बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अंत!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया

 

मलिक असगर हाशमी

बांगलादेशच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली, वादग्रस्त आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व असलेल्या बेगम खालिदा झिया यांचे आज पहाटे ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात निधन झाले. दीर्घ आजाराशी झुंज देणाऱ्या या ७९ वर्षीय नेत्यांनी सकाळी सहाच्या सुमारास, फजरच्या अजाननंतर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बांगलादेशच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे. या पर्वाने देशाची सत्ता, विरोधक आणि लोकशाही लढा या तिन्हींना कित्येक दशके दिशा दिली होती. (इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिउन)

बीएनपी (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) च्या अध्यक्षा आणि दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या खालिदा झिया यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे खाजगी डॉक्टर आणि पक्षाच्या राष्ट्रीय स्थायी समितीचे सदस्य प्रा. डॉ. ए.झेड.एम. जाहिद हुसेन यांनी केली. त्या वेळी रुग्णालयात त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यामध्ये मोठा मुलगा आणि बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान, त्यांची पत्नी डॉ. जुबैदा रहमान, नात झैमा रहमान, धाकट्या मुलाची पत्नी शर्मिला रहमान सिंथी, धाकटा भाऊ शमीम एस्कंदर आणि मोठी बहीण सेलिना इस्लाम यांचा समावेश होता. तसेच पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि वैद्यकीय मंडळाचे डॉक्टरही तिथे होते. बेगम झिया यांच्या मृत्यूची घोषणा करताना तारिक रहमान यांच्यासह हे सर्वजण त्यांच्यासोबत उपस्थित होते.

खालिदा झिया यांची प्रकृती बऱ्याच काळापासून नाजूक होती. २३ नोव्हेंबरपासून त्या एव्हरकेअर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) होत्या. लिव्हर सिरोसिस, किडनीचे विकार, गंभीर संधिवात आणि अनियंत्रित मधुमेह अशा जीवघेण्या आजारांशी लढताना त्यांनी शेवटच्या काही महिन्यांत असह्य वेदना सहन केल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणुसकीच्या नात्याने त्यांना उपचारासाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि औपचारिक अडचणींमुळे वेळीच प्रगत उपचार शक्य झाले नाहीत. अखेर, जानेवारी २०२५ मध्ये प्रवासावरील निर्बंध हटल्यानंतर त्या उपचारासाठी लंडनला गेल्या, पण तोपर्यंत आजार खूप बळावला होता.

जन्म, शिक्षण आणि सत्तेच्या पायऱ्या

१५ ऑगस्ट १९४६ रोजी दिनाजपूर येथे जन्मलेल्या खालिदा झिया या इस्कंदर मजुमदार आणि तैबा मजुमदार यांची कन्या होत्या. त्यांनी दिनाजपूर गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण आणि सुरेंद्रनाथ महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. १९६० मध्ये त्यांचा विवाह बांगलादेशचे भावी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्याशी झाला. झियाउर रहमान राष्ट्रपती असताना खालिदा झिया यांनी 'फर्स्ट लेडी' म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावली आणि आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले.

१९८१ मध्ये झियाउर रहमान यांच्या हौतात्म्यानंतर खालिदा झिया राजकारणात उतरल्या. त्यावेळी पक्ष आणि देश दोन्ही अस्थिर होते. २ जानेवारी १९८२ रोजी त्या बीएनपीच्या प्राथमिक सदस्य बनल्या. १९८३ मध्ये उपाध्यक्ष आणि १९८४ मध्ये त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. १९८० च्या दशकात त्यांनी तत्कालीन लष्करी हुकूमशहा एच.एम. इरशाद यांच्या विरोधात लोकशाही पुनर्स्थापनेच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सात पक्षांची आघाडी बनवून त्यांनी हुकूमशाही संपेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत भाग न घेण्याची स्पष्ट भूमिका घेतली. या संघर्षात १९८३ ते १९९० या काळात त्यांना सात वेळा अटक आणि नजरकैदेत ठेवण्यात आले. येथूनच त्यांची ओळख 'खंबीर नेत्या' अशी निर्माण झाली.

पंतप्रधानपदाचा वारसा

२७ फेब्रुवारी १९९१ रोजी निपक्षपाती निवडणूक जिंकून खालिदा झिया बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात संसदीय लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी सक्तीचे प्राथमिक शिक्षण, दहावीपर्यंत मुलींसाठी मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती योजना यांसारखी क्रांतिकारक पावले उचलली. सरकारी सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा २७ वरून ३० वर्षे करण्यात आली. हा निर्णय तरुणांसाठी दिलासादायक मानला गेला.

१९९६ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ११६ जागांसह त्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षनेत्या ठरल्या. १९९९ मध्ये त्यांनी चार पक्षांची आघाडी उभारली आणि २००१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने पुन्हा पंतप्रधान झाल्या. २००५ मध्ये फोर्ब्सने त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत २९ वे स्थान दिले. बांगलादेशच्या संसदीय इतिहासात त्यांचा एक अनोखा विक्रम राहिला आहे. १९९१ ते २००८ या काळात त्या आपली संसदीय जागा कधीही हरल्या नाहीत.

वाद, दमन आणि कारावास

२००६ मध्ये नियोजित निवडणुकीपूर्वी त्यांनी पद सोडले, पण हिंसाचार आणि दंगलींमुळे लष्कराने हस्तक्षेप केला. हंगामी सरकारने राजकीय हालचालींवर बंदी घातली आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली व्यापक कारवाई सुरू झाली. २००७ मध्ये खालिदा झिया यांना अटक झाली. शेख हसीना यांच्या अटकेनंतर ही घटना घडली. दोन दशकांपासून सत्तेत आणि विरोधात आलटून पालटून राहणाऱ्या या दोन्ही नेत्यांवर एकाच वेळी खटले चालले. २००८ मध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली, पण सत्ता शेख हसीना यांच्या हाती गेली.

२०११ नंतर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांनी त्यांना घेरले. २०१४ मध्ये निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत, असा आरोप करत बीएनपी समर्थकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. व्यापक धडकसत्र आणि बिनविरोध जिंकलेल्या जागांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. २०१८ मध्ये अनाथाश्रम ट्रस्टशी संबंधित कथित अफरातफर प्रकरणात त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आंतरराष्ट्रीय संघटनांनी याला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. ढाका येथील जुन्या मध्यवर्ती कारागृहातील त्या एकमेव कैदी होत्या. या शिक्षेमुळे त्या सार्वजनिक पदासाठी अपात्र ठरल्या, तरीही त्यांनी आरोप फेटाळून लावले.

अखेरचा अध्याय आणि राजकीय परिस्थिती

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुटका झाल्यानंतर त्या घरात नजरकैदेत होत्या. २०२४ मध्ये व्यापक जनक्षोभाच्या लाटेत शेख हसीना यांचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. त्यानंतर हंगामी सरकारने खालिदा झिया यांची सुटका करण्याचे आणि बँक खाती पूर्ववत करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. जानेवारी २०२५ मध्ये त्या उपचारासाठी लंडनला गेल्या, पण नियतीने त्यांना वेळ दिली नाही.

खालिदा झिया यांचा मृत्यू हा बांगलादेशच्या राजकारणासाठी मोठा धक्का आहे. आपल्या सक्रिय राजकीय जीवनात निवडणुकीत पराभवाची चव न चाखणाऱ्या त्या एकमेव नेत्या होत्या. समर्थकांसाठी त्या लोकशाहीचे प्रतीक होत्या, तर टीकाकारांसाठी विवादांचे केंद्र होत्या. मात्र, सत्तेत असताना आणि तुरुंगात असतानाही त्यांनी बांगलादेशच्या राजकारणाला आकार दिला, हे सत्य नाकारता येणार नाही.

आज ढाक्यापासून जगभरातील बांगलादेशी प्रवासी समुदायांमध्ये शोकाची लहर पसरली आहे. संघर्ष हाच आपला वारसा मानणाऱ्या आणि शेवटपर्यंत आपल्या राजकीय विचारांशी तडजोड न करणाऱ्या 'खंबीर नेत्या' म्हणून इतिहास त्यांना कायम लक्षात ठेवेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter