पुस्तकवेडा शब्बीरभाई

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
पुस्तकांसोबत शब्बीर भाई
पुस्तकांसोबत शब्बीर भाई

 

- मुरलीधर कराळे 


छंद कोणताही असो, तो जीवनभर जपला जातो. संगीत, वाचन, खेळ असे वेगवेगळे छंद जपण्यासाठी आयुष्यातील मोठा आर्थिक खर्च व वेळ दिला जातो. असाच एक पुस्तकवेडा अवलिया अहमदनगर जिल्ह्यात आहे. शेख शब्बीर अहमद बिलाल असे त्याचे नाव आहे.

 

शब्बीरभाई म्हणून ते साहित्य विश्वात सर्वांच्या परिचयाचे. जिल्ह्यात साहित्य संमेलन कोठेही असो, शब्बीरभाई तेथे हजर राहणार. आलेल्या लेखकांची विचारपूस करणार. त्यांचे पुस्तक घेऊन आपल्या सूचीत नाव समाविष्ट करणार. त्यांनी आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील २३०० लेखकांची ६५०० पुस्तके संकलित केले आहेत. त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्याचा इतिहास तर आहेच, शिवाय जिल्ह्यातील लेखनसंपदा एकत्रित आढळते.

 

शब्बीरभाई अहमदनगर शहरातील गोविंदपुरा भागात राहतात. पुस्तकाचा हा छंद त्यांनी तब्बल २० ते २५ वर्षांपासून जोपासला. या व्यतिरिक्त विविध देशांतील नाणे, तिकिटे संकलनही त्यांच्याकडे चांगले आहे. त्यांना लहानपणापासूनच वाचन तसेच पुस्तकांची आवड होती. त्यांचे वडिल पोलिस खात्यात नोकरीस होते. त्यामुळे बदल्या वारंवार होत असत. साहजिकच शब्बीरभाईंचे शिक्षण विविध तालक्यांत झाले. प्राथमिक शिक्षण वांबोरी, राहुरी, श्रीगोंदे, कोपरगाव आदी ठिकाणी झाले. महाविद्यालयीन शिक्षण नगर शहरात झाले. त्यांनी बी.ए. पूर्ण केले. त्यानंतर इंडियन सिमलेस या कंपनीत नोकरी स्वीकारली. साहित्य संमेलनाला जाण्यासाठी सुटी न मिळाल्यास त्यांनी अनेकदा बिनपगारी सुटी टाकून हा छंद जोपासला.

 

जुनी नाणी शोधताना त्यांना एक दिवस अहमदनगर नाव असलेले पुरातन नाणे सापडले. निजामशाहीच्या काळातील हे नाणे होते. त्यांनी त्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विविध पुस्तके जमा केली. १९९७ मध्ये साहित्य संमेलनात त्यांना पुस्तके जमा करण्याची व लेखकांची सूची करण्याची संकल्पना आली. ती सत्यात येण्यास २००६ साल उजाडले. जिल्ह्यातील लेखिका सुमती लांडे यांच्याशी एकदा चर्चा करताना पुस्तके जमा करून नगर जिल्ह्यातील लेखकांचे नावांची सूची तयार करण्याबाबत योग्य दिशा मिळाली. लांडे यांनी त्यांना ४० पुस्तके लगेचच दिली. तेथूनच या उपक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर जिल्ह्यातील लेखकांचा शोध सुरू झाला. अनेकदा शब्बीरभाई यांनी ५० किलोमीटरपर्यंत स्कूटरवर जाऊन लेखकांचे घर गाठायचे. त्याच्याशी चर्चा करून पुस्तके संकलित करायचे. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसा खर्ची होत. अनेकदा १० रुपयांच्या पुस्तकासाठी मोठा खर्च सहन करावा लागला. कधी विकत, कधी भेट म्हणून त्यांनी पुस्तके जमा केली.

 

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था असलेली ‘इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशियन रिसर्च अॅण्ड एक्सचेंज (बंगरुळ)र् या संस्थेची प्रतिनिधी सरिता मानू थेट शब्बीरभाईंच्या घरी आली. त्यांनी त्यांची चौकशी करून बंगरुळूमध्ये भरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनाचे निमंत्रण त्यांना दिले. त्यासाठी शब्बीरभाईंनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्याचे कारण विचारले असता इतक्या लांब जायचे म्हणजे आठवडाभर सुटी मिळायची नाही. शिवाय मोठा खर्च ही कारणे पुढे आली. तिने या संमेलनाला उपस्थित राहण्याबाबत आग्रह केला व ती निघून गेली. एक महिन्यांनी तिचा पुन्हा फोन आला. तुम्ही एक दिवस सुटी काढणार का? असे तिने विचारले. शब्बीरभाईंनी हो म्हटले. पुढील दोन दिवसांतच विमानाचे तिकीट त्यांच्या नावे बुकिंग झाल्याचा मेसेज आला. विशेष म्हणजे आशिया खंडातून केवळ 30 लोकांना या संमेलनाला निमंत्रण दिले होते, त्यात शब्बीरभाईंचे नाव होते. त्यांनी तेथे हिंदीतून भाषण केले. ते सर्वांना खूप भावले. तेथे बांगलादेश, पाकिस्तान, तुर्कस्तान तसेच विविध देशांतील लोक होते. त्यांनी शब्बीरभाईंचे कौतुक केले. हा क्षण शब्बीरभाईंच्या जीवनातील कायम स्मरणात राहणारा ठरला. पुस्तके जमा करण्याचा छंद नाही, तर त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. ‘अहमदनगर साहित्य वैभव’ ही पुस्तकसूची २०१३ मध्ये प्रकाशित करण्यात आली. ‘पहाडगाथा’ या प्रवीण जिलवाले या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत त्यांनी अनुवाद केला. तसेच विजय जावले यांचे ‘मिट्टी की सौगात’ हे पुस्तक अनुवादित केले.

 

शब्बीरभाई हिंदी अनुसंधान प्रसार केंद्राचे अध्यक्ष आहेत. त्यामाध्यमातून काव्य मैफल, साहित्यिक कार्यक्रम भरवितात. जिल्ह्यातील लेखकांची सूची तयार करताना त्यांनी पुस्तकाचे नाव, अनुवादक, संपादक, संकलक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष, आवृत्ती, पृष्ठ संख्या, आकार, किंमत, प्रकार (भाषा, लिपी), मुखपृष्ठ, आयएसबीएन नंबर आदींचा समावेश आहे. त्यामुळे पुस्तकाची सविस्तर माहिती या सूचित नमूद करण्यात आली आहे. नशब्बीरभाईंच्या घरी बहुतेक मोठे लेखक येऊन गेले आहेत. श्रीपाल सबनीस, रतनलाल सोनग्रा, राजन खान, महावीर जोंधळे, भाई वैद्य, संजय कळमकर आदी साहित्यिकांनी या कामाचे कौतुक घरी येऊन केले. शब्बीरभाई यांच्या बंगल्यात एक स्वतंत्र खोली खास पुस्तकांसाठी केली आहे. तेथे हजारो पुस्तकांचा खजिना आहे. अनेक डबल झालेली पुस्तके त्यांनी विविध ग्रंथालयांना भेट म्हणून दिले आहेत. या कामात पत्नी रिझवाना यांची त्यांना मदत होते. त्यांची एक मुलगी अमरीन शेख ही जर्मनीला असते. अतिया खान ही नगरला असते. मुलगा नदीम हा पुण्यात एका कंपनीत नोकरीला आहे. हे सर्व कुटुंबिय त्यांच्या छंद जपवणुकीला मदत करतात.
संपर्क ः शब्बीरभाई ९६५७८६१९५६