शेवगावच्या युवकाचा अमेरिकेत डंका!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
अजय कापरे
अजय कापरे

 

अमरापूर - मुळचा सामनगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी असलेल्या अजय वसंतराव कापरे या युवकाने अमेरीकेतील आरोग्य, देखभाल, तंत्रज्ञान व उपाययोजना या क्षेत्रात काम करणाऱ्या एँलिके या कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचा अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे.

 

प्रचंड मेहनत, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामिण भागातील तरुणाने अल्पावधीत थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीच्या व्यवस्थापनाचे प्रमुखपद मिळवल्याने गावाची, तालुक्याची व जिल्ह्याची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.

 

अजय कापरे हे मुळचे सामनगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी व अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त असलेल्या ॲड. वसंतराव शाहुराव कापरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. तर युवा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय कापरे यांचे ते बंधू आहेत. संगणक अभियांत्रिकीत पदवीधर असलेल्या कापरे यांनी टेक्सास टेक विद्यापीठातून एम. बी. ए. मार्केटींगची पदवी घेतली.

 

अमेरीकेतील एल्मवुड पार्क, न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेल्या व ७५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा पसारा असलेल्या रुग्णालय, आरोग्य प्रणाली, निदान प्रयोगशाळा, आरोग्यसेवा यामध्ये २००२ या वर्षापासून एँलिके या कपंनीत काम करत आहेत. त्यामध्ये धोरण व विपणन अधिकारी या पदावर कापरे हे सहा वर्षापासून काम करत आहेत.

 

संस्थेच्या कामकाजाची प्रक्रिया व प्रणाली सुधारण्यासाठी तसेच हेल्थ केअर टेक्नालॉजी सोलुशन विकसीत करण्यासाठी वितरण संस्थांना समर्थन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्या दृष्टीने संस्थेच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्यावर अधिक जबाबदारीचा भार म्हणून थेट एँलिके या कंपनीचे अध्यक्ष व मुख्य धोरण अधिकारी म्हणून नियुक्ती देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

 

 

सामनगाव सारख्या दुष्काळी व ग्रामिण भागातील तरुणाने उच्च शिक्षण व स्वत:च्या कर्तृत्वशैलीवर थेट अमेरिकेतील संस्थेचे अध्यक्षपद मिळवल्याने ग्रामिण भागातील तरुणांसाठी तो मोठा दिपस्तंभ ठरला आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.