"व्यापार-गुंतवणुकीची क्षमता पूर्णपणे वापरा," जयशंकर यांचा रशियाला सल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत मॉस्कोचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत मॉस्कोचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव

 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशिया दौऱ्यावर असताना, दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीची 'पूर्ण क्षमता' वापरण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मॉस्को येथे रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, जयशंकर यांनी आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेची तयारी करण्यासाठी जयशंकर सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) कामकाजाचा आढावा घेण्यात आला.


या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी 'X' वर पोस्ट केले, "आज मॉस्कोमध्ये उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांची भेट घेऊन आनंद झाला. आमच्या आर्थिक सहकार्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंधांची पूर्ण क्षमता वापरण्याची गरज आम्ही दोघांनीही मान्य केली."


या चर्चेत दोन्ही बाजूंनी ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला. भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक संतुलित आणि स्थिर कशी करता येईल, यावरही विचारविनिमय झाला.


अमेरिकेसोबतच्या व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर, जयशंकर यांचा हा रशिया दौरा आणि त्यातील आर्थिक सहकार्यावरील भर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यातून भारत आपल्या सर्व प्रमुख भागीदार देशांसोबतचे संबंध स्वतंत्रपणे जपत असल्याचे संकेत मिळत आहेत.