नुकतचं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकूर यांनी असहकार चळवळीतही त्यांनी सहभाग घेत इंग्रजांविरुद्ध आंदोलन केलं होतं. ठाकूर यांना भारतरत्न देण्यात यावं यासाठी जेडीयूकडून मागणी करण्यात आली होती. ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर जेडीयूने भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र, कर्पुरी ठाकूर आहेत तरी कोण? त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कर्पूरी ठाकूर कोण होते?
कर्पूरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणात सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे नेते मानले जातात. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म एका सामान्य न्हावी कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधी भूमिका घेऊन बिहारच्या राजकारणात स्थान निर्माण केलं, असं सांगण्यात येतं. आणीबाणीच्या काळात ठाकूर यांना अटक करण्याचे इंदिरा गांधींचे प्रयत्न फसले होते.
कर्पूरी ठाकूर 1970 आणि 1977 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले. कर्पूरी ठाकूर 1970 मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 22 डिसेंबर 1970 रोजी त्यांनी पहिल्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यांचा पहिला टर्म केवळ 163 दिवसांचा होता. 1977 च्या जनता लाटेत जनता पक्षाला मोठा विजय मिळाला तेव्हाही कर्पूरी ठाकूर दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाही त्यांना त्यांचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. त्यानंतरही आपल्या दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या कार्यकाळात त्यांनी समाजातील वंचितांच्या हितासाठी काम केले.
बिहारमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील सर्व विभागांमध्ये हिंदीतून काम करणे बंधनकारक करण्यात आले. आपल्या कार्यकाळात त्यांनी गरीब, मागास आणि अत्यंत मागासलेल्यांच्या बाजूने अशी अनेक कामे केली, ज्यामुळे बिहारच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडून आला. यानंतर कर्पूरी ठाकूर यांची राजकीय ताकद प्रचंड वाढली आणि बिहारच्या राजकारणात ते समाजवादाचा मोठा चेहरा बनले.
लालू-नितीश हे कर्पूरी ठाकूर यांचे शिष्य आहेत
बिहारमध्ये समाजवादाचे राजकारण करणारे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे कर्पूरी ठाकूर यांचे शिष्य आहेत. जनता पक्षाच्या काळात लालू आणि नितीश यांनी कर्पूरी ठाकूर यांचे बोट धरून राजकारणाच्या युक्त्या शिकल्या. अशा परिस्थितीत बिहारमध्ये लालू यादव सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्पूरी ठाकूर यांचे काम पुढे नेले. त्याचबरोबर नितीशकुमार यांनीही अत्यंत मागासलेल्या समाजाच्या बाजूने अनेक गोष्टी केल्या. (Latest Marathi News)
बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकूर यांचं महत्वाचं स्थान
निवडणूक विश्लेषकांच्या मते बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकूर यांना डावलता येणार नाही. कर्पूरी ठाकूर यांचे 1988 मध्ये निधन झाले, परंतु इतक्या वर्षांनंतरही ते बिहारच्या मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या मतदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. महत्वाचं म्हणजे, बिहारमध्ये मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या लोकांची लोकसंख्या सुमारे 52 टक्के आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने कर्पूरी ठाकूर यांचे नाव घेत असतात. त्यामुळेच 2020 मध्ये काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ‘कर्पूरी ठाकूर सुविधा केंद्र’ उघडण्याची घोषणा केली होती.