कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव पुरस्कार' डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना जाहीर

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
डॉ. शमसुद्दीन तांबोळी
डॉ. शमसुद्दीन तांबोळी

 

कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा मानाचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळीसह अन्य सहा मान्यवरांना जाहीर झाला आहे.

दर दोन वर्षांनी लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे.

मंगळवारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, अजय निकम, कार्यवाह मकरंद हिंगणे, गुरूमित बग्गा यांच्या उपस्थितीत या पुरस्कार्थींची घोषणा करण्यात आली.

गेल्या चार दशकांपासून मुस्लीम समाज सुधारणेच्या चळवळीमध्ये असणारे डॉ तांबोळी यांना सामाजिक योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्यासह एमकेसीएलचे प्रमुख विवेक सावंत यांना ज्ञान क्षेत्रासाठी तंत्रज्ञान व नेटवर्किंग क्षेत्रात शिक्षणक्रांतीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. विजय भटकर यांच्या सीडॅक संस्थेत प्रगत संगणक प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता.
 
यासोबतच नृत्यसाठी भरतनाट्यम नृत्यशैलीतील कलावंत, अभ्यासक डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी तंजावर येथील भोसले राजांच्या नृत्यविषयक मराठी प्रबंध कवन रचनांवर संशोधन केले आहे. अप्रतिम कलाकृतींद्वारे मान्यता मिळालेल्या प्रमोद कांबळे यांना शिल्प-चित्र गटात पुरस्कार दिला जाणार आहे. चित्रपटसाठी उत्कृष्ट कला निर्मितीचा ध्यास असणारे दिग्दर्शक व निर्माता आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली. क्रीडा क्षेत्रासाठी पत्रकार सुनंदन लेले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता लाॅ कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार 
 
डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याविषयी 
पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयातून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. तांबोळी यांचे सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत मोठे योगदान आहे. डॉ. तांबोळी हे मुळचे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील आहेत. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून 'हमीद दलवाई यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान' या विषयावर त्यांनी पी.एच. डी मिळवली आहे. ते मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष असून मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादकही आहेत.  हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टट्यूट माजी सचिव म्हणून ही त्यांनी काही काळ काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत. 

डॉ. तांबोळी १९८५-८६ मध्ये शहाबानो प्रकरणादरम्यान तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान राजीव गांधी, कायदा मंत्री यांना निवेदन देऊन त्यांवर चर्चा घडवून आणली. यासोबतच त्यांनी समाजात, लोकांमध्ये जाऊनही काम केले. त्याचाच एक भाग म्हणून अनेक परिषदांमध्ये, आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला. याचेच फलित म्हणजे डिसेंबर २०१७ मध्ये तलाकबंदी विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रिय मंत्री व विविध राजकिय पक्षांबरोबर प्रत्यक्ष भेटी आणि चर्चाही डॉ. तांबोळी यांनी केली.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. तांबोळी आपल्या कार्यकाळात अनेक नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सणांना अधिक समाजाभिमुख  करणे हा त्यापैकीच एक उपक्रम. त्याचाच एक भाग म्हणून बकरी ईद निमित्त मंडळातर्फे महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. आणि गेली अनेक वर्षे हा उपक्रम ते यशस्वीपणे राबवत आहेत. तसेच मरणोत्तर अवयवदान व देहदान याबाबत जनजागृती यांसाठीही बरेच उपक्रमही ते राबवतात. मुस्लीम समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसनासाठी त्यांनी तिमिरभेद मंचाची स्थापना केली.

स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे डॉ. तांबोळी यांनी हमीद दलवाई स्टडी सर्कलची स्थापना करण्यात आली. याद्वारे युपीएससी- एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षा तयारी, व्यवसाय मार्गदर्शन, कार्यकर्ता प्रशिक्षण असे विविध उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. यावर्षी मंडळातर्फे डॉ तांबोळी यांनी हमीद दलवाई शैक्षणिक प्रायोजकत्त्व उपक्रमाची घोषणाही केली आहे.

सोबतच त्यांनी महिलांसाठी सत्यशोधक फातिमाबी शेख मुस्लीम महिला मंचची स्थापना केली. महिलांच्या समुपदेशन, कायदा मार्गदर्शन आणि सहकार्य यांसाठी मुस्लीम महिला मदत केंद्रही त्यांनी उभारले.

समविचारी संघटनाच्या समन्वयातून राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा, समाज प्रबोधन आणि भारतीय संविधान साक्षरता कार्यक्रमांचे विविध पातळीवर राबविण्याचे कामही  डॉ. तांबोळी यांनी केले.

यासोबतच त्यांनी भारतीय संविधान साक्षरता व सन्मान अभियानांचे आयोजनही केले. यामार्फत आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहकार्याचे कामही ते करतात. सोबतच विशेष विवाह कायदा १९५४ (नोंदणी विवाह) अंतर्गत विवाहासाठी प्रोत्साहनही  देतात.

गेल्या चार दशकातील सामाजिक कार्यासाठी डॉ. तांबोळी यांना अनेक पुरस्कारांनी  गौरवण्यात आले.

त्यातील काही निवडक पुरस्कारांची यादी
  • २००८ मध्ये बापू विधायक कार्यकर्ता पुरस्कार
  • २००९ मध्ये महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे भास्कर अवार्ड
  • महाराष्ट्र ग्रंथेत्तोजक सभेकडून  उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
  • कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार
  • पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
  • मराठवाडा साहित्य भूषण पुरस्कार 
  • २०२३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार