जयंती विशेष : शिक्षणाद्वारे समाज सुधारणेसाठी धडपडणारे डॉ. झाकिर हुसेन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 5 Months ago
डॉ. झाकिर हुसेन फोटो
डॉ. झाकिर हुसेन फोटो

 

८ फेब्रुवारी म्हणजे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या ऋजु, शिक्षणाची असोशी असलेल्या मार्दवपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारा विशेष लेख...

डॉ. झाकिर हुसेन हे शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य, नावलौकिक संपक्ष नेते. ते मूळचे अफगाण येथील कुलीन, खानदानी घराण्यातील होते. बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या घराण्याचे वास्तव्य उत्तर प्रदेशातील फरूकाबाद जिल्ह्यातील कैमगंज या एका लहानशा शहरात होते. परंतु त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८९७ रोजी आंध्र प्रदेशात हैद्राबाद येथे झाला. तेथे त्यांचे वडील वकील होते. नऊ वर्षाचे असतानाच ते वारले. त्यामुळे डॉ. झाकिर हुसेन यांचे उत्तरदायित्व हे त्यांचे त्यांनाच घ्यावे लागले.

त्यांच्या घराण्याचा वारसा हा तसा लष्करी पेशाचा. त्यांचे कित्येक नातेवाईक लष्करात होते. सैनिक दलामध्ये त्यांच्या पूर्वजांनी अलौकिक, उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांनीही तिकडेच जावे असे वस्तुतः वाटत होते. परंतु डॉ. झाकिर हुसेन आणि त्यांचे बंधू यांनी योग्य आणि सोयीस्कर मार्ग स्वीकारण्याचे ठरविले. केवळ काही गूढ, गहन कारणानेच ते शिक्षणाकडे वळले आणि आपले जीवन शिक्षणक्षेत्रात यथार्थ कसे होईल याचाच ध्यास त्यांना लागला.

त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण इटावा येथे झाले. येथील सय्यद-अल्ताफ हुसेन या नावाच्या हेडमास्तरांच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. परिणामी त्यांच्यात शिक्षणाची दृष्टी, उत्साह, आणि प्रेरणा निर्माण झाली. ते या लहान बालकाचे भवितव्य घडविण्याचे निमित्त ठरले! महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रसिद्ध अशा एम. अे. ओ. या अलिगड येथील कॉलेजमध्ये गेले. ते बुद्धिमान, वक्ते होते. कॉलेजमध्ये त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. अभ्यासात आणि कॉलेजच्या इतर कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपली चुणूक दाखविली. त्यामुळे महाविद्यालयातील बरीच कामे पिकल्या फळाप्रमाणे सहज त्यांच्या पुढयात आली. परिणामी या हुशार विद्यार्थ्याला जीवनाचा कोणताही मार्ग अवलंबिणे सोपे झाले. 

म. गांधींच्या नेतृत्वाखाली सबंध भारतात जेव्हा पहिली असहकारितेची चळवळ सुरू झाली तेव्हा त्यांचे ‘पदवी शिक्षण’ संपले होते. त्या वेळी फक्त राजकीय क्षेत्रातील नव्हे तर सर्व क्षेत्रांतील लोक या चळवळीमध्ये सामील होत होते. या वादळात बरेच विद्यार्थी कॉलेज सोडून सहभागी झाले. झाकिर हुसेन त्याला अपवाद ठरले नाहीत. परंतु त्यांनी राजकीय क्षेत्रातून बाहेर पडून शिक्षण-क्षेत्राच्या माध्यमातूनच आपले जीवन देशकार्यासाठी वाहून घेण्याचे ठरविले.

भारतातील शिक्षण फार मागासलेले, फार कनिष्ठ दर्जाचे होते. झाकिर हुसेन यांना पूर्ण खात्री होती की खऱ्या अर्थाने आणि व्यापक दृष्टीने राष्ट्रीय पुनरुज्जीवनाची प्रत्येकातील भावना जर जागृत करावयाची असेल तर ती संकुचित राजकीय स्तरातून होणे शक्य नाही. त्याकरिता व्यापक अशा मार्गाचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी शिक्षण आणि देशाची परंपरा, संस्कृती यांचा आधार घेऊनच देश उंचावण्याची लोकांच्यामध्ये भावना फुलवता येईल. इथली शिक्षण पद्धती ब्रिटिश राजवटीला उपयुक्त अशी होती, भारताच्या उद्धाराकरिता नव्हती. इथल्या सामाजिक जीवनाशी सुसंगत अशी नव्हती, तिचे ध्येय धोरण मर्यादित होते. भारताच्या दृष्टीने ती ‘एखाद्या जहाजाला नांगर नसावा’ अशी होती. तरी राष्ट्रप्रेमाची ज्योत धगधगती ठेवणारे राष्ट्रभक्त याच शिक्षणाने मिळवून दिले. याचे श्रेय या शिक्षण पद्धतीला नसून त्या प्रत्येक व्यक्तीला जाते, असे वाटते.

