२०२५ : 'राईझिंग इंडिया'च्या आशा, अभिमान आणि आकांक्षांना नवी ओळख देणारे सात भारतीय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
कर्नल सोफिया कुरेशी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि विंग कमांडर व्योकिमा सिंग
कर्नल सोफिया कुरेशी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि विंग कमांडर व्योकिमा सिंग

 

एखाद्या राष्ट्राची प्रगती आणि उत्कर्ष केवळ वार्षिक विकास दर किंवा जीडीपीच्या आकड्यांवरून मोजता येत नाही. सर्वाधिक युवा लोकसंख्या, आकांक्षा, आशा आणि स्वप्ने असलेल्या देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी तिथल्या प्रतिभाशाली आणि मेहनती नागरिकांचे योगदान महत्त्वाचे ठरते. विविध क्षेत्रांतील अडथळे पार करून भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि 'आयकॉन' बनलेल्या सात भारतीय व्यक्तिमत्त्वांचा आढावा खालीलप्रमाणे आहे:

सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग 

भारताच्या उत्कर्षातील 'ऑपरेशन सिंदूर' हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आणि लॉंच पॅड्सवर लष्करी अचूकतेने हल्ला करण्यात आला. या ऑपरेशनची माहिती जगाला देताना दोन महिला अधिकाऱ्यांनी - कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग - भारताची एक वेगळी बाजू जगासमोर मांडली. अत्यंत शांत आणि संयतपणे 'ऑपरेशन सिंदूर'चा तपशील जगाला सांगणाऱ्या कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय प्रतीक बनल्या आहेत.

मे २०२५ मध्ये 'ऑपरेशन सिंदूर'च्या पत्रकार परिषदेचे नेतृत्व करत त्यांनी भारतीय संरक्षण क्षेत्रातील वाढत्या महिला नेतृत्वाचे दर्शन घडवले. 'कॉर्प्स ऑफ सिग्नल्स'च्या अधिकारी असलेल्या कर्नल कुरेशी परदेशी लष्करी तुकड्यांचे नेतृत्व करण्यासाठी ओळखल्या जातात. तर हेलिकॉप्टर पायलट असलेल्या विंग कमांडर सिंग उंचावरील बचाव मोहिमांसाठी (High-altitude rescue missions) प्रसिद्ध आहेत. या दोघींनी सशस्त्र दलातील व्यावसायिक नैपुण्य आणि 'नारी शक्ती'चे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे.

अंतराळात शुभांशु शुक्ला 

अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी जून/जुलै २०२५ मध्ये खाजगी 'एक्सिओम मिशन ४' (Ax-4) चा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) प्रवास करणारे पहिले भारतीय बनून इतिहास रचला. भारतीय हवाई दलाचे अधिकारी असलेल्या शुक्ला यांनी मिशन पायलट म्हणून जबाबदारी पार पाडली आणि अंतराळात महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोग केले. त्यांची ही मोहीम भारताच्या 'गगनयान' या मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

ते दांडगा उड्डाण अनुभव असलेले सन्मानित फायटर पायलट असून भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ४१ वर्षांनंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी असलेल्या शुक्ला यांचे पृथ्वीवर आगमन कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो किनाऱ्याजवळ प्रशांत महासागरात झाले. या घटनेने संपूर्ण देशाचा ऊर अभिमानाने भरून आला.

ही मोहीम ह्युस्टनस्थित खाजगी कंपनी 'एक्सिओम स्पेस'द्वारे चालवली गेली असली तरी, तिचा आत्मा आंतरराष्ट्रीय सहकार्यात होता. Ax-4 हा नासा, इस्रो, युरोपियन स्पेस एजन्सी आणि स्पेसएक्स यांचा संयुक्त प्रयत्न होता. नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी मोहिमेची कमान सांभाळली, तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी वैमानिकाची भूमिका बजावली. या ऐतिहासिक प्रवासात पोलंडचे स्लावोश उझनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हेदेखील सामील होते.

बानू मुश्ताक यांचा 'बुकर' क्षण 

कर्नाटकातील प्रसिद्ध भारतीय लेखिका, कार्यकर्त्या आणि वकील बानू मुश्ताक यांनी त्यांच्या 'हार्ट लॅम्प' (Heart Lamp) या लघुकथा संग्रहासाठी प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार' जिंकला आहे. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या आहेत. त्यांच्या लेखनातून भारतातील स्त्रिया, मुस्लिम आणि दलितांवर होणाऱ्या सामाजिक अन्यायावर तीक्ष्ण भाष्य केले जाते. पुरोगामी बंडाया साहित्य चळवळीतील पत्रकार, वकील आणि कार्यकर्ता म्हणून आलेले अनुभव त्यांच्या लेखनातून उमटतात.

दीपा बस्ती यांनी अनुवादित केलेल्या 'हार्ट लॅम्प'मध्ये १९९० ते २०२३ या काळात लिहिलेल्या कथांचा समावेश आहे. दक्षिण भारतातील मुस्लिम महिलांचा संघर्ष यात अधोरेखित केला असून, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारा हा पहिला लघुकथा संग्रह ठरला आहे. पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात मुश्ताक यांनी वाचकांचे आभार मानले आणि सांगितले की, "माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू दिल्याबद्दल धन्यवाद."

आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, "कोणतीही गोष्ट कधीही लहान नसते या विश्वासातून या पुस्तकाचा जन्म झाला आहे; मानवी अनुभवांच्या विणीमध्ये प्रत्येक धागा संपूर्ण अस्तित्वाचे वजन पेलत असतो."

झाकीर खान आणि मॅडिसन स्क्वेअर 

१७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये संपूर्ण हिंदी स्टँड-अप शो हाऊसफुल्ल करून झाकीर खान याने इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय विनोदी कलाकार ठरला. भारतीय कॉमेडी आणि प्रतिनिधित्वासाठी हा एक मोठा मैलाचा दगड आहे. त्याने आपल्या सहजसुंदर गोष्टी जागतिक मंचावर आणल्या आणि परदेशातील भारतीयांशी घट्ट नाते जोडले. हा क्षण दक्षिण आशियाई लोकांसाठी अभिमानाचा ठरला. इंदूरमध्ये जन्मलेल्या आणि आता जगातील सर्वात मोठ्या रंगमंचावर काम करणाऱ्या या कलाकारासाठी हे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे मानले जात आहे.

झाकीर खान हे भारतीय कॉमेडी विश्वातील एक मोठे नाव असून तो मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी आहे. त्याची विनोदाची शैली अत्यंत दर्जेदार आणि हलकीफुलकी आहे. तो एक उत्तम संगीतकारही आहे.

मेट गालामध्ये शाहरुख खान आणि दिलजीत दोसांज 

अभिनेता आणि सुपरस्टार शाहरुख खान तसेच पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांज यांनी फॅशन विश्वातील सर्वात ग्लॅमरस अशा 'मेट गाला २०२५' मध्ये उपस्थिती लावून इतिहास रचला. न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सहभागी होणारे ते पहिले भारतीय पुरुष अभिनेते ठरले. या प्रतिष्ठेच्या फॅशन शोमध्ये 'किंग खान'ने फॅशन आयकॉन म्हणून राजेशाही पदार्पण केले. दिग्गज डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या काळ्या रंगाच्या पोशाखात शाहरुख खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा फ्लोअर-लेंथ टास्मानियन सुपरफाईन वूल कोट, ब्लॅक क्रेप डी चीन सिल्क शर्ट आणि संरचित कमरबंध हा अभिजाततेचा उत्तम नमुना होता.

दिलजीत दोसांजने आपला पंजाबी वारसा जगासमोर आणत एक वेगळी छाप पाडली. त्याचा हा लूक पतियाळाचे महाराज भूपिंदर सिंग यांच्यापासून प्रेरित होता, जे त्यांच्या भव्य शैली आणि दागिन्यांसाठी प्रसिद्ध होते. तुम्हाला आठवत असेल तर, एम्मा चेंबरलेन हिने २०२३ च्या मेट गालामध्ये महाराज भूपिंदर सिंग यांचा हार घातला होता. यावेळी मात्र, दोसांजने महाराजांचा हा फॅशन वारसा एका नव्या उंचीवर नेला.

डिझायनर प्रबल गुरुंग यांच्या सोबतीने या गायकाने खास तयार केलेला हस्तिदंती रंगाचा पोशाख परिधान केला होता. या पोशाखावर सोन्याच्या धाग्यांनी केलेले नक्षीकाम, फुलांच्या आकृत्यांनी सजलेला केप आणि खांद्यावर लावलेली प्रतीकात्मक सजावट होती. त्याच्या या पहिल्याच लूकची सर्वत्र चर्चा झाली आणि त्याने परिधान केलेले दागिनेही डोळे दिपवणारे होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter