देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सांस्कृतिक वैविध्य आणि धार्मिक एकता महत्त्वाची – नूर जहीर

Story by  Sameer D. Shaikh | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
 नूर जहीर
नूर जहीर

 

समीर दि. शेख 

१९५८ मध्ये लखनऊ येथे जन्मलेल्या नूर जहीर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. लेखिका, कार्यकर्त्या, नाटककार आणि अभिनेत्री या चार भूमिका त्यांनी सशक्तपणे पेलल्या आहेत. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. साहित्य आणि चळवळीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांची आई रझिया आणि वडील सज्जाद जहीर उर्दूतील प्रथितयश लेखक होते. सोबतच  ते  प्रगतीशील लेखक संघाच्या संस्थापकांपैकी होते.  
 
नूर जहीर यांच्या कार्याची सुरुवात पत्रकार म्हणून झाली. देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणाऱ्या शाहबानो खटल्याचे वार्तांकन त्यांनी केले. त्यावेळी सुरू झालेल्या राजकीय व सामाजिक घुसळणीने त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तीला अंतर्मुख होण्यास भाग पाडले. देशातील वातावरणामुळे त्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी धर्माचा आणि संविधानाचा नव्याने अभ्यास सुरू केला. त्यातून महिलांच्या प्रश्नांकडे आणि त्यातही मुस्लिम महिलांच्या प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांना मिळाली.

हे प्रश्न सोडवायचे असतील तर एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागणार असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यासाठी समाजप्रबोधन आणि लोकशिक्षण गरजेचे असल्याचेही त्यांच्या लक्षात आले, मग त्यासाठी उपलब्ध असलेले सर्व मार्ग त्यांनी हाताळले. शाहबानो खटल्यावेळी आलेल्या अनुभवांतून आणि अभ्यासातून ‘माय गॉड इज वुमन’ ही त्यांची पहिली कादंबरी आकाराला आली. आणि त्यांच्या साहित्यिक जीवनाचा प्रारंभ झाला. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये त्या तितक्याच ताकदीने लेखन करतात. ‘मेरे हिस्से की रोशनाई’, ‘स्याही की एक बूँद’ (स्मृतिचित्रे); ‘रेत पर ख़ून’, ‘ख़ामोश पहाड़’, ‘सुलगते जंगल’ (कथासंग्रह); ‘बड़ उरइय्ये’, ‘माइ गॉड इज़ ए वुमन’ (कादंबरी); ‘सुर्ख़ कारवाँ के हमस़फर’, ‘एट होम इन एनिमी लैंड’ (प्रवासवर्णन); ‘पत्थर के सैनिक’ (नाटक); ‘दि डांसिंग लामा’ (बौद्ध अभिनयात्मक कलेवरील शोध), ‘उत्तर पश्चिमी हिमालय में बौद्ध, आदिवासी और मौखिक परम्परा’ (अभ्यास); ‘डिनाइड बाइ अल्लाह’ (चर्चात्मक); ‘आज के नाम’ (फैज़ अहमद फैज़ यांचे चरित्र); ‘उर्दू में आरम्भिक महिला लेखन’ (संकलन आणि इंग्रजी अनुवाद) या त्यांच्या काही प्रमुख साहित्यकृती आहेत. त्यांच्या टोकदार आणि स्त्रीवादी मांडणीने परंपरावाद्यांना अस्वस्थ केले. नूर जहीर यांनी या विरोधाचा धैर्याने सामना केला.

लेखन करत असतानाच नाटक हेसुद्धा समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, अशी जाणीव झाल्यामुळे त्यांनी नाटकाचे शिक्षण घेतले. त्या नाटककार व अभिनेत्री झाल्या. नाटक संपल्यावर प्रेक्षकांशी चर्चा करत त्यांचे प्रबोधन करण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला. अधिकाधिक जनसमुदायापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी पथनाट्याचाही आधार घेतला. ‘भारतीय जन नाट्य संघ’ (दिल्ली) या संस्थेच्या त्या अध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिवही राहिल्या.  
हे सर्व सुरू असताना त्यांच्यातला कार्यकर्ता नेहमी जिवंत राहिला. मुस्लिम समाजात काम करण्याची गरज असल्याची जाणीव त्याच संवेदनशीलतेतून आली. कार्यकर्ता म्हणूनही मुस्लिम समजात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यावर पडलेले दिसते.

संशोधक म्हणूनही त्यांच्या अभ्यासाचे क्षितिज प्रचंड विस्तारलेले आहे. याची प्रचिती त्यांनी केलेल्या संशोधनातून होते. ट्रायबल अँड बुद्धिस्ट ओरल ट्रेडिशन्स ऑफ नॉर्थ वेस्टर्न हिमालया, अर्ली वूमन रायटिंग्स इन उर्दू : लघुकथा, कविता, नाटक आणि लेख यांचे संकलन असलेले चार खंड, बुद्धिस्ट  अँड सुफी इलेमेंटस इन बाऊल मिस्टिसिजम हे त्यांचे संशोधन ग्रंथ आहेत.

नूर जहीर यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी आणि त्यायोगे देशातील सामाजिक व सांस्कृतिक पैलू उलगडवण्यासाठी नूर जहीर यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - तुमची आई आणि वडील दोघेही उर्दूतील प्रसिद्ध साहित्यिक होते. ते प्रगतिशील लेखक संघाच्या संस्थापकांपैकी होते. त्यांच्या सान्निध्यात तुमचं बालपण कसं गेलं?
- बालपणातला माझा प्रत्येक दिवस खास असायचा. मोठे लेखक, राजकारणी असं कोणी ना कोणी घरी आलेलं असायचं.  बुटाची लेस बांधायला मला कैफी आजमींनी शिकवलं. लहानपणीच मला एक गोष्ट लक्षात आली ती ही की, साहित्य आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. जर तुम्ही साहित्यिक आहात तर तुम्ही राजकारणापासून अजिबात लांब  राहता कामा नये, अशा प्रकारच्या चर्चा घरी सर्रास व्हायच्या. मग त्या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सोबत असोत, केरळच्या वैलाथोल यांच्या सोबत असोत किंवा तामिळनाडूच्या दामोदर यांच्या सोबत. घरात भाषेच्या सीमा नव्हत्या. कुणाला हिंदी किंवा उर्दू येत नसेल तर त्यांच्याशी इंग्रजीत चर्चा व्हायची. किंवा उपस्थितांपैकी कुणी त्या चर्चेचा अनुवाद प्रादेशिक भाषेत करत असे. त्या वेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, धर्म, जाती, भाषा आणि संस्कृती यांबाबत आपल्या समाजात प्रचंड विविधता आहे. मात्र सगळ्यांसोबत मिळून काम करायचंय- त्यामुळे संवाद तर साधायलाच हवा. या घटना माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होत्या.

अजून एक गोष्ट- लखनौचं आमचं घर रेल्वेस्टेशनच्या अगदी जवळ होतं. त्यामुळं आमच्या ओळखीचं लखनौला कुणी आलं की त्यांचा मुक्काम आमच्या घरीच असायचा. बऱ्याचदा असं व्हायचं की रात्री आम्हां मुलांना आई लवकर जेवू घालायची आणि झोपवायची. त्या वेळी घर अगदी मोकळं असायचं. मात्र सकाळी उठून पाहायचो तर मोठ्या खोलीत चारपाच लोकं झोपलेली असायची. व्हारांड्यात काही लोकं झोपलेली असायची. आणि आम्ही त्यांच्यातून रस्ता काढत शाळेला जायचो. तेव्हा कळायचं की मुल्कराज आनंद एकीकडं झोपलेत तर दुसरीकडं अली सरदार जाफरी. हा वारसा मी माझ्या आताच्या घरीही जपलाय. जर माझ्या शहरात बाहेरून आलेल्या एखाद्याला राहण्यासाठी जागा नसेल तर माझ्या घराचे दरवाजे सदैव उघडे असतात. 
 
लहानपणी साहित्यासोबतच प्रेम आणि रसिकता यांचीही जाणीव झाली. घरात धर्म, जाती, वय, प्रदेश यांबाबत कुठलाही भेदभाव नव्हता. त्यामुळे माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या. 

प्रश्न - तुमच्या कुटुंबाचं साहित्य आणि सामाजिक प्रबोधनात महत्त्वाचं योगदान राहिलंय. यामागची त्यांची प्रेरणा काय होती? त्यांच्या स्वप्नातला भारत आणि समाज कसा होता?
- सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांपैकी कुणालाच भारताचं विभाजन नको होतं. माझ्या जन्मापर्यंत (1958) विभाजनाचा किस्सा जुना झाला होता. मात्र तेव्हाही सगळ्यांच्या तोंडून विभाजन व्हायला नको होतं हेच ऐकायला यायचं. आता झालंच आहे तर कधी ना कधी ही दरी संपुष्टात येईल, असं वाटायचं.

विभाजनानं समाजाचं मोठं नुकसान केलं. एक दिवस असा येईल की देशातली गरिबी, जमातवाद, अशिक्षितता संपुष्टात येईल. इथं महिलांना समानतेचा अधिकार मिळेल. सगळे मिळून देशाला प्रगतिपथावर नेतील. सगळीकडे प्रेमच प्रेम असेल असं स्वप्न कुटुंबीय पाहत होते. त्या वेळी धर्म एक क्षुल्लक गोष्ट समजली जात होती. अगदी वैयक्तिक. त्यामुळं राजकारणात धर्म येणारच नाही असं वाटायचं. धर्मामुळे सामाजिक अंतर वाढेल, प्रेम संपेल असं वाटतच नव्हतं. असा समाज असेल ज्यात अंतर असेलच तर ते वेगळ्या प्रकारचं असेल. तुम्हांला कदाचित हसू येईल, पण मी टॉलस्टॉय मोठा की दोस्तोव्हस्की मोठा यावर जोरदार भांडण पाहिलं होतं. हिंदू श्रेष्ठ की मुसलमान अशी भांडणं लहानपणी मी कधीच बघितली नव्हती. आपला समाज आज तसाच असता तर किती बरं झालं असतं.

प्रश्न - मोठं होऊन तुम्हांला काय व्हायचं होतं?
- लहानपणापासूनच माझं नृत्यावर फार प्रेम होतं. मात्र त्या क्षेत्रातला माझा प्रवेश थोडा विचित्र पद्धतीने झाला. हिंदीतले प्रसिद्ध साहित्यकार अमृतलाल नागर माझ्या आईचे मानलेले भाऊ होते. एके दिवशी माझी आई तक्रारवजा सुरात म्हणाली, ‘‘माझी लहान मुलगी खोडकर आहे. तिच्यात खूप ऊर्जा आहे. दिवसभर खूप मस्ती घालत राहते.’’ त्यावर नागर म्हणाले, ‘‘हिला नृत्याचा क्लास लाव. नाचून दमेल तर आपोआपच ऊर्जा खर्ची जाईल.’’ सातव्या वर्षी मी नृत्य शिकायला सुरुवात केली. दहाव्या वर्षापर्यंत अशी खात्री पटली की मी नृत्यांगनाच होणार.

लहानपणीच बरंचसं साहित्य वाचलं होतं. बरचंसं पाठांतरही करवून घेतलं होतं. सतरा-अठराव्या वर्षी मी कथ्थकचं सादरीकरण करायला लागले. तोवर मी नृत्यासोबत साहित्यालाही आत्मसात केलं होतं. मी माझ्या संगीतकार गुरूंकडे एखादी कविता घेऊन जात असे आणि तिला चाल लावायला सांगायचे. ते आश्चर्यचकित होऊन विचारायचे, ही कविता तुला कशी ठावूक? मी उत्तर द्यायचे, माहीत नाही पण मला मुखोद्गत आहे. साहित्यासोबतचा प्रवास असाच सुरू होता तरी माझा ओढा नृत्याकडंही होता.

एक काळ असा आला जेव्हा नृत्याच्या माध्यमातून वेगळ्याच प्रकारचे राजकारण केले जात होते. मुस्लिम कथ्थक, हिंदू कथ्थक अशी नावं लोकं देऊ लागले होते. तेव्हा याविरोधात काहीतरी लिहायला हवं अशी प्रकर्षानं जाणीव झाली. शास्त्रीय संगीताला धर्मात विभागू नका. एखादा राग मियां तानसेननं बनवला असेल तर तो काही मुस्लिम राग होत नाही. या सगळ्या बाष्कळ गप्पा आहेत. बनवली असेल मियां की तोडी एखाद्या मुसलमानानं. मात्र आज ते गाणारे हिंदूही आहेत आणि ईसाईदेखील. हे सगळे अनुभव येत होते तेव्हा वाटलं की, आता लिहिण्याला पर्याय नाही. 

प्रश्न - तुमचा पत्रकारितेचा प्रवास कसा राहिला? ते सोडून कार्यकर्ता होण्याचा निर्णय केव्हा आणि का घेतला?
- माझ्या सुदैवानं विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. त्यांपैकीच अक्षयकुमार जैन. ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे संपादक होते. मी मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केलं असल्यामुळं प्रशिक्षणार्थी म्हणून तिथं रुजू झाले. त्यानंतर रिपोर्टिंगही करू लागले, विशेषकरून सांस्कृतिक कार्यक्रमांचे. इथून माझा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला आणि पुढे १० वर्षे चालला. टाइम्स सोडून मी ‘पेट्रीयट’मध्ये रुजू झाले. हे वृत्तपत्र माझ्या विचारधारेला पूरक असल्याचं मला जाणवलं. त्या वृत्तपत्राच्या मालक-संपादक अरुणा असफअली या आमच्या प्रेरणास्थान होत्या. एक दिवस त्या मला म्हणाल्या, ‘‘सर्वोच्च न्यायालयात शहाबानोचा खटला सुरू आहे. मला वाटतं ते तू कव्हर करावं आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्याविषयी लिहावं.’’ मला या खटल्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यामुळे मी शाहबानोचे वकील दानियाल लतिफी यांच्याकडे गेले. योगायोगानं तेही माझ्या वडलांचे कॉम्रेड मित्र निघाले. त्यांनी सांगितलं की, हा विषय गप्पांमध्ये सहज सांगता येण्यासारखा नाही. तू एक काम कर, या खटल्याचा सेशन कोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास समजून घे. मग मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन खटल्याचा अभ्यास करू लागले. अशा पद्धतीच्या इतर खटल्यांबाबतही मी वाचू लागले. तेव्हा एका गोष्टीची प्रकर्षानं जाणीव झाली. लहानपणी आजीमुळे जे कुराण वाचले होते, ते मला पूर्णपणे समजलेले नव्हते. त्यामुळे कुराणसोबतच इस्लामिक कायदा आणि संविधानही वाचायला हवंय याची जाणीव झाली. शिवाय मुस्लिम समाजात काम करण्याची जास्त गरज आहे हेही प्रकर्षानं जाणवलं. त्याच वेळचा आणखी एक विदारक अनुभव सांगता येईल. १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली सुरू होत्या. अरुणाजी पत्रकाराबरोबरच कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी आमच्याकडे बिस्कीटचं एक पोतं आणि किटली दिली. ‘‘पीडितांमध्ये याचं वाटप करा.’’ त्या वेळी शीशगंज गुरुद्वारा आणि हरकिशन सिंह पब्लिक स्कूलमध्ये शीख मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. बिस्किटं-चहा घेऊन आम्ही तिकडं गेलो. तिकडं मी पाहिलं की हिंदू जमावाला शिखांविरोधी भडकवलं जात आहे. फुटीरतेसाठी प्रयत्न सुरू आहेत असं मला आढळलं.

प्रश्न - विविध माध्यमांमधून तुम्ही समाजसुधारणेचा पुरस्कार केला, यावर समाजाची काय प्रतिक्रिया होती? विशेषकरून मुस्लिम समाजाची? 
- त्यावरची प्रतिक्रिया अनपेक्षित नव्हती. समाजात दोन गट पडले. एक गट पुरुषी मानसिकता असलेल्यांचा. इथं मी पुरुषांविषयी बोलत नसून मानसिकतेविषयी बोलत आहे जी महिलांमध्येपण आढळते. ती अशी की, मुसलमानही नाही आणि आमच्या बाजूचीही नाही. त्या वेळी माझी पहिली कादंबरी ‘माय गॉड इज वुमन’ प्रकाशित झाली होती. त्याविषयी या मंडळीचं म्हणणं होतं की, या बार्इंनं हे पुस्तक इंग्रजीत यासाठीच लिहिलंय की या वादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळावं आणि मुस्लिमांची बदनामी व्हावी.

मात्र दुसरा गट संख्येनं मोठा होता. त्यात स्वाभाविकच प्रगतीशील विचारधारेचे लोक होते. पुरुषही होते जे महिलांच्या हक्कांसाठी पुढे आले आणि मला पाठिंबा दिला. या मंडळींना वाटत होतं की, प्रत्येक ठिकाणी बदलासाठी आणि अधिक उत्तम करण्यासाठी वाव आहे. जर आपण बदलाची शक्यताच संपवली तर आपण परंपरावादी ठरू आणि साचलेपण येईल. साचलेल्या पाण्यात काही दिवसांनी दुर्गंधी पसरणारच आणि ते पिण्यायोग्य राहणार नाही. त्यासाठी आपण अंतर्गत बदल आणि स्वच्छता करत राहणं आवश्यक आहे; असा विचार असणारे लोक माझ्या सोबत आले आणि माझा धीर वाढवत राहिले. यानंतर माझं दुसरं पुस्तक ‘डिनाइड बाय अल्लाह’ आले. काही कथाही प्रकाशित झाल्या. त्या वेळीसुद्धा ही मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘हे संशोधनात्मक लेखन आहे. त्याला नाकारून चालणार नाही. त्याचा स्वीकार केल्यानंतर आपला फायदाच होणार आहे’’.

प्रश्न - तुमच्या इतर पुस्तकांप्रमाणेच ‘मेरे हिस्से की रोशनाई, स्याही की एक बूँद’ ही दोन स्मृतिचित्रेही महत्त्वाची आहेत, त्याबद्दल काय सांगणार?
- वातावरण बिघडवून समाजातली दरी वाढवण्याचा जो प्रकार दिसतोय, मला वाटतं हे काल्पनिक आहे. आणि ती दरी जाणीवपूर्वक वाढवली जात आहे. त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे की असा एक काळ होता जेव्हा समाजामध्ये इतकं अंतर पडलेलं नव्हतं, तो काळ अगदी अलीकडचाच आहे.  त्या वेळचं वातावरण खूप सुंदर होतं. समाजात प्रेम जिवंत होतं. आम्ही एक-दुसऱ्यासोबत केवळ सुखदु:खंच वाटत नव्हतो तर एक-दुसऱ्यांशी मौजमस्तीही करायचो. लहानपणी माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, ‘‘तू तो मुलाणी है तो जुम्मे के जुम्मे नहायेगी.’’ त्यावर मी म्हणायचे, ‘‘तुम तो कौए हो जो सुबह-शाम पानी में डुबकी लगाया करते है।’’ त्या वेळी कुणाच्या भावना दुखावल्या जात नव्हत्या.

या दोन पुस्तकांमध्ये त्या काळाचा पट मांडला आहे. त्यात मैत्री-प्रेम-विनोदही आहे आणि एक-दुसऱ्यांसोबत केलेले वादविवादही आहेत. समाजाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नवनिर्मिती कशी करता येईल यावर आम्ही खूप खल करायचो. हा देश जो इतका सुंदर आहे त्याला अधिक सुंदर कसं बनवता येईल याचं चिंतन माझ्या आईवडलांची पिढी आणि माझीही पिढी करायची. सद्गुणाला मर्यादा नसतात ही बाब मला मांडायची होती. आणि त्याचीच गोष्ट या दोन पुस्तकांत आहे. ‘मेरे हिस्से की रोशनाई’मध्ये माझ्या वडलांविषयी - सज्जाद जहीर - यांच्याविषयी लिहिलं आहे, तर ‘स्याही की एक बूंद’मध्ये माझी आई रजिया जहीर हिच्या आठवणी जागवल्या आहेत. या दोन स्मृतिचित्रांमधून मी पुढं जाण्यासाठी मागं वळून पाहिलं आहे. 

प्रश्न - तुमच्या पुस्तकांवर वाचकांच्या काय प्रतिक्रिया राहिल्या? कार्यकर्ता म्हणून त्याचा काय फायदा झाला?
- ‘डिनाइड बाय अल्लाह’चा अनुवाद आठ भाषांत झालाय. तर ‘माय गॉड इज वुमन’ भारताच्या नऊ भाषांमध्ये अनुवादित झाली असून, तिचा फ्रेंच अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शायराबानो आणि इतर याचिकाकर्त्यांमुळं ‘तीन तलाक’ संपुष्टात आला. त्या याचिकेत डिनाइड बाय अल्लाहचा एके ठिकाणी उल्लेख करण्यात आला होता याचा मला आनंद आणि अभिमान आहे. आमची लढाई इथपर्यंतच नव्हती. बहुपत्नीत्वावर बंदी आणणारा कायदाही आम्हांला हवा आहे. आमचा लढा सुरू आहे. साहजिकच परंपरावाद्यांची  टीका सहन करावी लागते, रोषाला सामोरं जावं लागतं. तीन महिन्यांपूर्वी मी लंडनमधल्या एका मशिदीत गेले होते. त्या वेळी लोक घोषणाबाजी करत होते- ही महिला इस्लामविरोधी लेखन करते. त्या वेळी मौलवीसाहेबांशी चर्चा केली. त्यांना सांगितले की, ‘मी इस्लामच्या विरोधात लिहीत नाही. मात्र मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, महिलांना मागं ठेवून समाजाला काय फायदा होतोय? जर तुम्ही मला ते फायदे सांगू शकलात तर मी तुमची गोष्ट मान्य करेल आणि मी जे लेखन केलंय ते चूक आहे याची कबुली देईल. आणि तुम्ही ते फायदे सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही त्याची जाहीर कबुली द्या.’ माझ्या या प्रस्तावामुळे त्यांचा चेहरा रागानं लालबुंद झाला. उलट म्हणाले, ‘‘मी स्त्रियांशी हुज्जत घालत नाही’’. आणि त्यांनी काढता पाय घेतला. अर्ध्या तासानं ते परत आले आणि मला सांगू लागले, ‘‘मोहतरमा आपने दुपट्टा ठीक से नहीं ओढा है।’’ जागोजागी तुम्हांला अशा पद्धतीनं अपमानित केलं जातं. मात्र तुम्ही तयार राहायला हवं. मी पलटवार करत म्हणाले,  ‘‘तुम्ही तुमची नजर खाली ठेवा. कुराणात पुरुषांना आदेश देण्यात आलाय की परस्त्रीकडं पाहू नये. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे पाहिलेच कसे?’’. 

आपण मुस्लिमांचे नेतृत्व आणि प्रवक्तेपद मुल्ला- मौलवींकडून काढून घ्यायला हवे. हे काम पन्नास वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. मी कशा प्रकारचं जीवन जगावं, माझा दृष्टिकोन काय असावा, माझ्या मुलांनी कुठलं शिक्षण घ्यावं- यांसारख्या व्यक्तिगत गोष्टींवर मुल्ला-मौलवींचा हस्तक्षेप नसावा. माझ्या मुलीला जर बाहेर जाताना हिजाब घालायचा असेल वा नसेल तर मी तिच्या पाठीशी असायला हवं. त्यांनी नमाजाचं नेतृत्व करावं आणि निकाह पढावेत. तसं पाहिलं तर निकाहसाठीसुद्धा मौलवीची गरज पडत नाही. अंतिम संस्काराच्या वेळी, नमाज-ए-जनाजाच्या वेळीही मौलवींची गरज नाही. कुरआन सांगते- आम्ही तुम्हांला धर्म सांगितलाय. तुम्ही त्याचा आपापल्या पद्धतीनं अर्थ लावा आणि आचरण करा. अनाहुत सल्ले देणाऱ्यांना आपण चार हात दूरच ठेवलं पाहिजे.

प्रश्न - तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात कशा गेलात?
- एक नाट्य-दिग्दर्शक होते. त्यांना ग्रीक नाटक बसवायचे होते. त्यात बारातेरा जणांचे कोरस होते. त्या नाटकाला संगीत व नृत्य दिग्दर्शन करावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. मी ती आनंदानं स्वीकारली. त्या वेळी आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटलं. त्यानंतर मी दीड वर्ष नाटकाचं प्रशिक्षण घेतलं आणि मग नाटकामध्ये काम करू लागले. मी केवळ नाटकात काम करणार नाही. ते संपल्यानंतर नाटकात मांडण्यात आलेल्या समस्येविषयी प्रेक्षकांशी संवादही साधेल हे मी सुरुवातीलाच ठरवलं होतं. इथून ॲक्टिंग आणि ॲक्टिव्हिझमचा दौर सुरू झाला. मग वाटले- नाटक वीस पंचवीस मिनिटांचे असे लहान असायला हवे. मग मी पथनाट्य करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहापंधरा मिनिटांत नाटक संपू लागलं आणि थेट प्रेक्षकांशी संवाद साधता येऊ लागला. सुदैवानं त्या वेळी जर्मन दिग्दर्शक फ्रीट्‌झ बेनवीट्‌स भारतात आले होते. मी त्यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले. मी त्यांना मला त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी द्यावी असा आग्रह केला. ॲक्टिंग आणि ॲक्टिव्हिझम हातात हात घालून चालू शकतात आणि ते समाजासाठी आवश्यकही आहे ही बाब मी त्यांच्याकडून शिकले. केवळ मनोरंजनासाठी नाटक होऊ शकत नाही, किमान माझ्यासाठी तरी. 

प्रश्न - तुम्ही संवेदनशीलपणे समाजाकडे पाहता. तुम्हांला भारतीयांच्या मानसिकतेबाबत काय वाटतं?
- सगळ्या समुदायांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. त्याचं प्रमाणही खूप आहे. प्रत्येकाचं कारण भिन्न असेल. त्यामुळेच लोकं अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसतात. याविरोधात लढण्याची गरज आहे. रशीदा जहाँ या उर्दूच्या आरंभकाळातील लेखिका पेशानं डॉक्टर होत्या. त्यामुळे त्यांना लोकांच्या घरात सहज प्रवेश मिळायचा. त्यांना दिसलं की घरातल्या महिला या असुरक्षिततेमुळे गंडेदोरे आणि बुवा-बाबांच्या पूर्णपणे आहारी गेल्या आहेत. आपल्याला अशा भीतींशी लढलं पाहिजे. त्यांच्या कथांमधून आपल्याला याचं विदारक चित्रण दिसतं.

डॉ. नरेंद्र दाभोलकरही म्हणायचे, ‘‘डोळे उघडून पाहा, सिद्ध करा आणि शक्य नसेल तर माझ्याशी संवाद करा. मी या अंधश्रद्धेची दुसरी बाजू तुम्हांला दाखवून देतो’’. अशा पद्धतीनं संवाद गरजेचा आहे. दुर्दैवानं तो कमी-कमी होत आहे. 

