प्रभू श्रीरामाचे जीवनचरित्र तरुणाईसाठी मार्गदर्शक

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 12 d ago
श्रीराम
श्रीराम

 

राम आपले ‘चैतन्य’ आहे. आपल्या हृदयातील प्रकाश ‘राम’ आहे. चैत्र नवमीच्या दिवशी राजा दशरथ आणि आई कौसल्या यांच्या पुत्राच्या रूपात भगवान रामाचा जन्म अयोध्येमध्ये झाला, अशी कथा प्रचलित आहे. म्हणूनच भारतात दरवर्षी चैत्र नवमी ही ‘रामनवमी’ म्हणून साजरी केली जाते. तरुणांच्या दृष्टिकोनातून ‘रामनवमी’च्या महत्त्वाबद्दल...

श्री रामाचे जीवन आपल्याला आव्हानांचा धैर्याने सामना करण्यास शिकवते. श्रीरामांनी मोठ्या आव्हानांना तोंड देत संयम राखला आणि अत्यंत कठीण काळातही विजय संपादन केला. तरुणांनी श्रीरामांकडून हे शिकले पाहिजे. जीवनात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव तत्पर असते ती तरुणाई. कोणी परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसला असल्यास त्याला तरुण म्हणता येणार नाही. जीवनात परिस्थिती कशीही असो, जो आपला उत्साह टिकवून ठेवू शकतो तोच खरा तरुण. उत्साह हे तरुणाईचे लक्षण आहे.

सत्याचे अनुकरण करा
भगवान श्रीरामांनी आयुष्यभर सत्याचे पालन केले. युवकांनी प्रभू रामाच्या जीवनातून सत्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा घ्यावी. सत्याचे अनुकरण करणे म्हणजे वर्तमानात जगणे. अनेकदा केवळ सत्य बोललो म्हणजे आपण सत्यवादी आहोत, असा विचार करतो. खरे बोलणे म्हणजे सत्यवादी असणे नव्हे. किंबहुना आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्य व्यक्त करायचे असते. मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवा. तुम्ही तुमचे शरीर, मन, बुद्धी, स्मृती आणि इतर अस्तित्वाच्या स्तरांवर एकजीव असता, तसेच त्यांचे साक्षीदारही असता तेव्हा तुम्ही शुद्ध राहता. आपल्या साक्षीभावाचे साक्षीदार असणे हा शुद्धतेचा गहिरा अर्थ आहे.

श्रीरामाकडून शिस्त शिका
प्रभू रामाचे जीवन शिस्तीचे आदर्श उदाहरण आहे. तुमच्यात शिस्तबद्ध राहण्याची निष्ठा असल्यास शिस्त शंभरदा मोडली तरी हरकत नाही. स्वतःला अनुशासनहीन असे लेबल लावू नका. तुम्ही असे केल्यास, तुम्ही स्वतःला अनुशासनहीन होण्याचा परवाना देता. मुंग्या चढतात, खाली घसरतात, पुन्हा चढतात आणि पुन्हा पडतात. तरीही त्या प्रयत्न करात राहतात. त्याचप्रमाणे तुमची शिस्त लाखो वेळा मोडली, तरी तुम्ही करोडो वेळा पुन्हा सुरुवात करा. ते तुमच्यासाठी चांगले असेल.

करुणेची शक्ती सर्वांत मोठी
श्रीरामांना करुणेचे प्रतिरूप म्हटले जाते. सर्वांत मोठा आनंद करुणा किंवा दयाळूपणामध्ये आहे. एकदा किनाऱ्यावर उभे राहून संपूर्ण जगाकडे पाहा. तुम्हाला संपूर्ण जगाबद्दल करुणा अनुभवता येत असल्यास तुमच्यामध्ये बदल घडून आला आहे. तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींमध्ये गुंतत चाललेल्या सर्व लोकांकडे पाहा. फक्त एका क्षणासाठी, ते जसे आहेत तशी त्यांच्याबद्दल करुणा बाळगा. मग एक बदल घडतो. तुम्ही महान होता. तुमच्या चेतनेचा विस्तार होतो.

अध्यात्माच्या मार्गावर...
श्रीराम पौगंडावस्थेत असताना जगाच्या दु:खाने त्यांना आतून हादरवून सोडले आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते जगापासून अलिप्त राहू लागले. गुरू विश्वामित्रांना हे कळल्यावर त्यांनी गुरू वशिष्ठांना श्रीरामांना सत्याचे ज्ञान देण्याचा आग्रह केला आणि गुरू वशिष्ठांनी भगवान रामाला दिलेले ज्ञान आज ‘योग वशिष्ठ’ म्हणून ओळखले जाते. आयुष्यात अडचणी येतात, अडचणींवर मात करण्यासाठी माणसाने आतून खंबीर असायला हवे. आंतरिक शक्ती केवळ आध्यात्मिक ज्ञानानेच येऊ शकते. अध्यात्म म्हणजे स्वतःची उत्स्फूर्तता, कोमलता आणि उत्साह टिकवून ठेवणे होय.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter