सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आणि कॉमेडियन ज्युनियर मेहमूद उर्फ नईम सय्यद यांचे नुकतेच निधन झाले. ते पोटाच्या कर्करोगामुळे त्रस्त होते. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमुळे ते मृत्यूशी झूंज देत होते.
ज्युनियर मेहमूद जरी आता आपल्यात नसले तरी त्यांचा विनोदी आणि अनोखा अभिनय चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहिल. त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील. ज्युनियर मेहमूद यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली.
ज्युनियर मेहमूद यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीत कॉमेडियन अभिनेता म्हणून करिअर सुरुवात केली. ५ दशकांहून अधिक काळ त्यांनी बॉलीवूडमध्ये काम केले. संजीव कुमार यांचा १९६७ मध्ये बनलेला 'नौनिहाल' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
त्यांच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा किस्साही खुप रंजक आहे. ज्युनियर महमूद यांचा भाऊ फोटोग्राफर होता. ते आपल्या भावासोबत शूटिंग पाहण्यासाठी गेले होते. यावेळी शुटिंग सुरु झाले मात्र तो मुलगा त्याचे संवाद विसरत होता आणि त्यामुळे दिग्दर्शकाला रिटेक घ्यावा लागत होता.
हे सर्व पाहिल्यानंतर ज्युनियर मेहमूद म्हणाले होते की, काय यार तूला एकही संवाद बोलता येत नाही, काय करतोय? हे ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाला की, 'तूला बोलता येईल का? बोलून दाखव.' दिग्दर्शकाकडून हे ऐकल्यानंतर ज्युनियर मेहमूद उत्तेजित झाले आणि म्हणाला की हो, मी बोलू शकतो आणि त्यांनी ते डायलॉग पूर्ण बोलून दाखवले . अशा प्रकारे त्यांना त्यांची पहिली भूमिका मिळाली. असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
यानंतर ज्युनियर मेहमूद यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना अभिनय करताना आनंद येऊ लागला. ते एकामागून एक चित्रपट साईन करु लागले. ज्युनियर मेहमूदला पहिल्या भूमिकेसाठी फक्त ५ रुपये फी मिळाली होती. त्याच्या विनोदी अभिनयाच्या शैलीमुळे ते खुप प्रसिद्ध होते. त्यांना बॉलीवूडमधील सर्वात महागडे बालकलाकार असल्याचे बोलले जाते. त्यांनी एका चित्रपटासाठी सुमारे १ लाख रुपये मानधन घेण्यास सुरुवात केली होती. ज्युनियर महमूद यांच्याकडे त्यावेळची सर्वात महागडी कार अँपलाही होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर मेहमूद यांनी अभिनेता राजेश खन्ना यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी अभिनेता राज कपूर वगळता सर्वच बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. 'हाथी मेरे साथी', 'संघर्ष', 'ब्रह्मचारी', 'छोटी बहू', 'दादागिरी', 'दो रास्ते', 'कटी पतंग', 'कारवां' आणि 'मेरा नाम जोकर' यासह अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
ज्युनियर मेहमूद यांचे खरे नाव मोहम्मद नईम सय्यद असे होते. ज्युनियर मेहमूद हे नाव त्यांना प्रसिद्ध बॉलीवूड कॉमेडियन मेहमूद यांनी दिले होते.
ही होती ज्युनियर मेहमूद यांची शेवटची इच्छा
ज्युनियर मेहमूद यांनी शेवटची इच्छा सांगितली होती. ते म्हणाले होते, "मी जग सोडून गेल्यावर लोकांनी मला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखावं. तुम्ही जग सोडून गेल्यावर चार लोकं तुम्हाला एक चांगला व्यक्ती म्हणून लक्षात ठेवत असतील तर तुमचं आयुष्य सार्थकी लागलं असं नक्कीच म्हणता येईल."
-वैष्णवी पाटील