पण हा फक्त धर्माचाच अंकुश आहे असं वाटत नाही. भांडवलशाहीसुद्धा त्याला तितकीच कारणीभूत आहे. तुम्ही इतके एकटे पडता आणि इतकं असुरक्षित वाटतं की, धर्माला शरण जाण्याशिवाय तुमच्याकडं काहीच पर्याय राहत नाही. आज लोक दहा-बारा तास मशीनवर बसून काम करताहेत, भांडवलशाहीचं हे स्वरूप अमानवीय आहे. 

प्रश्न - मुस्लिमांची सामाजिक स्थिती कशी आहे? त्याला कोण कारणीभूत आहेत?
- मला वाटतं, मुस्लिमांमध्ये आंबडेकरांसारखं नेतृत्व उदयास न आल्यामुळं त्यांचा मागासलेपणा कायम राहिला. डॉ. आंबेडकर एकीकडं संविधान लिहीत होते आणि दुसरीकडं दलित समाजाशी संवादही करत होते. काम करत होते. त्यांनी काय करावं आणि काय करू नये याचं मार्गदर्शनही करत होते. मुस्लिमांमध्ये असं नेतृत्व तयार होऊ शकलं नाही. डॉ. जाकिर हुसैन यांना त्यात काही अंशी यश आलं. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून ते बाहेर पडले. ‘‘या विद्यापीठात जमीनदारांची मुलंच शिकतात. ‘‘मला गरिबांची काळजी आहे,’’ असं म्हणत त्यांनी जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाची स्थापना केली. तीही कुठं- तर दिल्लीतल्या गरीब आणि अशिक्षित मुस्लिमांच्या मोहल्ल्यात. लोक त्यांना विचारायचे, इथं कोण प्रवेश घेणार? पण आज हे देशातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक आहे. गरिबांसाठी अशा आणखी विद्यापीठांची गरज होती आणि याच गरीब मुस्लिमांनी पाकिस्तानच्या निर्मितीला कडाडून विरोध केला होता. ते पाकिस्तानला गेले नाहीत, कारण इथल्या जमिनीशी त्यांची नाळ जोडली गेली होती. या लोकांसाठी गेल्या 75 वर्षांत नीटसं काम झालं नाही. सच्चर समितीही याकडं लक्ष वेधते आणि म्हणते की, मुस्लिमांत गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण इतर समाजांपेक्षा अधिक आहे.

प्रश्न - सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्यात सरकारला अपयश का आले?
- माहितीचा अधिकार लागू करण्यात प्रमुख भूमिका असणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्याशी एकदा मी चर्चा करत होते. त्या वेळी कायदा बोथट करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यावर मला दु:ख झालं. माझा निराशेचा सूर ऐकून अरुणाताई धैर्यानं म्हणाल्या, ‘‘चांगल्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. गेल्या दहा वर्षांत आम्ही या कायद्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. काही वर्षांनी हा कायदा संपवण्यात येईल याची आम्हांला खात्री होती. कारण त्यातून आपलं नुकसान होत असल्याचं सरकार पक्षाला लक्षात येईल. भविष्यात आणखी एखादा चांगला कायदा येईल. तो दहा-पंधरा वर्षं चालेल. त्या काळात आपण त्या कायद्याचा जास्तीतजास्त उपयोग करायला हवा. काम सुरू ठेवायला हवे’’. 

मुस्लिमांच्या उन्नतीसाठी प्रयत्न होत राहिले आहेत. आंबडेकर म्हणाले होते की, शिक्षण हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेताना दिसत आहेत आणि मोठ्या पदांवरही जात आहेत. मात्र मुस्लिम मुलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. सगळ्या भारतीय समाजाचीच ही शोकांतिका आहे. मुलगा अंतिम संस्कार करेल, मुलगा घर चालवेल- अशा सामाजिक कारणांमुळे आपण मुलांना विनाकारणच महत्त्व दिलंय. या प्रेमापायीच ते शिकत नाहीयेत. दुसरीकडं मुलीच्या आईवडिलांना वेगळीच काळजी सतावत आहे की, आमच्या उच्च शिक्षित मुलीचं लग्न अल्प शिक्षित मुलाशी कसं करावं? यामुळे उलट बऱ्याच ठिकाणी मुलींना उच्च शिक्षण घेण्यापासून रोखलं जात आहे. 
 
प्रश्न – भारताच्या भविष्याविषयी साहित्यिक म्हणून तुम्हाला के वाटते?
- समाजात परिवर्तन दोनच घटक आणू शकतात असं मला वाटतं, एक म्हणजे महिला आणि दुसरं म्हणजे साहित्यिक. त्यात आपण सिनेमा आणि नाटककारांनाही जोडू या. या घटकांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, मग ते हिंदू असोत वा मुस्लिम. त्यांनी अशी नवनिर्मिती करायला हवी की त्यातून समाजात जागृती येईल. आता तुम्ही म्हणाल, कलाकर कसे तयार होतील? तर  मला वाटतं त्यात शिक्षणाची भूमिका मोठी असेल. परिवर्तनासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. 

