर. आपण इतक्या लोकांना माहित होतो आणि इतक्या लोकांच्या आठवणींचा भाग होतो हे जावेद खान यांना जिवंतपणी कळलं असतं तर शारीरिक आणि मानसिक वेदनांमध्ये पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं असतं. मात्र आता ते होणे नाही. 
 
भारताने इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडलाच 'नॅट वेस्ट ट्रॉफी'च्या फायनलमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून पराभूत करण ही आपल्या क्रिकेटच्या इतिहासातली एक अतिमहत्त्वाची घटना. या मॅचशी अनेक दंतकथा, सुरसकथा (गांगुलीचं शर्ट काढून साहेबांच्या लॉर्ड्सवर सेलिब्रेशन करण हे त्यातलंच एक) जोडल्या गेल्या आहेत. त्याच वेळेस भारतात न्यूज चॅनल्सही वयात आली होती. आपल्या न्यूजचॅनल्सवरील बातमीला सपोर्ट म्हणून ग्राफिक्सचा, चित्रपटातल्या एखाद्या शॉटचा वापर होत होता. या ऐतिहासिक विजयानंतर बऱ्याचश्या न्यूज चॅनलवर 'लगान'मधल्या भुवनच्या संघाच्या ब्रिटिशांवरच्या विजयानंतर 'हम जीत गये' म्हणून भोंग्यातून ओरडणाऱ्या नटाची छबी झळकू लागली होती. हा नट होता जावेद खान! 
 
या सिनेमात राम सिंग असं या पात्राचं नाव होतं. 'लगान' मध्ये छोट्या छोट्या पात्रांचे ट्रॅक्स पण कसले मस्त आखले आहेत याचं उदाहरण म्हणजे राम सिंगचं पात्र. हा राम सिंग खेळ बघायला जमलेल्या लोकांना आपल्या कॉमेंट्रीमधून खेळ समजावून सांगत असतो. हा राम सिंग तसा ब्रिटिशांचा हुजऱ्या. पण गोऱ्यांकडून सतत अवहेलना झेलून झेलून त्याच्यातला आत्मसमान जागा होतो आणि तो आपल्या मर्यादित कुवतीने गोऱ्यांविरुद्ध बंड पुकारतो. पहिले दबून दबून बोलणारा राम सिंग चक्क भुवनच्या संघाच्या बाजूने बोलायला लागतो. भुवनने विजयी फटका मारल्यावर काही क्षण सगळीकडे सुन्न शांतता पसरते. आपण मॅच जिंकलो आहोत याची जाणीव सगळ्यात पहिले होते ती या राम सिंगला. आणि मग हा एकेकाळचा पाठीचा कणा नसलेला ब्रिटिशांचा हुजऱ्या भोंग्यातून 'हम जीत गये ' असा कल्ला करतो. 
 
जावेद खान नावाच्या जातिवंत नटाला असे अभिनयाचा कस लावणारे रोल फारसे कधी मिळालेच नाहीत. क्वचित मिळाले तरी त्याचं नाव विचारण्याची तसदी कुणी घेतली नाही. क्रीडाविषयक चित्रपट जावेद खान यांच्यासाठी लकी असावेत. कारण त्यांची नोंद घेतली जावी असा दुसरा रोल म्हणजे 'चक दे इंडिया' मधला सुखलालचा. 'चक दे इंडिया'मध्ये सुखलाल हा महिला हॉकीसाठी जे ग्राउंड वापरलं जातं त्याचा केयरटेकर असतो .महिला हॉकी संघाच्या एकूणच प्रतिबिंब मैदानावर आणि सुखलालच्या मनस्थितीवर पडलं आहे. त्या मैदानावर हॉकी कमी खेळली जात असते आणि बाकी प्रकारचं जास्त होत असतात. राजकीय पक्षाच्या सभांना, रामलीलाच्या कार्यक्रमांना आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांना हे मैदान भाड्याने देण्यातयेत असतं. सुखलालला याची खंत वाटत असते, तशीच चीड पण येत असते. 
 
कबीर खानची टीम सरावासाठी तिथं येत तेव्हा व्यवस्था फार जवळून बघणारा आणि व्यवस्थेचाच भाग असणारा सुखलाल त्यांच्याकडेही तुच्छतेनेच बघतो. त्याला काहीही अपेक्षा नसते .पण त्याचा अंदाज खोटा ठरवून कबीर खानची टीम यश मिळवत प्रगतीची एक पायरी वर चढायला लागते तसा सुखलालचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण आमूलाग्र बदलतो. टीम ऑस्ट्रेलियाला जायला निघते तेव्हा त्यांना निरोप देताना हा भरल्या गळ्याने सांगतो, "रामलीलावाले यावर्षी पण मैदान भाड्याने मागायला आले होते, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मैदान मिळणार नाही. आता इथं फक्त हॉकी खेळली जाईल." महिला टीम जिंकून परत येते तेव्हा हा सुखलाल हातात ताट घेऊन औक्षण करायला तयार असतोच. या सुखलालची छोटी पण महत्वाची भूमिका जावेद खान यांनी लाजवाबपणे वठवली होती. 
 
जावेद खान सिनेमात छोट्या-मोठ्या भूमिका करत असले तरी ते उर्दू थियेटर आणि भारतीय थियेटरमधलं एक मोठं नाव. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून 'इप्टा' या संस्थेमार्फत जावेद खान यांनी रंगभूमीवर ठसा उमटवला. बॉलीवूडला अस्खलित उर्दू बोलणाऱ्या मुस्लिम अभिनेत्यांची एक लाजवाब परंपरा आहे. जावेद खान सारखेच छोट्यामोठ्या भूमिकांमध्ये ठसा उमटवणारे युनूस परवेज, रझ्झाक खान, प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथालेखक कादर खान हे या वारीचे काही वारकरी. अस्खलित उर्दू बोलणारे. एक एक शब्द मोजून घ्यावा आणि दाद द्यावी. सत्तरच्या दशकापासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीवरील उर्दूचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला. आता तर ती प्रक्रिया पूर्णत्वाला गेली आहे. पण उर्दूचे एक एक बालेकिल्ले ढासळत असताना या शिलेदारांनी सिनेमात आणि रंगभूमीवर उर्दूचा झेंडा धरून ठेवला. जावेद खानच्या रूपाने उर्दूचा हा शेवटचा शिलेदार पण निघून गेला आहे. हे एक नोंद झालेलं मोठं नुकसान. 
 
जावेद खान यांनी शेकडो सिनेमांत भूमिका केल्या. शेंडा बुडखा नसणाऱ्या दुर्लक्षित भूमिका! पण आयुष्यातला एक योगायोग त्यांना 'ओम शांती ओम' मधला ओम बनवतं. कसं? तरुण असताना जावेद खानचं यांचं पहिलं प्रेम क्रिकेट होत. त्या काळातले ते आपले आघाडीचे क्रिकेट खेळाडू होते. गावस्करसोबत खांद्याला खांदा लावून क्रिकेट खेळलेले. एके काळी नॅशनल टीममध्ये त्यांची निवड होईल असं वाटायचं. पण किडनीच्या दुखण्याने आणि वडिलांच्या अकाली मृत्यूने हे क्रिकेटचं स्वप्न धुळीस मिळवलं. 
 
क्रिकेटकडून अपेक्षाभंग झाल्यावर जावेद अभिनयाकडे वळले . पण त्यांनी क्रिकेटला सोडलं असलं तरी क्रिकेटने त्यांना सोडलं नाही. जेव्हा जेव्हा विदेशी भूमीवर भारतीय क्रिकेट संघ पराक्रम गाजतो तेव्हा सोशल मीडियावर आणि मुख्य माध्यमांवर 'हम जीत गये'चे मिम्स, GIF, ग्राफिक्स मोठ्या प्रमाणावर झळकत असतील. जावेद खान पण हे बघत असणारच. जेव्हा क्रिकेटनेच आपल्या अभिनयाच्या स्मृती जपल्या आहेत हे कळल्यावर क्रिकेटप्रेमी जावेद खान नावाच्या दुर्लक्षित नटाला आणि एकेकाळच्या अपयशी क्रिकेटरला आतून मनस्वी समाधान मिळत असेल हे नक्की. 
 
- अमोल उदगीरकर 
(लेखक सिनेमाविषयक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. [email protected] या मेल आयडीद्वारे त्यांच्याशी संपर्क करता येईल.)