पंजाबमधील ९५ टक्के शिखांना भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि तिथे खलिस्तानच्या भावनेला थारा नाही. पण, शीख आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर गेले आहेत. तसेच, वाढत्या हिंदुत्ववादी राजकारणाचा धोका त्यांना दिसत आहे. याचाच फायदा कॅनडातील धार्मिक उन्मादी गट घेत आहेत.
मला फक्त दहा मिनिटांसाठी काही दैवी शक्ती मिळाली, तर मी तुम्हाला माझ्या पाठीमागे या तीन गोष्टींचा पुनरुच्चार करायला लावेन. खलिस्तान नावाची कोणतीही चळवळ, कल्पना, स्वप्न अस्तित्वातच नाही. किमान भारतात तरी नाही. ब्रॅम्टन शहरात, कॅनडा देशात जे घडले ती तिथली समस्या आहे.
भारतातील पंजाबमध्ये कुणालाही अगदी कुणालाही १९७८ ते १९९३ हा पंधरा वर्षांचा काळ परत यावा, असे वाटत नाही. विशेषतः १९८३-९३ चा प्राणघातक काळ. भारतातील शीख त्यांच्या देशाविषयी काय विचार करतात? ९५ टक्के शिखांना आपण भारतीय असल्याचा अतिशय अभिमान वाटतो, असे २०२१ च्या ‘प्यू रिसर्च सेंटर सर्व्हे’मधून समोर आले. भारतातील कुठल्याही एका समूहाची, मग तो कितीही मोठा असेना, राष्ट्रवादावर मक्तेदारी नाही. समुदाय कितीही छोटा असला, तरी त्याच्या राष्ट्राबद्दलच्या बांधीलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही.
पंजाबमधील राजकारण हे जिवंत, विश्वासार्ह आणि चैतन्यशील आहे. लोकांचे मतदानातील प्रमाण वाढत आहे. सरकारे बदलत आहेत आणि कॅनडामध्ये उदयास येणाऱ्या नवीन फुटीरतावादी शक्तींसाठी पंजाबात राजकीय किंवा भावनिक पोकळी नाही. जेव्हा पंजाबी परिस्थितीविषयी नाराज होतात, तेव्हा ते सरकार बदलतात. सरकार बदलण्यासाठी ते कुण्या ट्रुडो किंवा गुरपतवंत सिंग पन्नूनकडे मदत मागण्यासाठी जात नाहीत.
त्यानंतर एक चौथी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी भारतीय शिखांच्या देशभक्तीवर आणि राष्ट्राप्रतीच्या बांधीलकीवर कधीही शंका घेणार नाही... कधीही. कारण काही हाताच्या बोटावर मोजता येतील, इतके गुन्हेगार कधी क्रांती करू शकत नसतात. पण, काही समस्या आहेत हे आपण मान्य करूया. आज पंजाबमध्ये विशेषतः
शिखांमध्ये मोठ्या प्रमाणात राग आणि संताप आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आंदोलने, वाढती धार्मिकता आणि पुराणमतवाद, देशभक्तीच्या नवीन व्याख्या आणि देशभक्तीच्या परीक्षांविषयी वाढती बचावात्मकता यातून हा राग बाहेर पडत आहे. विशेषतः समाजमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवर. ही परात्मता धोकादायक आहे. ही परात्मता देशापासून नाही, तर यालाच ते आपले राष्ट्रीय राजकारण म्हणून पाहतात.
प्रगतिशील, औद्योगिकीकरण झालेल्या आणि किनारपट्टीलगतच्या राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये आर्थिक घसरण झाली आहे. याबद्दल आपण ‘राष्ट्रहिताच्या नजरेतून’ या सदरात एक-दोन वेळा बोललो आहोत. जेव्हा एखादे राज्य पहिल्या क्रमांकावरून (एक कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी) तेराव्या क्रमांकावर घसरते, तेव्हा हा तेथील नागरिकांसाठी आर्थिक फटकाच नसतो, तर त्यांच्या आत्मविश्वासालाही तडा जातो. जो समुदाय अनेक वर्षे समाजात प्रभुत्व गाजवतो आहे, त्याच्यासाठी ही गोष्ट क्लेशकारक असते.
