ये H3N2 क्या है?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
H3N2 विषाणू - प्रातिनिधिक फोटो
H3N2 विषाणू - प्रातिनिधिक फोटो

 

- डॉ. प्रदीप आवटे
 
सध्या सर्वत्र H3N2 या विषाणूची चर्चा सुरु आहे. हा विषाणू नक्की काय आहे? हा काही नवीन विषाणू नाही तर हा इन्फ्लुएंझा किंवा आपण ज्याला ‘सिझनल फ्ल्यू’ म्हणतो त्यातीलच एक विषाणू आहे. इन्फ्ल्यूएंझा विषाणूचे चार मुख्य प्रकार आहेत - ए, बी, सी आणि डी.
 
यापैकी ए विषाणू हा सर्वाधिक महत्वाचा विषाणू, त्याच्या खालोखाल बी प्रकारचा विषाणू. ए आणि बी या विषाणूंचा प्रसाराचा वेग अधिक असल्याने त्यांच्यामुळे स्थानिक पातळीवरील उद्रेक किंवा काही वेळा २००९ सारखे पॅडेमिक देखील येऊ शकते. H3N2 हा इन्फ्ल्यूएंझा ए प्रकारचा विषाणू आहे. तो दरवर्षी आढळतो. या वर्षी त्याचे प्रमाण अधिक लक्षणीय आहे.
 
सी प्रकारचा फ्ल्यू विषाणू मात्र जनुकीयदृष्टया स्थिर असल्याने तो साथीसाठी कारणीभूत होत नाही. डी प्रकारचा विषाणू गाई गुरांमध्ये आढळून येतो, त्याचा प्रसार मानवांमध्ये होत नाही. इन्फ्ल्यूएंझा विषाणूच्या पृष्ठभागावर हिमाग्लुटनिन (एच) आणि न्युराअमायनडेज (एन) अशी दोन प्रथिने असतात. या प्रथिनांच्या वेगवेगळया जोड्यांनुसार H1N1, H3N2 असे इन्फ्ल्यूएंझा विषाणूचे उपप्रकार आढळतात. विषाणूचा उपप्रकार वेगळा असला तरी याची असेलक्षणे, प्रसाराची पद्धत ही स्वाईन फ्ल्यू अथवा सिझनल फ्ल्यू सारखीच आहे.
 
लक्षणे आणि प्रसार
ताप, सर्दी, घशात खवखव, अंगदुखी ही कोणत्याही फ्ल्यूची सर्वसामान्य लक्षणे. काही वेळा उलटी, जुलाब ही लक्षणे आढळतात. फ्ल्यू हा तसा सौम्य आजार; पण काही रुग्णांमध्ये मात्र तो गंभीर वळण घेऊ शकतो. H3N2 मध्ये इतर फ्ल्यूच्या तुलनेत रुग्णालयामध्ये भरती होण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही ते घाबरुन जावे, असे नाही. साधारणपणे पाचातील एका रुग्णास न्युमोनियासारखी लक्षणे दिसतात. यातील अगदी १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते.
 
सर्व प्रकारच्या फ्ल्यूचा अधिशयन कालावधी एक ते सात दिवस एवढा कमी आहे. हा आजार पसरतो हवेवाटे, रुग्णाच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून उडणा-या थेंबातून ..! एका साध्या वाटणा-या शिंकेत सुमारे चाळीस हजार थेंब असतात. फ्ल्यू झाल्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती अल्पजीवी असते. ती केवळ ६-८ महिने टिकते. त्यामुळे एका सिझनला आपल्याला फ्ल्यू झाला तरी पुढल्या सिझनसाठी आपल्याला प्रतिकारशक्ती मिळत नाही. H1N1 ची प्रतिकारशक्ती H3N2 साठी उपयोगी पडत नाही. लक्षणे आढळणा-या फ्ल्यूचे रुग्ण जेवढे आढळतात, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोक हे फ्ल्यू विषाणू शरीरात जाऊनही लक्षणविरहित असतात. अशा अनेक कारणांमुळे फ्ल्यू खूप वेगाने पसरतो. भारतात फ्ल्यूचे दोन सिझन आहेत. एक जानेवारी ते मार्च आणि दुसरा पावसाळ्यानंतर आताही H3N2 चे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसते आहे. जसजसे ऊन वाढत जाईल, तसतसे ते आणखी कमी होत जाईल.

उपचार आणि लसीकरण-
सर्वसाधारणपणे फ्ल्यू हा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. पण तरीही सर्दी खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यासोबतच गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हा उपचाराचाच एक भाग आहे. सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या फ्ल्यूकरता कोणत्याही औषधापेक्षा घरगुती आजीबाईचा बटवा पुरेसा आहे. या आजारासाठी ऑसेलटॅमीवीर / टॅमीफ्ल्यू हे औषध उपलब्ध आहे. अर्थात ते वैद्यकीय सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. विनाकारण ॲंटिबायोटिक्स घेणे टाळायला हवे.
 
आपण रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांचे सौम्य ( अ वर्ग), मध्यम ( ब वर्ग) आणि गंभीर ( क वर्ग ) अशा गटात वर्गवारी करतो आणि त्या नुसार त्यांना उपचार देतो. सौम्य गटातील व्यक्तींना आपण ऑसेलटॅमीवीर हे औषध लगेच सुरु करत नाही. अशा रुग्णाला आपण नेहमीचे सर्दी खोकल्यासाठीचे उपचार देतो आणि या उपचारांनी त्यांना २४ ते ४८ तासात फरक पडला नाही तर ऑसेलटॅमीवीर सुरु करतो. मात्र फ्ल्यूची लक्षणं जरी सौम्य असली तरीही ज्या रुग्णांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांना आपण ब म्हणजे मध्यम गटातील रुग्णांप्रमाणे तातडीने ऑसेलटॅमीवीर सुरु करतो. या सगळया वर्गीकरणाचा हेतू एकच आहे आणि तो म्हणजे फ्ल्यू रुग्णास लक्षणे सुरु झाल्यापासून ४८ तासांत ऑसेलटॅमीवीर सुरु करणे कारण हे औषध वेळेत सुरु झाल्यास अत्यंत गुणकारी ठरते आणि न्यूमोनिया वगैरे गुंतागुंत होऊन आजार जीवावर बेतत नाही.
 
मधुमेह, हृदयरोग, दमा असे जुनाट आजार असणारे लोक आणि गरोदर महिला या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो म्हणून अशांची विशेष काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने अतिजोखमीच्या लोकांचे फ्ल्युविरोधी लसीकरण करावे. लस घेतल्यानंतर फ्ल्यूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान तीन आठवड्यांचा काळ लागतो. आपण इन्फ्ल्यूएंझाविरोधी लस ही मार्च ते मे या काळात त घेणे चांगले. त्यामुळे दोन्ही फ्ल्यू सिझनसाठी प्रतिकारशक्ती मिळते.

फ्ल्यू प्रतिबंधासाठी काय करावे ?
आपल्या काही चुकीच्या सवयी बदलून आपल्याला या आजारांवर नियंत्रण आणणे शक्य आहे. हे आजार हवेवाटे म्हणजे शिंकण्या खोकण्यातून पसरतात. इतस्ततः थुंकण्याच्या सवयी घातक आहेत. साधी सवय बदलली तरी या आजारांना आळा बसेल. धुम्रपान, तंबाखू, गुटखा यांना निर्धाराने नाही म्हणायला हवे. शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे, हात पुन्हापुन्हा स्वच्छ धुणे, फ्ल्यूची लक्षणे असतील तर जनसंपर्क कमी करणे, शारीरिक व मानसिक ताण टाळणे, भरपूर पाणी पिणे, आहारात व्हिटॅमिन सीयुक्त बाबींचा समावेश करणे, हस्तांदोलन टाळणे आवश्यक आहे.
 
घरातल्या फ्ल्यू रुग्णाची काळजी कशी घ्यावी, एका रुग्णाची काळजी घेताना त्याच्यापासून स्वतःला आणि घरातील इतरांना हा आजार होणार नाही ना, यासाठी दक्ष असणे आवश्यक आहे. H3N2 हा नियमित आढळणारा विषाणू आहे. तेव्हा घाबरून न जाता दक्षता बाळगावी.
 
( लेखक राज्य आरोग्य सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आहेत.)