'इस्लाममध्ये जे जे म्हणून चांगले आहे, ते ते तुमच्याकडून विकसित व्हावे!'

Story by  Awaz Marathi | Published by  sameer shaikh • 1 Years ago
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यशवंतरावांनी  केलेले भाषण
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यशवंतरावांनी केलेले भाषण

 

यशवंतराव चव्हाण! मुंबई राज्याचे शेवटचे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राचा मानबिंदू  आणि राष्ट्रीय राजकारणातील मानाचे नाव. त्यांनी केंद्रामध्ये परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि उपपंतप्रधान अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या. यशवंतराव पट्टीचे वाचक होते, बहुभाषाकोविद होते. मराठीसह इतर भाषांविषयी त्यांना विशेष आस्था होती. ‘महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी’ च्या स्थापनेत त्यांची प्रमुख भूमिका होती. माजी मंत्री आणि इस्लामचे अभ्यासक रफिक झकेरिया यांच्या 'Rise of Muslims in Indian Politics' या मह्त्त्वाच्या पुस्तकाला त्यांनी लिहलेली प्रस्तावना विशेष वाचनीय आहे. यशवंतराव आपल्या वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना २३ डिसेंबर १९५९ रोजी अलीगढ विद्यापीठाकडून त्यांना ‘ऑनररी डिग्री ऑफ एल.एल.डी’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी अलिगढ विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी भाषण केले. भाषणाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मुस्लीम असल्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात इस्लाम, मुस्लीम, भारतीय मुस्लीम आणि लोकशाही अशा विविध पैलूंवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आज यशवंतरावांच्या ११० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भाषणाचा संपादित अंश ‘आवाज मराठी’च्या वाचकांसाठी...

- संपादक 

ह्या दीक्षान्त समारंभप्रसंगी अभिभाषण करण्यास पाचारण करून माझा हा सन्मान केल्याबद्दल, मी तुमच्या विद्यापीठाचे उपकुलगुरू आणि कार्यकारी मंडळाचे सभासद यांचे मनःपूर्वक आभार मानतो. दीक्षान्त समारंभांत उपदेशपर भाषण करणे हे खरोखरी माझ्यासारख्याचे काम नाही. मंत्री या नात्याने, उपदेश करण्यापेक्षा उपदेश ऐकण्याचीच मला अधिक सवय होती. आणि मुख्यमंत्री या नात्याने तर उपदेश ऐकण्याचे हे काम मला किती तरी अधिक मोठ्या प्रमाणावर करावे लागते. लोकशाहीच्या ह्या जमान्यात स्वपक्षाच्या आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या वृत्तपत्रांतून आणि व्यासपीठावरून अनाहूत उपदेशाचा अखंड प्रवाह वाहत असतो. इतके कशाला सल्लागार, सल्लागार समित्या व सल्लागार मंडळे यांचा जो प्रचंड गराडा मंत्र्यांच्या भोवती पडलेला असतो तोच फक्त तुम्ही लक्षात घेतला तरीही या समारंभासाठीं आपण ही जी निवड केलेली आहे ती करण्यात आपली चूक झाली की काय अशी शंका तुमच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. 

दुसरे असे की उपदेश कोणीही केलेला असो, तो शंभर टक्के स्वीकारणे नेहमींच शक्य नसते आणि पुष्कळ वेळा शहाणपणाचेही नसते, हे आपल्याला अनुभवाने माहीत होते. तेव्हा अशा या समारंभात उपदेशपर भाषण करण्याची सर्वसाधारणपणे जी प्रथा असते ती मी पाळली नाही तर ते तुम्ही समजू शकाल अशी मी आशा करतो.

उपदेश करण्याचे मी टाळतो याला याहूनही अधिक महत्त्वाचे आणखी एक कारण आहे. आपल्या देशांतील परिस्थिति आज झपाट्याने बदलत आहे आणि या बदलणाऱ्या परिस्थितीतले कित्येक बदल तर इतक्या मूलग्राही व दूरगामी स्वरूपाचे आहेत की पुढील पंधरा-वीस वर्षांत कोणती परिस्थिति उद्भवेल आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला केवढे बौद्धिक व नैतिक बळ वापरावे लागेल याचें भविष्य मांडणारा माणूस खरोखरच फार धाडसी म्हटला पाहिजे. कोणीसे म्हटले आहे की विसाव्या शतकांत पहिल्या महायुद्धानंतर सामाजिक परिवर्तनास जी प्रचंड गती मिळाली तशी मानवी इतिहासांतील दुसऱ्या कोणत्याही कालखंडांत मिळालेली नाही. आणि याचे भरपूर प्रत्यंतर आपल्याला आपल्या अनुभवावरून प्रत्यही येतच असते. 

तेव्हा, मित्रहो, तुम्हांला कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल, कोणत्या अडचणींशी मुकाबला करावा लागेल, कोणती परिस्थिति हाताळावी लागेल याचा कानमंत्र मी तुम्हांला देऊ शकणार नाही. त्यासाठी तुमच्या या महान् विद्यापीठाकडून तुम्ही जे शिकला त्यावरच तुम्हाला सतत विसंबून राहावे लागेल. आणि ज्या उज्ज्वल ध्येयवादाचा पाठपुरावा करून अलिगड विद्यापीठाने पूर्वी देशातील बौद्धिक चळवळीच्या क्षेत्रात श्रेष्ठ असे स्थान मिळविले तो ध्येयवाद जर तुम्ही संपूर्णपणे आणि योग्य रीतीने आत्मसात् केला असेल तर तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही.

मी असे म्हणतो याला कारण आहे. माझ्या मते तुमच्या विद्यापीठाच्या या ध्येयवादामागची प्रेरणा मूलतः समाजसुधारणेचीच होती आणि शिक्षणानेच सर्व सामाजिक व आर्थिक दोषांचे निर्मूलन होईल अशा प्रकारची शिक्षणासंबंधी ठाम निष्ठा या ध्येयवादात होती. तेव्हा, साहजिकपणेच या ध्येयवादाने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व दुराग्रह यांच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धिप्रामाण्य, समंजसपणा व सहिष्णुता या आपल्या नवजात लोकशाहीच्या दृष्टीने आज अत्यंत आवश्यक असलेल्या मूल्यांचा पाठपुरावा केला. 

या विद्यापीठाचे थोर व वंदनीय संस्थापक सर सय्यद अहमद खान यांना त्यांच्या या वैचारिक भूमिकेमुळे स्वधर्मीयांची अप्रियता, विद्वेष व कटुता सहन करावी लागली. परंतु ज्या धैर्याने त्यांनी या परिस्थितीला तोंड दिले व तिचा मुकाबला केला ते धैर्य, त्यांच्या ठिकाणी असलेली अढळ निष्ठा व श्रेष्ठ दर्जाचे नैतिक सामर्थ्य यांतूनच निर्माण होऊ शकले. मुसलमान समाजाला शेवटी त्यांच्या शिकवणुकीचे महत्त्व पटले, हा त्या पायाशुद्ध शिकवणुकीचा मोठाच गौरव समजला पाहिजे. आणि म्हणून त्या थोर पुरुषाच्या पवित्र स्मृतीचा आपणास मान राखावयाचा असेल तर त्याची ही शिकवण आपण कधीही नजरेआड होऊ देता कामा नये.

इंग्लंडमधील आपल्या वास्तव्यात तेथील शिक्षणपद्धतीचे अवलोकन करून सर अहमद यांनी भारतीयासंबंधी असे उद्गार काढले होते की, ''जोपर्यंत भारतात शिक्षणाचे लोण इथल्याप्रमाणे सबंध जनतेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कोणत्याही भारतीयास सुसंस्कृत व मानाचे जीवन जगणे अशक्यच आहे.'' त्यांचे हे उदात्त स्वप्न सत्यसृष्टीत आणण्याचे आज जे सर्वत्र प्रयत्न चालू आहेत ते पाहण्याचे फार मोठे सद्भाग्य आपणास लाभले आहे.

तुमच्या विद्यापीठाचे स्वरूप धार्मिक असूनही त्याची द्वारे भौतिक ज्ञान आणि विज्ञान यासाठी खुली करण्यात आली असल्यामुळे आपल्या विद्यापीठीय जीवनात निर्माण झालेली ही अस्थिरता दूर करण्याच्या दृष्टीने तुमचे विद्यापीठ अधिक प्रभावी रीतीने प्रयोग करू शकेल असे मला वाटते. तरुण स्त्री-पुरुषांत आज जी एक प्रकारची बेबंद वृत्ति वाढत आहे तिला तुमचे विद्यापीठ आळा घालूं शकेल आणि त्याचबरोबर अहंमन्यता, वृथाभिमान व असहिष्णुता या दोषांनाही त्याला पायबंद घालता येईल. 

तुमच्या या विद्यापीठाचे स्वरूप असे आहे की कोणत्याही प्रकारच्या अलगपणाच्या भावनेला येथे वाव नाही व पुढेही तो राहता कामा नये. ज्या थोर परंपरेचे तुम्ही प्रतिनिधी आहात त्या परंपरेतील लोकशाही प्रवृत्तींची जोपासना आणि विकास केल्याने आपल्या देशांतील लोकशाहीपुढील प्रश्न सोडविण्यासाठीही या प्रवृत्तींचा तुम्हांला उपयोग करून घेता येईल आणि त्यायोगे ही परंपरा तुम्ही अधिक संपन्न करू शकाल. 

सध्यांच्या जगात विज्ञान आणि तंत्रशास्त्र यांना साहजिकच फार महत्त्व आहे. तथापि सनातन अशा ज्ञानाचा व विद्येचा लाभ तुमचे हे विद्यापीठ नेहमीच देऊ शकेल. महत्त्वाची गोष्ट ही की तुमच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे; आणि ती तुमच्या फायद्याचीच आहे. कारण त्यायोगे लोकाशाहीतील नागरिकास आवश्यक असणारे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावेत, आणि स्वातंत्र्य व समता यांवर आधारलेला जो समाज निर्माण करण्याचा आज आपण प्रयत्न करीत आहोत त्याचे ते जबाबदार घटक बनावेत म्हणून शैक्षणिक क्षेत्रांत तुम्हांला प्रयोग करणे केव्हाही अधिक सुलभ जाईल.

तुमच्या या थोर विद्यापीठाने आपल्या स्थापनेपासूनच राष्ट्रीय जीवनात मोठी कामगिरी बजावली आहे. अलिगड कोणाला आवडो अगर न आवडो, परंतु विद्यादानाच्या या महान् स्थानाकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून या व्यासपाठीवरून भाषण करण्याची तुम्ही मोठ्या उदारपणे मला ही संधी दिलीत तिचा फायदा घेऊन या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करू इच्छितो की, ज्यायोगे हे विद्यापीठ भारताच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या कार्यांत अग्रेसर राहील अशा प्रकारची नवी कामगिरी त्यांनी आपल्या या महान् संस्थेकरवी पार पाडावी. तुम्हाला कदाचित माहीत असेल की तुमच्या विद्यापीठाची स्थापना झाली त्या वेळी राजकारणी व्यक्तीमध्येच नव्हे तर शिक्षणतज्ज्ञांमध्येही सरकारी नोकऱ्यांची जातीच्या प्रमाणात वाटणी व्हावी हे मत प्रभावी होते. प्रमाणानुसार वाटणी या तत्त्वाचा काही उपयोग नाही असे मी म्हणत नाही. कदाचित् त्या काळी त्याचा उपयोग झालाही असेल. परंतु व्यक्तिशः मला विशिष्ट जातींच्या किंवा गटांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अशा प्रकारचा आधार घेतला जावा याबद्दल कधीच बरे वाटले नाही. 