पंजाब कृषी संकटात सापडला आहे. त्याउलट अनेक मोठे उद्योग आणि सेवा क्षेत्र बाहेर पडत आहेत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला शिखांच्या स्थलांतराबद्दल जाणून घ्यावे लागेल. विशेषतः कॅनडामध्ये. २०२०-२१ मध्ये भारताला जगभरातून ८०.२ बिलियन डॉलर ‘फॉरेन रेमिटन्स’ (विदेशात राहणाऱ्या नागरिकांकडून देशात पाठवला जाणारा पैसा) मिळाले.
यातील २३.४ टक्के पैसे अमेरिकेतून मिळाले. त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, सिंगापूर, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान आणि कतार (१.५ टक्के) यांचा क्रमांक लागतो. आपण कॅनडाला विसरलोत का, असे तुम्ही विचाराल ना? आपला इतका आनंदी आणि समृद्ध पंजाबी समुदाय (बहुतांश शीख) तिथे राहत नाही का?
या आकडेवारीतून आपल्याला पंजाब आणि कॅनडातील अनेक ‘छोट्या पंजाब’मधील राजकीय आणि आर्थिक संकटाचे स्वरूप समजायला मदत होईल. कॅनडात १० लाख पंजाबी राहतात. (त्यात आठ लाख शीख). त्यांच्याकडून भारतात येणाऱ्या रेमिटन्सेसचा क्रमांक बारावा लागतो. हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाच्याही मागे. हे प्रमाण एकूण रेमिटन्सच्या ०.६ टक्के आहे. यावरून आपल्याला काय दिसते? दोन गोष्टी सांगता येतील, एक स्पष्ट आणि
दुसरी अनुमान. एक म्हणजे कॅनडामध्ये असलेले शीख हे अजूनही छोटी-मोठी कामे करून उदरनिर्वाह करतात किंवा इतक्या छोट्या व्यवसायात आहेत, की घरी पाठवण्यासाठी त्यांच्याकडे वरकड पैसे जमा होत नाहीत. हे अमेरिका, ब्रिटन एवढेच नाही, तर संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियामधील पांढरपेशांपेक्षा वेगळे आहे.
कौशल्य आणि रोजगाराच्या मूल्य साखळीत पंजाबी भारतातील दक्षिण आणि पश्चिम भागापेक्षा मागे पडले आहेत. पंजाब एका विचित्र विवंचनेत सापडला आहे. तेथील लोक गरीब नाहीत. देशातील सर्वात कमी दारिद्र्य पंजाबमध्ये आहे. पंजाबमधील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. पण, शेतीत काम करण्याची तेथील तरुणांची इच्छा नाही. यासाठी बिहार, पूर्व उत्तर प्रदेशातून मजूर आणले जातात. पंजाबमध्ये त्यांना ‘भय्या’ म्हटले जाते. त्याच वेळी पंजाबमधील तरुण आयुष्यातील अनेक वर्षे खर्च करतात आणि कुटुंबाचे पैसे उडवतात.
कॅनडाला जाण्यासाठी कोणत्याही मार्गाने पैशांची जुळवाजुळव करतात. तिथे ते तेच काम करतात जी कामे भय्या पंजाबमध्ये करतात. त्यामुळे कॅनडात स्थलांतरित झालेल्या शिखांकडून देशात येणाऱ्या पैशांचे प्रमाण खूप कमी असते. कुटुंबातील इतर सदस्यांच्या स्थलांतरासाठी पैसे द्यावे लागतात. सध्या पंजाबमधील हे दर ५० लाखांपर्यंत आहेत. यासाठी धनादेश किंवा बँकेद्वारे पैसे द्यायचे नसतात. ही ऐच्छिक मानवी तस्करीच म्हणावी लागेल.
पंजाबमध्ये १९९३ ला शांतता प्रस्थापित झाली. हिंदी हार्टलँडमध्ये हे राज्य सर्वात सुरक्षित होते आणि जर राज्यातील लोकांना अद्यापही संपूर्ण शांतता स्थापित झाली नाही, असे वाटत असेल, तर हे तेथील राजकीय वर्गाचे सामूहिक अपयश आहे. यामुळे राग आणि नैराश्य वाढत आहे. राष्ट्रीय राजकारण आणि त्यात शिखांचे स्थान याबद्दलचे हे नैराश्य आहे. आपल्याला बाजूला टाकले जात आहे, अशी त्यांची भावना आहे. एवढेच नाही तर अकाली-भाजप युती तुटल्यानंतर, हिंदूराष्ट्राच्या वाढलेल्या गदारोळामुळे ते चिडले आहेत.
तुम्ही माझ्यासोबत पंजाबात चला आणि तरुण किंवा वृद्ध कुठल्याही शिखाला ‘तुम्हाला खलिस्तान हवे आहे का’, असे विचारा. एखादा अपवाद सोडला तर जवळजवळ सर्व जण नाही, असेच म्हणतील. मग तुम्ही विचारा की, ते खलिस्तानसाठी घोषणाबाजी करणाऱ्यांना थांबवत का नाहीत. तेव्हा एखाद्या रस्त्यावर, एखाद्या खेड्यात तुम्हाला कुणी प्रतिप्रश्न करेल की, ‘‘जर लोक हिंदूराष्ट्राविषयी बोलतात, तर शीख राष्ट्राविषयी बोलल्यावर इतके नाराज होण्याचे कारण काय? जर तुम्ही एका धर्माच्या आधारे राष्ट्र निर्माण करू शकता, तर दुसऱ्या धर्माच्या आधारे का नाही?’’
सर्वशक्तिमान भाजपचा उदय, शिखांच्या प्रतिनिधित्वाची कमतरता, विशेषतः पंजाबचे शीख, अकाली दलाचे एका कोपऱ्यात ढकलले जाणे आणि मुस्लिमांचा बळी जाताना पाहून पंजाबवर खोल परिणाम झाला आहे. तुम्ही वस्तुस्थितीला नाकारू शकता, पण फार काळ नाही.
गुडगावमध्ये मुस्लिमांना बागेत नमाज पढण्याची परवानगी नाकारली गेली, तेव्हा शिखांनी त्यांना आपला गुरुद्वारा उपलब्ध करून दिला होता, हे तुम्हाला आठवत असेलच किंवा दिल्लीच्या वेशीवर शीख शेतकऱ्यांसाठी मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुरू केलेले लंगर? शीख मुस्लिमांविषयी अजूनही वैरभाव बाळगतात, किंवा ते अजूनही फाळणी किंवा आपल्या महान गुरूंच्या काळातच जगत आहेत, असा चुकीचा समज भाजपने करून घेतला आहे.
शिखांना असे वाटते की ते आणि मुस्लिम आता समान पातळीवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून काहीही धोका नाही. शिवाय शिखांसाठी धर्म हे ओळखीचे एकमेव मानक नाही. भाषा आणि संस्कृती हेसुद्धा महत्त्वाचे घटक आहेत.
पाकिस्तानातील बहुसंख्य पंजाबींशी त्यांचे मोठ्या प्रमाणात साम्य आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधात युद्ध पुकारले तर शीख आघाडीवर असतील का? अर्थातच राहतील. हिंदूंशी त्यांच्या अनेक गोष्टी जुळतात; पण आजच्या ध्रुवीकरण झालेल्या भारतात त्यांचा समावेश करणे ही गंभीर चूक आहे.
भारतातील एकूण शिखांपैकी ७७ टक्के पंजाबमध्ये राहतात. ९३ टक्के शिखांना पंजाबमध्ये राहत असल्याचा अभिमान वाटतो आणि ९५ टक्के शिखांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो, असे ज्या प्यू सर्व्हेमध्ये सांगितले आहे; त्यातच म्हटले आहे की दहापैकी आठ शिखांना सांप्रदायिक हिंसा ही देशातील सर्वात मोठी समस्या वाटते.
हे प्रमाण हिंदू आणि मुस्लिमांपेक्षाही (६५ टक्के) जास्त आहे. हे भाजप/आरएसएसच्या राजकारणाचे अपयश आहे. ज्या गोष्टींमुळे पंजाबमध्ये नैराश्य आणि संताप वाढीस लागला त्या गोष्टी ओळखण्यात ते कमी पडले. याचाच फायदा कॅनडातील धार्मिक उन्मादी लोक घेत आहेत.
शेखर गुप्त, ज्येष्ठ पत्रकार
(अनुवाद : कौस्तुभ पटाईत)