शिक्षण पद्धतीमध्ये आमूलग्र सुधारणा करून लोकांना ज्ञानी करावे असे त्यांना वाटत होते. ‘ज्ञान संपादनाने लोकांना जीवनाचा आनंद घेता येईल आणि दुसऱ्यांना देता येईल. त्यांचा बौद्धिक आणि आर्थिक दृष्टीने विकास होईल. युवक आत्मनिर्भर होतील तसेच जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल’. असे त्यांचे विचार होते. याकरिता त्यांनी अलिगडला एक संस्था स्थापन केली. ती एका ध्येयवादी आदर्शामुळे भरभराटीस येऊ लागली. तीच ‘जामिया मिल्लिया इस्लामिया’ किंवा ‘राष्ट्रीय मुस्लीम विद्यापीठ’ (नॅशनल मुस्लीम युनिव्हर्सिटी) ही संस्था. हे विद्यापीठ एका नवीन शिक्षणाच्या पद्धतीच्या अभिव्यक्तीस तोंड देण्यासाठी एकमेव असे ठरले.

ज्ञान संपादन करण्याची डॉ. झाकिर हुसेन यांची भूक फार मोठी होती. दोन वर्षे जामिया संस्थेत काम केल्यानंतर ते सन १९२२मध्ये बर्लिन येये ‘अर्थशास्त्र’ या विषयात पीएच. डी. मिळविण्यासाठी गेले. ती विशेष प्रावीण्य घेऊन मिळविल्यावर त्यांनी प्रथमावस्थेतील अलिगडच्या संस्थेत पुन्हा प्रवेश घेतला. त्यावेळी ही संस्था बरीच मोडकळीस आलेली होती. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप, आर्थिक अडचणी, असंतोष आणि दीर्घ विरोध इत्यादींचा परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत हे विद्यापीठ चांगले चालावे म्हणून निष्ठावान, जिज्ञासू, विश्वासू, साहसी आणि दूरदृष्टीच्या डॉ. झाकिर हुसेन यांची नेमणूक वयाच्या २९ वर्षी (१९२६) ‘कुलगुरू’ म्हणून झाली. त्यांनी संस्थेला जीवदान दिले आणि खऱ्या अर्थाने संस्था चालू ठेवली. या कामामध्ये त्यांना सहकाऱ्यांनी खूप साथ दिली. 

परदेशांतून म्हणजे केंब्रिज, ऑक्सफर्ड येथून उच्च शिक्षण घेऊन आल्यावर सुद्धा त्यांनी या संस्थेत डॉ. झाकिर हुसेन यांच्या बरोबर फार थोड्या पगारात काम केले. अन्यथा त्यांना दुसरीकडे कोठेही चांगला पैसा मिळाला असता. एवढेच नव्हे तर ब्रिटिश जोपर्यंत भारत सोडून जाणार नाहीत तोपर्यंत थोड्या पगारात काम करण्याचे त्यांनी ठरविले होते. डॉ. झाकिर हुसेन यांनी स्वतः संस्थेत वेळप्रसंगी सर्वच पदावरची कामे केली. विद्यापीठातील प्रत्येक विभाग, त्यातील सोयी, वसतिगृहे, क्रीडांगणे, अभ्यासाचे स्वरूप, विद्यार्थी संघटना, प्राध्यापकांच्या नेमणुका यांमध्ये ते जातीने लक्ष घालत. 

डॉ. झाकिर हुसेन यांचे व्यक्तिमत्त्व आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारण्याची त्यांची तळमळ, जिद्द आणि हिंमत पाहून सहकारी त्यांच्या पासून कधीही दूर झाले नाहीत. अशा परिस्थितीत सर्वांचे सहकार्य घेऊन त्यांनी ही संस्था एवढ्या भरभराटीस आणली की, तिचा फक्त भारतातच नव्हे, तर परदेशांतही गाजावाजा झाला. ‘काही संस्था थोर पुरुषांना मोठे करतात तर काही थोर पुरुष संस्थांना मोठे करतात.’ डॉ. झाकिर हुसेनमुळे अलिगड विद्यापीठाला एक माहात्म्य प्राप्त झाले हे दुसऱ्या प्रकारचे उदाहरण होय.

