'सिक्सर किंग' युसूफ पठाणची राजकारणात तुफानी एन्ट्री

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
युसूफ पठाण
युसूफ पठाण

 

या वर्षी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तारखा पण जाहीर केल्या जातील. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जागावाटप करत आहेत.

यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४२ उमेदवारांची नावे आहेत.

मात्र, या यादीत सर्वात आश्चर्यकारक नाव आहे ते म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे. मैदानात गगनचुंबी षटकार मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या युसुफ पठाणची यावेळी राजकारणात एन्ट्री झाली आहे.

लोकसभा निवडणूक मध्ये यंदा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत त्याच्या नावाची घोषणा केली. टीएमसीने त्याला बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे खासदार आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध क्रिकेटपटूला मैदानात उतरवून ममता बॅनर्जींनी मोठी खेळी केली आहे.

युसूफ पठाणची क्रिकेट कारकीर्द
४१ वर्षीय माजी अष्टपैलू युसूफने भारतासाठी ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये २७ च्या सरासरीने ८१० धावा आणि टी-२० मध्ये १४६.५८ च्या स्ट्राइक रेटने २३६ धावा केल्या आहेत.

युसूफची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या १२३ धावा होती. या फॉरमॅटमध्ये त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर युसूफची टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या ३७ धावांची होती. याशिवाय युसूफने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने ODI मध्ये ५.५ च्या इकॉनॉमी रेटने ३३ आणि टी-२० मध्ये ८.६२ च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या आहेत.
 
आयपीएल मध्ये युसूफने १७४ सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि १३ अर्धशतकांच्या मदतीने ३२०४ धावा केल्या आहेत. १०० धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर युसूफने आयपीएलमध्ये ४२ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ७.४ आहे आणि २० धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो सध्या जगभरातील इतर अनेक लीगमध्ये खेळताना दिसत आहे.