या विद्यापीठाचे विशेषतः जे मुसलमान विद्यार्थी आहेत त्यांनी याच भावनेने त्यांच्यापुढील महान् कार्याला प्रारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या अणुयुगात अशा प्रकारच्या 'प्रमाणानुसार वाटणी' या तत्त्वाला काही अर्थच राहिलेला नाही. खरे म्हणजे, बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने त्याला कधीच काहीं अर्थ नव्हता. केवळ नोकऱ्या आणि जागा देऊन आम जनतेचेच काय पण एखाद्या गटाचे सुद्धा प्रश्न सुटण्यास थोडीसुद्धा मदत होणार नाही. या देशात, इतर समाजांप्रमाणे मुसलमान समाजांतही ९० टक्के लोक शेतकरी व कामगार आहेत. भारताच्या प्रगतीचा विचार ह्या दृष्टिकोनांतून झाला पाहिजे. ह्या प्रगतीच्या संदर्भात जातीय विचारांना मुळीच वाव राहू शकणार नाही. आतांपर्यंत मुसलमान शेतकरी आणि हिंदू शेतकरी, मुसलमान कामगार आणि हिंदू कामगार अशा प्रकारची मागणी अद्यापि कोणी केली नाही, ही सुदैवाचीच गोष्ट म्हटली पाहिजे. वातावरणाची अनुकूलता ही अर्थात् महत्त्वाची असते ही गोष्ट खरी आहे. आणि हे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपल्या आवडत्या पंतप्रधानांच्या प्रभावी नेतृत्वाखाली सर्व नागरिकांना समान संधी देणाऱ्या समाजव्यवस्थेचा भक्कम पाया घातला गेला आहे, या माझ्या म्हणण्याशी तुम्ही सहमत व्हाल याची मला खात्री आहे.

मॉन्ट्रीयल येथील मॅग्गील येथील विद्यापीठातील इस्लामी संस्कृतीच्या अध्ययन शाखेचे प्रमुख प्रा. विलफ्रेड कॅन्टवेल स्मिथ यांनी मुसलमानांच्या संबंधी खालीलप्रमाणे उद्गार काढले आहेत :

''भारतांतील मुसलमानांचे भवितव्य हे जगांतील इतर मुसलमानांच्या किंबहुना सर्वच जनसमूहांच्या भवितव्याप्रमाणे, त्यांच्या आत्मिक बलावर, श्रद्धेवर व सर्जनशीलतेवर आणि अन्य बांधवांबरोबरच्या त्यांच्या संबंधांवर अवलंबून आहे.'' परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले तर कोणतीही गोष्ट त्यांना असाध्य नाही. वास्तविक पाहता त्यांची भूमिका पुढाकाराची राहणार असून ही भूमिका ते योग्य प्रकारे पार पाडू शकले तर ते आपल्या देशाची यथोचित सेवा करतील, एवढेच नव्हे तर झपाट्याने बदलत असलेल्या सध्यांच्या जगात इस्लामच्या धर्माचीही त्यांच्याकडून सेवा घडेल.

हे एक मोठेच आव्हान आहे यांत शंका नाही. आणि या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे महत्त्व कथन करण्यात आपणां सर्वांचे कल्याण व्हावे व सर्वांची प्रगति व्हावी हाच माझा हेतु आहे. आपल्या विद्यापीठाचा निरोप घेऊन जीवनाच्या विशाल क्षेत्रांत आज पाऊल टाकणाऱ्या तुम्हा पदवीधरांना माझी एवढीच विनंती आहे की, तुम्ही आपल्या विचाराने, आचाराने आणि उक्तीने आपल्या विद्यापीठाच्या उच्च परंपरांना आपण पात्र आहोत असे दाखवून द्यावे. 

सुधारणा व समंजसपणा, बुद्धिनिष्ठा व सहिष्णुता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवतेवरील श्रद्धा ह्याच या विद्यापीठाच्या परंपरा आहेत. आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या मुसलमान बंधूंनी आपल्यापासून अलग होण्याचे जरी पत्करले तरी मुसलमानांच्या विद्येचे आसन आमच्यामध्येच राहिले आहे, ही इतिहासातील खरोखर एक अविस्मरणीय घटना आहे. इस्लाममध्ये जे जे म्हणून चांगले आहे ते ते तुमच्याकडून विकसित व्हावे, आपल्या लोकशाही संस्कृतीच्या संवर्धनास त्याचे मोठ्या प्रमाणांत साहाय्य व्हावे, आणि त्याचा लाभ आपणा सर्वांना व पुढील पिढ्यांना मिळावा हीच माझी प्रार्थना!

- यशवंतराव चव्हाण

(यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणाचा संग्रहांपैकी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्तकात हे भाषण मूळ स्वरुपात वाचता येईल. यशवंतरावांचे समग्र साहित्य 
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या 'यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य' या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे.)