म. गांधी यांनी लोकांना! मूलभूत शिक्षण (बेसिक एज्युकेशन) मिळावे म्हणून योजना आखली होती. तिलाच पूर्वी ‘वर्धा शिक्षण योजना’ म्हणत; या योजनेत शिक्षणाचे उद्देश, देशाची परंपरा, संस्कृती, निष्ठा, नीतिमत्ता, भावना आणि आशा आकांक्षा इ. अवगत करण्यासाठी एक शिक्षणपद्धत असावी, असे धोरण समाविष्ट होते. त्याकरिता त्यांनी सन १९३७च्या ऑक्टोबरमध्ये एक परिषद बोलाविली होती. झाकिर हुसेन तिच्या ‘मूलभूत शिक्षण योजना’ समितीचे अध्यक्ष झाले. ही योजना शिक्षणाच्या बाबतीत एक ‘क्रांती’ घडवून आणेल असा विश्वास होता. ती केवळ पुस्तकी न राहता ‘कर्तव्यकेंद्रित’ अशी राहील, तिचे ध्येय ‘रोजी-रोटी’ एवढेच नसून मनुष्य हा पूर्ण मानव कसा बनेल हे होते. पाहण्याचे योजनेची जबाबदारी डॉ. झाकिर हुसेन यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष, कुशल, प्रामाणिक आणि समजूतदार अशा व्यक्तीच्या हाती असल्यामुळे, शिक्षणाच्या प्रतिगामी धोरणाला मूठमाती मिळत गेली. आणि लोकशाही, समाजवादी मार्गाने पुढे न्यावयाची असल्याने शिक्षणाच्या दालनात सर्वांना संधी मिळावी, असे धोरण ठरले.

शिक्षणाचा प्रसार, की गुणवत्ता हा प्रश्न वादहीन आहे. किमान गुण वा गुणवत्ता नाही असे शिक्षण असूच शकत नाही. शिक्षण म्हणजेच गुण. याचबरोबर गुणवत्ता किंवा कस, कौशल्य अथवा कसब ही कल्पना सर्वच क्षेत्रांत, सर्व प्रकारच्या शिक्षणाला लागू पडते. उत्तम कारागीर, शेतकरी, मिस्त्री, गवंडी, टर्नर किंवा पदवीधर यांच्यांत सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने कोणीही कमी जास्त मानण्याचे कारण नाही. समाजजीवनास आवश्यक अशी ती विविध कामे आहेत. ती करताना मग ते कोणतेही क्षेत्र असो, गुणवत्ता वाढविणे, ती साक्षेपाने करणे ही समाजाची गरज आहे. याची डॉ. झाकिर हुसेन यांना पूर्ण जाणीव होती.

सन १९४०मध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणतात, ‘शिक्षणातील ‘काम’ (श्रम) या शब्दाचा अर्थ लावणे कठीण आहे. तो नेहमीच शैक्षणिक असतो असे नाही. शैक्षणिक काम म्हणण्याकरिता त्यामागे बौद्धिक मेहनत लागते. माणसाला प्रथम आपल्याला कोणते काम करावयाचे, हे ठरवावे लागते. त्यानंतर कोणत्या गोष्टीचा अवलंब केल्यास ते तडीस नेता येईल याचा शोध घ्यावा लागतो. शेवटी मिळालेले निष्कर्ष हे योजल्याप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पडताळून पहावे लागते. एवढे पाहूनसुद्धा ‘काम’ हे शिक्षणात्मक आहे हे सिद्ध होऊ शकत नाही.. परंतु ते माणसामध्ये बौद्धिक वा शारीरिक कौशल्य, चातुर्य किंवा कसब नक्की उत्पन्न करते. जे ‘काम’ अगदी खरोखर शिक्षणात्मक ठरू शकेल की, जे मनुष्यांत काही ‘मूल्ये’ उत्पन्न करील. गांधीजी म्हणत, ‘लोकसेवा हीच ईश्वरसेवा’ ती जो करतो त्याच्यामध्ये शिक्षणात्मक गुणवत्ता आहे असे म्हणता येईल. केवळ प्रशिक्षण दिलेला एखादा कुत्रासुद्धा ठराविक काम चांगले करतो म्हणून त्याला ‘शिक्षणात्मक गुणप्राप्त कुत्रा’ म्हणता येणार नाही. त्याकरिता दुसऱ्यांबद्दल कळकळ किंवा तळमळ पाहिजे, तसेच त्याचे सर्वांमध्ये एकसूत्रता आणण्याचे ध्येय-धोरण असले पाहिजे. ह्यालाच सुसंस्कृत (सिव्हिलाईड) मनुष्य म्हणता येईल.'

१९५२ मध्ये ते राजकारणात पडले. त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली. सन १९५५मध्ये त्यांची ‘युनेस्को’च्या कार्यकारी मंडळावर निवड झाली होती. त्यांचे शिक्षण तज्ज्ञ म्हणून कार्य हे फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून युरोप, अमेरिका येथे सुद्धा त्यांचे ‘शैक्षणिक विचार’ फार मोठ्या सन्मानाने स्वीकारले गेले आहेत.

बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहिल्यावर १९६२मध्ये ‘उपराष्ट्रपती’ या पदासाठी त्यांची निवड झाली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असल्याने त्यांनी सत्तारूढ पक्ष आणि विरुद्ध पक्ष यांच्यामध्ये दुजाभाव न ठेवता फक्त देशहित समोर ठेवून सभेचे कामकाज पाहिले. सन १९६७मध्ये ते ‘राष्ट्रपती’ म्हणून निवडून आले. त्यावेळची राजकीय परिस्थिती अगदी वेगळी होती. काँग्रेसला जरी लोकसभेमध्ये बहुमत असले तरी जो पक्ष जवळ जवळ २०वर्षे सर्वच प्रादेशिक राज्यात आपले बहुमत टिकवून होता. तो चवथ्या निवडणूकीनंतर मात्र अशक्त झाला होता. लोकसभेमध्ये त्यांचे बहुमत अगदी काठावर होते. १७ पैकी ८ राज्यांमध्ये इतर पक्षीय सरकार, निवडून आले होते. त्यामुळे ही पहिलीच वेळ अशी होती की, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी चुरस लागली होती. जवळ जवळ सर्वच विरोधी पक्षांनी डॉ. झाकिर हुसेन या काँग्रेस उमेदवाराच्या विरुद्ध निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. परंतु डॉ. झाकिर हुसेन यांचे व्यक्तिमत्त्व एवढे जोमदार होते की, विरुद्ध पक्षाचे उमेदवार श्री. के. सुब्वाराव (सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायमूर्ती) यांचा त्यांनी सुमारे एक लाख मतांनी पराभव केला.

काही माणसे ही त्यांच्या कार्यालयीन उच्चपदामुळे मोठी होतात. काही मोठी केली जातात. परंतु डॉ. झाकिर हुसेन हे असे असामान्य व्यक्ती होते की, त्यांच्या मधील चांगुलपणा, उदारता, चैतन्य इ. गोष्टी त्यांनी धारण केलेल्या पदामुळे नसून त्यांचे स्वतःचेच व्यक्तिमत्त्व एवढ्या वर्चस्वास पोहचले होते की, त्यामुळे त्यांनी धारण केलेल्या पदाला मोठेपण प्राप्त झाले.

डॉ. झाकिर हुसेन हे उत्तम वक्ते, तसेच चांगल्या दर्जाचे लेखक होते. त्यांची भाषणे, निबंध, ‘डायनॅमिक यूनिव्हर्सिटी’ या सदराखाली प्रसिद्ध झाले आहेत तसेच त्यांची ‘पटेल’ स्मृतिव्याख्याने ‘भारतातील शैक्षणिक पुनर्रचना’ म्हणून प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे बरेच लिखाण उर्दू भाषेतील आहे. त्यांनी लहान मुलांसाठीही लेखन केले. त्यांचे ‘प्लेटोज रिपब्लिक’ या पुस्तकाचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध आहे.

डॉ. झाकिर हुसेन यांना १९३६मध्ये भारतातील बहुमोल असा ‘भारत रत्न’ किताब मिळाल्याने त्यांनी केलेल्या देशसेवेचा उचित गौरव झाला असे निश्चयात्मक म्हणता येईल. त्यांचे २ मे १९६९ रोजी अकस्मात निधन झाले.

आपल्या मुलामुलींनी विद्यासंपन्न व्हावे, त्यांच्या अंगी कर्तृत्व यावे, त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, आपल्या घराण्याचे नाव वाढवावे आणि देशाची यथशक्ती सेवा करावी हा त्यांचा हेतू होता. आपण नवभारताचे आदर्श नागरिक आणि राज्यकर्तेही आहोत हे त्यांनी विसरता कामा नये. ‘प्रत्येकाला आपला भविष्यकाळ जर चांगला करावयाचा असेल तर वर्तमान काळात चांगली कामे केली पाहिजेत. तसेच गेलेले आरोग्य, संपत्ती हे पुन्हा मिळवता येते परंतु चारित्र्य आणि गेलेला काळ या गोष्टी पुन्हा हस्तगत करता येत नाहीत, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे’ असा त्यांचा विद्यार्थ्यांना उपदेश होता.

- प्रभाकर बराडे
('साप्ताहिक साधना'च्या अर्काइव्हजमधून साभार)