दुसरी गोष्ट ॲक्टिव्हिझमची. आपण सगळ्यांनी कार्यकर्ता होण्याची गरज आहे. आपण ठरवून टाकलंय की एक वर्ग चळवळी करेल आणि दुसरा वर्ग योजना आखेल. पण विभागून काम करण्याची ही वेळ नाही. मला लोक विचारतात, तुम्ही चारपाच क्षेत्रांत भ्रमंती का केली? त्यावर मी उत्तर देते, की मला खूप काही करायचं होतं; पण आयुष्य एकच आहे- त्यामुळे मी जमेल तेवढ्या गोष्टी केल्या. 
अजून एक धोक्याची बाब मला जाणवते ती म्हणजे, हिंदूंमधली सहिष्णुता हळूहळू संपुष्टात येऊ लागलीये. आमचं घर गोमती नदीच्या किनाऱ्यावर होतं. लोक तिथं अंघोळीला जात असत. वडलांना बघून स्मितहास्य करत आणि ‘जय सियाराम’ म्हणत. त्यावर माझे वडील म्हणायचे, ‘‘बघा, यांचा धर्म किती उन्नत आहे. इथं महिलेचं नाव आधी घेतले जाते.’’ आता मात्र हे सगळं बदललंय. ‘जय श्रीराम’ अशी घोषणा झालीये. पितृसत्ताक कशा पद्धतीनं आगेकूच करत आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. ‘इसलिए हमें जय श्रीराम से लढना है और उनसे पूछना है, कि हमारी सिया कहाँ गयी।’ ही लढाई आपल्याला अनेक स्तरांवर लढायची आहे आणि त्यासाठी एकमेकांशी संवाद करत आपली ऊर्जा वृद्धिंगत करायची आहे. 

प्रश्न – भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सांस्कृतिक विविधता आणि धार्मिक एकता का महत्त्वाची आहे असे आपल्याला वाटते?
- भारतात जे होतंय ते पाहून राग तर येतोच पण त्रास जास्त होतो आणि कधीकधी हसूही येतं. सांस्कृतिक ओळख अशी संपवता येत नाही. माझ्या एका नाटकातला प्रसंग मला आठवला. महत्प्रयासानं संत कबीर स्वर्गातून पृथ्वीवर येतात. त्यांना त्यांचं बनारस पाहण्याची इच्छा असते. ते पोस्ट ऑफिसचा बोर्ड पाहतात तर त्यावर ‘वाराणसी’ लिहिलेलं असतं. विद्यापीठाच्या नावातही वाराणसी असा शब्द असतो. ते म्हणतात, ‘‘मैं तो गलत जगह उतर गया हूँ। ये तो मेरा बनारस नहीं है।’’ शेजारी छोले-भटूरे विकणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणाचं नाव विचारतात. तो उत्तरतो, ‘‘बनारस है।’’ त्यावर कबीर म्हणतात, ‘‘चलो, मैं ठीक जगह आ गया।’’

काही लोक माझ्यावर रागवतील की मी सारखी पाकिस्तानशी तुलना करतेय. पाकिस्तानात शास्त्रीय रागांची नावंदेखील बदलण्यात आली. त्यांना इस्लामिक नावं देण्यात आली. गुलाम अली पाकिस्तानला गेले. त्यांचा पहिला कार्यक्रम लाहोरमध्ये होता. एक छोटा खयाल गाताना, त्यात कन्हैयाचा उल्लेख आला. प्रेक्षकांमधून एक जण म्हणाला, ‘‘यह हिंदू गाना यहाँ मत गाइये.’’ त्यावर ते तडक उठले आणि म्हणाले, ‘‘मैं जा रहा हूँ यहाँ से वापस. क्यूँ कि मैं अगर यह गा नहीं सकता तो मुझे यहाँ नहीं रहना है।’’ आणि ते भारतात परतले. कुर्तलैन हैदर यामुळेच भारतात परतल्या, कारण त्या म्हणायच्या, माझ्या रक्तात बुद्ध आणि हिंदू धर्मही मिसळलेला आहे. त्यावर त्यांच्यावर टीका होऊ लागली आणि ‘आग का दर्या’ ही कादंबरी लिहिल्यानंतर त्या पाकिस्तानात थांबल्या नाहीत. हेच आता भारतात होताना दिसतंय. 
‘तो ये दौर चलेगा। कुछ नाम बदले जाएंगे, पर कुछ मिसालें बाकी रहेंगी!’

- समीर दि. शेख