पुण्यातील शोभा ते बिहारमधील 'हंटरवाली मॅडम'

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
‘हंटरवाली मॅडम’
‘हंटरवाली मॅडम’

 

उज्ज्वल कुमार
आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध प्रकारे साजरा करण्यात येतो. यानिमित्त अनेक क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. अगदी घरातील गृहिणीपासून अंतराळात विहार करणाऱ्या रणरागिणींची दखल घेतली आहे. कामासाठी अथवा अन्य कारणांमुळे स्वतःच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होऊन तेथे कर्तृत्व गाजविणाऱ्या महाराष्ट्र कन्यांच्या महिला दिनानिमित्त करून दिलेला परिचय
 
मूळ महाराष्ट्रातील अगदी पुण्यातील पण वडिलांच्या नोकरीमुळे लहानपणापासून हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेल्या शोभा ओहाटकर यांचे शिक्षणही तेथेच झाले. त्यांचे वडील बलराम ओहाटकर हे हैदराबादमध्ये उत्पादन शुल्क आयुक्त होते. हैदराबादेत १९८९ मध्ये राज्यशास्त्र विषयात एम.ए केल्यानंतर शोभा ओहातकर यांची पुढील वर्षी भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) त्यांची निवड झाली. बिहार केडर मिळाल्यानंतर तेथे मुलीला पाठविण्यावरून घरात नाराजी होती. पण वडील पाठीशी उभे राहिल्याने पालकांच्या सुरक्षित छत्राखालून बिहारसारख्या परराज्यात शोभा यांनी पाऊल ठेवले. पाटणा शहराच्या सहायक पोलिस आयुक्त म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. याद्वारे त्यांचा बिहार पोलिस दलामधील कारकीर्द सुरू झाली आणि अल्पावधीत त्या ‘हंटरवाली मॅडम’ मधून ओळखल्या जाऊ लागल्या.
 
नव्वदच्या दशकातील अंतिम वर्षात बिहारमध्ये गुन्हेगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला होता. मुलींची छेडछाड, बलात्काराच्या घटनांमुळे सामान्य माणसांचा पोलिसांवरील विश्‍वास उडालेला होता. तत्कालीन संयुक्त बिहारमधील हा जिल्हा बाबा नगरी म्हणूनही ओळखला जात असे. त्याच कालावधीत शोभा ओहातकर या देवघर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी रुजू झाल्या होत्या. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिलांबरोबर गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली होती. महिलांची छेडछाड करणाऱ्यांना खुलेआम फटके देण्याच्या त्यांच्या योजनेमुळे लोक त्यांना ‘हंटरवाली’ नाव दिले आणि नंतरही हीच त्यांनी ओळख बनली. शोभा ओहातकर या सध्या बिहार राज्याच्या अग्निशमन आणि गृहरक्षक दलाच्या पोलिस महासंचालक आहेत. या पदावर प्रथमच महिला अधिकारीपदाची नियुक्ती झालेली आहे. गेल्या महिन्यात त्यांचे सहकारी व पोलिस महानिरीक्षक विकास वैभव यांनी त्यांच्या वर्तनावरून प्रश्‍न उपस्थित केले. त्यामुळे देवघरमधील महिलांना सुरक्षाकवच पुरविणाऱ्या या ‘हंटरवाली मॅडम’चे नाव चर्चेत आले आहे.
 
शोभा ओहाटकर यांनी पुणे व नगरमध्‍येही डेप्युटेशनवर काम केले आहे. नगरमध्ये नियुक्तीच्या काळात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. यात अनेक बड्या लोकांचे नाव घेतले जात होते. तपास करताना बाजूंनी दबाव टाकला जात होता. पण ओहाटकर यांनी संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी केली. यामध्ये २६ जणांना अटक झाली होती आणि दोषारोपही दाखल करण्यात आले होते.

महिलांच्या अधिकारासाठी दक्ष
महिलांना त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळावा यासाठी शोभा ओहाटकर सातत्याने पुढाकार घेत असतात. एखाद्या महिलेच्या अंगावर पोलिसांची ‘वर्दी’ दिसली की न्याय मिळेल, असा विश्‍वास महिलांना वाटत असतो,’ असे त्या सांगतात.