रोजंदारीवर काम करणाऱ्या इमामुद्दिन यांचा सुपुत्र नौशाद बनला पोस्टमास्तर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
नौशाद त्याच्या आई-वडिलांसोबत
नौशाद त्याच्या आई-वडिलांसोबत

 

- मोहम्मद यूनुस अल्वी, नूंह (मेवात / हरियाणा)
 
हरियाणातील मेवात हा देशातील सर्वांत मागास जिल्ह्यांपैकी एक आहे. देशातील सर्वांत कमी साक्षर भागापैकी हा एक भाग आहे. सध्या याच मेवात  जिल्ह्यातील पिनगवा विभागातील शिक्रावा गाव चर्चेत आले आहे ते तेथील तरुणांच्या प्रेरक कहाण्यांनी.

या गावातले शिक्षित तरुण-तरुणी भारताचे नव्हे तर जगभरात मेवातचे नाव उज्ज्वल करत आहेत. याच गावातील शाजिद हुसेनची लंडनमधील जग्वार लँड रोव्हर कंपनीत मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली. तर इथल्याच शाहबाज अहमदची भारताच्या क्रिकेट संघात निवड झाली. याच गावातील नौशाद अली या तरुणाने या गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या इमामुद्दिन यांचा सुपुत्र, नौशाद याची ‘भारतीय टपाल’मध्ये पोस्टमास्तर  म्हणून निवड झाली आहे. जाणून घेऊया त्याचा संघर्ष आणि त्याच्या यशाची कहाणी...

मेवातच्या पिंगवान विभागातील शिक्रावा गावात लहानाचा मोठा झालेल्या नौशादचे वडील इमामुद्दिन अली रोजंदारीवर काम करतात. घरची परिस्थती बेताचीच. कुटुंबात पाच भाऊ आणि तीन बहिणी. खाणारी दहा तोंडं. वडलांना रोज काम मिळण्याची खात्री नसायची. तरीही, त्यांनी नौशादला शिकवायचंच, अशी खुणगाठ मनाशी बांधली होती.

नौशादही अभ्यासात हुशार होता. त्याने दहावीला ९९.८ टक्के तर बारावीला ८४.२ टक्के गुण मिळवले होते. पुढील शिक्षण तो फरीदाबाद येथील जवाहरलाल नेहरू कॉलेजमधून पूर्ण करत आहे. सध्या तो बीए म्युझिकच्या पहिल्या वर्षाला आहे.

घरची परिस्थिती गरीबीची असल्याने शिक्षण पूर्ण कसे करायचे, हा  मोठा प्रश्न नौशादच्या समोर होता. नौशादला आयएएस अधिकारी व्हायचे होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते. नोकरीला प्राधान्य देणे गरजेचे होते. एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याला टपाल विभागातील शाखा पोस्ट मास्तरच्या पदासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. मार्क चांगले असले तरी आपली काय निवड होणार नाही, या शंकेसहितच त्याने अर्ज केला. आणि ईश्वराच्या कृपेने  शाखा पोस्ट मास्तरपदी त्याची निवड झाली. राजस्थानच्या ढोलपूर जिल्ह्यातील मिल्सामा गावात त्याची नियुक्ती करण्यात आली. 

निकालाची बातमी सर्वप्रथम त्याने आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि मित्रांना सांगितली. या यशाने तो भारावून गेला होता. हे यश परिसरातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नोकरीसोबतच राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा त्याचा मानस आहे. आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी युपीएससीचा अभ्यास करण्याचेही त्याने ठरवले आहे. 

नौशाद म्हणतो, “ दरवेळी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रमंडळी मला नेहमी प्रोत्साहित करत असत. एक दिवस तू मोठा अधिकारी बनशील असेही त्यांनी बोलून दाखवले होते. एवढ्या लहान वयात माझी शाखा व्यवस्थापक पदावर झालेली निवड त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”  

नौशादच्या या यशात त्याच्या कठोर परिश्रमाचा मोठा वाटा आहे. आपल्या परिस्थितीचे कारण देऊन तो कधीही शिक्षणापासून दूर गेला नाही. कठोर परिश्रम आणि समर्पणाने कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा संदेश त्याने आपल्या यशातून दिला आहे. सोबतच मेवातमधील मुलांनी उच्च शिक्षणांसाठी आग्रही राहण्याचा सल्लाही त्याने दिला.
 
(अनुवाद - पूजा नायक)
 
- मोहम्मद यूनुस अल्वी, हरियाणा
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -