राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६ नागरिकांना धर्म विचारून मारण्यात आले. यामुळे देशात संतापाची लाट उसळली. आपण सर्वाप्रति मैत्रीपूर्ण भाव ठेवू, तरीही आपल्या सुरक्षेसाठी अधिकाधिक सजग राहावे लागेल आणि सक्षम बनावे लागेल, अशी शिकवण ही घटना देऊन गेली. या घटनेमुळे आपले मित्र कोण, शत्रू कोण आणि ते किती प्रमाणात आहेत हे दिसून आले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. तर विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, प्रांत सह संघचालक श्रीधर घाडगे, महानगर संघचालक राजेश लोया आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याला शासन आणि लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्या लष्कराचे शौर्य आणि समाजाची एकता याचे उत्कृष्ट चित्र दिसून झाले. देशातदेखील अशी असंवैधानिक तत्त्वे असून देशाला ती अस्थिर करू इच्छितात, असेही डॉ. मोहन भागवत यांनी (लडाख घटनेचा उल्लेख न करता) नमूद केले.
भारतात आशेचा किरण !
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ धोरणावर भागवत म्हणाले, की अमेरिकेने आपल्या हितासाठी नवीन शुल्क धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम सर्वांवर होत आहे. हे सारे चित्र असे नाही की आपण त्यांच्यावर अवलंबून राहावे. राष्ट्र एकटेपणात जगू शकत नाही; पण अवलंबिता ही नाइलाजामध्ये बदलू नये. ती कधी कशी बदलेल याचा काही ठावठिकाणा नाही.
जागतिक जीवनाची एकता मान्य करीत यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल, स्वदेशीचा अवलंब करावा लागेल, असे डॉ. भागवत म्हणाले. जग भारताकडे अपेक्षेने पाहात आहे. भारतात आशेचा किरण दिसतो. भारताच्या नव्या पिढीत देशभक्तीची भावना सातत्याने वाढत आहे, असेही ते म्हणाले. संघाची शाखा ही सवयी बदलण्याचा मार्ग आहे. संघाला प्रलोभन दाखवण्यात आले, संघाला राजकारणात येण्याचे आमंत्रण मिळाले; पण संघाने तसे केले नाही. प्रत्येक परिस्थितीत स्वयंसेवकांनी शाखा नित्य चालवली, असे डॉ. भागवत म्हणाले.