बालपणातील रमजान ईदच्या रम्य आठवणी

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 3 Months ago
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी

 

रमजान महिन्याच्या काळात 'आवाज मराठी'वर रोज विशेष लेखन प्रसिद्ध होत आहे. आपल्या सर्वांनाच ईदचे वेध लागले आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्ती त्यांच्या 'आठवणीतली रमजान ईद' शब्दरुपाने मांडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि  मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी सांगताहेत त्यांच्या रमजान ईदविषयीच्या आठवणी ...

मी तसा मराठवाड्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव या खेडेगावचा. स्वातंत्रपूर्व काळात या भागात निजामशाही होती. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर मुस्लीमबहुल भाग पहावयास मिळतो. माझ्या गावात छोट्या-छोट्या तीन मस्जिदी होत्या. त्यातील एका मशिदीचे नाव तांबोळी मशीद होते. हे नाव तांबोळी मोहल्ल्यावरून पडले होते. 

इस्लाममध्ये रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात कुराण अवतरले. हा महिना आत्मशुद्धीचा महिना म्हणूनही ओळखला जातो. इस्लामच्या पाच स्तंभापैकी एक असलेली 'जकात'याच महिन्यात देण्याचा प्रघात आहे, त्यामुळे या महिन्यात लोक दानधर्मही करतात. या महिन्याला अधिकाधिक सज्जनतेकडे नेणारा महिना असेही समजले जाते. इथे सज्जनता म्हणजे सत्याला धरून वागणे. 

माझे वडील फार  शिकलेले नव्हते, मात्र ते नमाजी होते. नमाजी म्हणजे पाच वेळा नमाज पढणारे. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे ते धार्मिक होते मात्र अंधश्रद्धाळू नव्हते. त्यामुळे घरात कायम धार्मिक वातावरण असायचे, मात्र अंधश्रद्धा नव्हती. माझी समज वाढत होती. सुमारे १२-१३ वर्षांचा असताना मी रमजानचे सर्व रोजे करायचो. लोकांची अशी धारणा होती की, रमजाननंतर येणाऱ्या शव्वाल महिन्यात अजून सात रोजे केले तर आणखी पुण्य मिळते. त्यामुळे मी आणि माझी बहिण ते ७ रोजेही करत असू. अशा प्रकारे लहानपणी माझ्या दोन ईद साजऱ्या होत असत. एक रमजान ईद आणि दुसरी ७ दिवसांच्या रोजा नंतरची ईद. 

विशेष म्हणजे रमजानच्या काळात मी पहाटे ४.३० किंवा ५ वाजता उठून अजान देत असे. अजान म्हणजे भाविकांना प्रार्थना म्हणजे नमाजला बोलवण्यासाठी केलेले आवाहन. त्यावेळी मी लहान असल्यामुळे माझ्या आवाजातील गोडवा हा कौतुकाचा विषय असायचा. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणीत व्हायचा. त्यातून मला प्रेरणा मिळायची. मी फार धार्मिक असल्याने पाच वेळा नमाज पढायचो, अजाण द्यायचो,कुराण पठनही करत असे. रमजानमध्येच बडी रात म्हणजे शब ए कदरची रात्र येते. या रात्री लोक रात्रभर जागून प्रार्थना करतात. लहानपणी मी ही तसे जागरण करत असे. शिवाय रमजानच्या काळात महिनाभर विशेष प्रार्थना होते त्याला तरावीहची नमाज असे म्हणतात.

महिन्याभरानंतर ईदच्या दिवशी घरोघरी हमखास शिरखुर्मा बनायचा. सकाळी इदगाहच्या पुढे जाऊन नमाज पढने आणि मशिदीतून परत येत असताना कब्रस्थानात जाणे हा नियम असायचा. त्यामुळे मी पण कब्रस्थानात जाऊन मृत नातेवाईक, आप्त यांच्यासाठी दुवा करून घरी येता-येता गोरगरिबांना किंवा लहान मुलांना पाच पैसे, दहा पैसे देत असे. हे मी आठवीपर्यंत नित्यनियमाने करायचो. यादिवशी गावातील गरीब, हातावर पोट असणारे, शेतात काम करणारे, मोलमजुर वगैरे मंडळी लोखंडी संदुकात वर्षानुवर्षे पडून असलेले लग्नातील कोट ईदला घालायचे. एरवी दरिद्री नारायण असणारा व्यक्ती ईदच्या दिवशी नीटनेटके कपडे, डोळ्यात सुरमा आणि अत्तर लाऊन तयार असायची.  

ईदच्या दिवशी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे, एकदुसऱ्याच्या घरी जाऊन शिरकुर्मा खाणे हा दिनक्रम असायचा. दुसऱ्या दिवशी बासी ईद असते. तीही लोक आपापल्या पद्धतीने साजरा करत होते.थोडक्यात काही लोकांसाठी रमजान ईद म्हणजे आयुष्याची श्रीमंती दाखवण्याचा दिवस. ईद म्हणजे आनंद, उत्साह. 

लहानपणी मी फार धार्मिक असल्याने पाच वेळा नमाज पढायचो, अजान द्यायचो,कुराण पठन करत असे, त्यामुळे  लोक मला बाबा समजून कोणी आजारी असेल तर लोक माझ्याकडे पाणी घेऊन  यायचे.आणि ते आग्रह करायचे की, मंत्र वैगरे म्हणून यात फुंकर घाला आणि बरच काही. मला हे काही पटत नव्हते. या सर्व गोष्टी अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या आहेत हे समजत असे. त्यामुळे हळूहळू यापासून मी थोडा दुरावत चाललो होतो. कालांतराने मी गाव सोडले. त्यादरम्यान वाचन वाढले आणि मग या सर्व गोष्टी मागे पडत गेल्या.  

पुढे या सगळ्यांकडे मी धार्मिकतेने न पाहता  सांस्कृतिकदृष्ट्या पाहायला लागलो आणि संविधानाकडे वळलो. हे फक्त माझ्यामध्ये झालेले परिवर्तन आहे. प्रत्येकावर ते लादले पाहिजे असे नाही. कारण इतर लोक या सणांतून निस्सीम आनंद घेत आहेत. त्यांवर आपण विरजण घालायचे काही कारण नाही. यापलीकडे जाऊन बालपणीचा रमजान म्हणजे तर कल्पनारम्य आनंदाचे क्षण! त्यामुळे आजही तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो.

आजही रमजान आणि ईद यांचे मर्मपूर्वी सारखेच आहे. रमजानकडे  आत्मशुद्धीकडे नेणारा मार्ग म्हणूनच पाहिले जाते. मात्र सध्या काही राजकीय लोक रमजानचा  फायदा घेताना दिसतात. या काळात इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करणे, राजकीय ध्येयधोरणे राबवणे आदी गोष्टी होताना दिसतात. मात्र एक चांगला बदलही झाला आहे. पूर्वी मुस्लिमांनी मुस्लिमांसाठी साजरा करायचा सण असे चित्र दिसत असे, मात्र अलीकडे हे चित्र  बदलताना दिसत आहे. सर्वधर्मीय लोक यात उत्साहाने सहभागी होऊन हा सण साजरा करत आहेत. यातून आपापसांतील सलोखा वृद्धींगत होताना दिसत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. 

रमजानच्या निमित्ताने मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. समाजातील गरीब-श्रीमंत यांच्यातील विषमता वाढत चालली आहे. पुण्यातील कोंढवा भागातील एक उदाहरण घेतले तर याकाळात इथे रात्रभर चालणारी हॉटेल्स आहेत. श्रद्धाळू माणसे ही रेलचेल करत नाही. मात्र खवय्ये आणि उपभोगी मंडळी इथे गर्दी करतात. त्यात हजारो रुपये खर्च करतात. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे लोकांना उपवास सोडायला खजुरही मिळत नाही. लोक मिठाच्या खड्याने उपवास सोडतात. ही विषमता दूर करण्यासाठी जकातसारख्या धार्मिक कर्तव्याचा सदुपयोग करून घेणे गरजेचे आहे.

काळ बदलला आहे. नव्या जीवनशैलीमुळे आजार वाढत आहेत. लोक मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या आजाराला बळी पडत आहेत. असे असूनही लोक या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून श्रद्धेपोटी उपवास ठेवतात आणि आजार वाढवून घेतात. त्यामुळे लोकांनी यामागील शास्त्र समजून घेऊन मगच योग्य पद्धतीने याचे पालन करणे गरजेचे आहे. थोरांच्या प्रभावातून लहान मुले रोजे ठेवतात. लोक त्यांचे कौतुक करतात, फुलांचे हार गळ्यात घालतात. त्यामुळे लहान मुलांना प्रोत्साहन मिळते. लहान वयातील रोजे मुलांच्या निकोप विकासावर वाईट परिणाम करू शकतात. हे धर्मालाही अपेक्षित नाही. मी लहानपणी पाहिले होते की काही लहान मुले भूक लागल्यास चोरून खायचे. चोरून पाणी प्यायचे. मग हा हट्ट, आग्रह आणि कौतुक कशासाठी? माझ्या दृष्टीने १५ वर्षाखालील मुलांना रोजे धरण्यास मनाई केली पाहिजे. धर्मानेही फक्त बालिग म्हणजे सज्ञान व्यक्तींवरच रोजे बंधनकारक केले आहेत. 

वयोवृद्धांविषयीही तेच. माझी आई अंगाने थोडी स्थुल होती. ती रमजानचे सर्व उपवास करायची. मी पुणे विद्यापीठात एम ए च्या शेवटच्या वर्षाला होतो. माझी फायनल  परीक्षा संपली तो रमजानचा पाचवा रोजा होता. दिवसभर रोजा करून आईने सायंकाळी रोजा सोडला. नमाज अदा केली आणि तांब्या घेऊन नैसर्गिक विधीसाठी गावाबाहेर गेली. विधी संपल्यानंतर त्या उठल्या आणि चक्कर येऊन पडल्या. त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. यातून काही संदेश घेण्याऐवजी लोक रमजानमध्ये मृत्यू आल्याचे कौतुक करतात. 'अच्छी मौत आयी ' असे म्हणतात. हा दृष्टीकोनही बदलायला हवा.  

रमजानच्या काळात मुस्लीम महिलांवर कामाचे अतिरिक्त ओझे पडते. रोजे करणे, घरातील काम करणे या सगळ्या कामाचा भार त्यांच्यावर पडतो. पुरुषांनी त्यांना घरकामात मदत करून त्यांचा भार हलका करायला हवा. नव्या काळात या नव्या आव्हांनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मला वाटते.

शेवटी आजच्या काळात धार्मिक सण अधिकाधिक समाज आणि मानवताभिमुख करण्याची गरज आहे. या रमजान निमित्त मुस्लीम बांधवांनी इस्लामची मानवतावादी शिकवण अंगीकारून जगाला शांतता ,बंधुभाव आणि सलोख्याचा संदेश द्यावा.समाजातील सौहार्द वाढीसाठी रमजान ईद सारखे सण साजरे केले जावे, असे मला वाटते. सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

(शब्दांकन : पूजा नायक)

- डॉ. शमशुद्दीन तांबोळी
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter