मराठी गझलेतून 'जखमांना सुगंधी' करणारा इलाही!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार
प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार

 

मराठी गझल हा प्रकार कवितेमध्ये काहीसा दुर्लक्षितच. माधव जूलियन, सुरेश भट यांसारखे काही मोजके कवीच त्या वाटेला गेले. मात्र पन्नास वर्षांहून अधिक काळ "गझल' सेवेसाठी वाहून घेतलेले इलाही जमादार "गझलप्रेमीं'मध्ये विरळाच!  "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा... जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा...' यांसारख्या अजरामर गझलांनी आणि कवितांनी रसिकांच्या काळजात घर करून राहिलेल्या प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांची आज ७७ वी जयंती. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.  दु:ख आणि वेदनांना शब्दबद्ध करून "जखमा अशा सुगंधी' सांगणारे इलाही यांचे जीवनाच्या मैफलीतून जाणे रसिक व चाहते यांच्यासाठी धक्कादायक होते.

 

सांगली जिल्ह्यातील वारणाकाठच्या दुधगावात एक मार्च १९४६ रोजी जन्मलेल्या इलाही यांनी १८ व्या वर्षापासून काव्य करायला सुरवात केली. त्यानंतर पुढच्या पन्नास वर्षांत त्यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गझला आणि कविता बरसल्या. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचा आणि चाहत्यांचा पसारा वाढतच गेला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर लाखो रसिकांचा एक परिवारच त्यांच्याशी जोडला गेला.

 

पाटबंधारे विभागात नोकरी करताना त्यांनी गझल, कविता, गीतांना मनात बांध न घालता कागदावर वाट मोकळी करून दिली. हा महान कवी पुणे येथे एका आऊटहाऊसच्या छोटया खोलीत राहत होता. त्यांच्या पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसे. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असायचा. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठं. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली.

 

गझलविषयी इलाही म्हणत...

"शब्दांचं तंत्र जमलं,की गझलही जमते'

गीत गुंजारते जीवनाचे गझल

मर्म ह्रदयातले स्पंदनांचे गझल

मुक्या मना बोलवेना जीथे

नेमकी वेदना तीच गाते गझल

 

किंवा

मैफलीमध्ये तीने ज्या

ऐकली माझी गझल

मैफलीमध्येच त्यांनी

 पाहिली माझी गझल

 

मराठी गझल हा प्रकार अभावानेच आढळत असताना तुम्हाला त्याची गोडी कशी लागली, या प्रश्‍नावर उत्तर देताना इलाही म्हणाले होते, "मिरजमधील एका खेडेगावातून पुण्यात आलो. त्या वेळी ग्रामीण आणि शहरी भागांतली तफावत म्हणजे काय, याची सर्वप्रथम जाणीव झाली. दोन भागांतले हे अंतर कागदावर, मिळेल त्या चिठ्ठीवर उतरवू लागलो. त्या वेळी "गझल' लिहितोय, याचा थांगपत्ताही नव्हता. जे सुचायचं, ते टिपत जायचो, बस्स! १९६४ पासून लिहायला सुरवात केल्यानंतर १९८० मध्ये सर्वप्रथम पुण्यातच झालेल्या "मुशायरा'मध्ये काही "गझल' सादर केल्या अन्‌ प्रवास आजवर सुरू आहे. ''

 

मराठीतील अनेक प्रथितयश कवींमध्ये "गझल' हा प्रकार हाताळणे प्रत्येकालाच जमलेले नाही. "गझल' लिहिणे खरंच अवघड असते का, या प्रश्‍नावर नकारार्थी मान डोलवून ते म्हणाले होते, "या जगामध्ये कोणतीही गोष्ट सोपी अथवा अवघड असत नाही. प्रत्येक गोष्टीचं एक स्वतंत्र तंत्र असतं. ते जमलं, की अवघड गोष्टीही सोप्या होऊन जातात. "गझल' लिखाणाचंही असंच तंत्र आहे. त्यासाठी तुमची शब्दांवर हुकमत असणंही गरजेचं आहे. शब्द कधीच वाईट नसतात. आपल्यातील भावना शब्दांचा अर्थ ठरवीत असतात.''

 

गझलेचे नियम अतिशय कडक असतात, त्याविषयी बोलताना इलाही एकदा म्हणाले होते, ‘गझलांचे अनेक प्रकार असतात. किंबहुना, गझलांसाठी राजकीय, सामाजिक, प्रेम अशा कोणत्याही भावना वर्ज्य नसतात. मात्र, "गझल' या काव्यप्रकारातून अश्‍लीलता डोकावणं निषिद्ध मानलं जातं. एखाद्या "गझल' काव्यात त्या अर्थाचा एखादा शब्द जरी आला, तरी "गझल' म्हणून त्याचा स्वीकार केला जात नाही.’

 

सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उंचीवर घेऊन जाणारे इलाही

उत्तुंग गझलकार सुरेश भट यांनी मराठी गझलेला एका उंचीवर नेऊन पोहोचवले होते. गझलकार सुरेश भटांच्या नंतर जर कुणाचे नाव घेतले जात असेल तर ते म्हणजे इलाहीच.  भटांनंतर रसिकांच्या काळजात इलाही यांच्या गझलांनी जागा मिळवली. मनातील दु:ख, वेदना आणि वादळांना त्यांनी ताकदीने गझल आणि कवितांतून शब्दबद्ध करताना स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला. जखमादेखील सुगंधी असतात, हे सांगत रसिकांना शब्दरूपी दिलासा दिला. वेदनेवर शब्दरूपी फुंकर मारून जगण्याचे बळ त्यांनी दिले होते. कबिराचे दोहे मराठीत आणणारे इलाही हे एकमेव. त्यांच्या शब्दातील "लिहिल्या कविता, लिहिल्या गझला, गीते लिहिली, सरस्वतीचा दास म्हणालो, चुकले का हो' अशा शब्दरूपी आठवणी निश्‍चितच सर्वांच्याच हृदयात चिरंजीव राहणार आहेत.

 

इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसलं. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठी , हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत.

 

मराठी गझलेला नवे आयाम देणारे इलाही

उर्दू आणि हिंदीतून गझल मराठीत येताना तिने तिच्यावरील "मदिरा, मदिराक्षी'चा शिक्‍का पुसून टाकला. हे करताना सामाजिक, भावतरल रंगांचे आयाम दिले. इलाही जमादार हेही त्यामध्ये अग्रणी होते. "वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?' असा सवाल विचारत त्यांनी भरकटत चाललेल्या माणसाला "आरसा' दाखवला. गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत.

 

भीमराव पांचाळेंच्या स्वरांना दिले शब्दांचे कोंदण

इलाही जमादार हे महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करायचे. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.

 

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा,

बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा....

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला,

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा...


इलाहींची ही गझल भीमराव पांचाळे प्रत्येक कार्यक्रमात आवर्जुन घेत असत. आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृध्द करणाऱ्या इलाही जमादार ज्यांच्या सुरातून कळले ते भीमराव पांचाळे..भीमराव पांचाळे रसिक आणि गझलकार यांच्या मधले वाहक झाले. लोकांना इलाहींच्या गझला भीमरावांच्या वाटू लागल्या होत्या. एक ओळ उर्दू मधील आणि एक उर्दू मधील असा वेगळाच प्रयोग तेव्हा समोर आला होता. तो इलाहींच्या माध्यमातूनच.


इलाहींच्या या काही गझल पहा...

स्वप्नात काल माझ्या येवून कोण गेले

स्वप्नास आज माझ्या घेवून कोण गेले

स्वप्ने अशीच का ग? असतात जीवघेणी

ह्रदयास खोल जखमा देवून कोण गेले


किंवा

हुंदका माझा कसा बंदिस्त आहे,

आसवांना लावलेली शिस्त आहे

यौवना जाऊ नको बाहेर कोठे

भोवताला वासनेची गस्त आहे

राहिला नाही भरवसा पावसाचा

आसवांवरती पिकांची भिस्त आहे

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली

भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?

की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!


किंवा

शब्दांचे अंतरंग जाणशील तर कळेल

अर्थांचे पोत पदर परखशील तर कळेल

मखमाली वाटेवर कळप चालतात फक्त

पायंडा तू नवीन पाडशील तर कळेल

घरभेध्या स्वप्नांना घेतलेस तू घरात

घातपात झाल्याचे पाहशील तर कळेल

लुबाडून वा लुटून सौख्य लाभले कुणास

जे आहे जवळ तुझ्या वाटशील तर कळेल


इलाही जमादार यांचे साहित्य

दूरदर्शन टेलिफिल्मसह काही हिंदी आणि मराठी धारावाहिक मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केले. "मर्मबंध', "राजा शिवछत्रपती', "गणेशपुराण' यांसारख्या मराठी, तर "सनक', "आखरी इन्तजार', "विनायक दामोदर सावरकर' यांसारख्या हिंदी मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केले. मराठी चित्रपट आणि हिंदी-मराठी सांगीतिकांसाठीही त्यांनी लेखन केले. या सोबतच हिंदी संगीतिका, नृत्यनाट्य, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाटकांसाठी त्यांनी गीतलेखन केले. व्यावसायिक नाटकांच्या गीतलेखनातही त्यांचा हातखंडा होता. मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी हिंदीतील सहा पुस्तके मराठीत अनुवादित केलेली आहेत. जखमा अशा सुगंधी, मला उमगलेली मीरा, समग्र दोहे इलाही, गुफ्तगू, अर्घ्य, चांदणचुरा, रंगपंचमी, निरागस, फुलपाखरू, अभिसारिका, भावनांची वादळे, वाटसरू, सखये, मोगरा, तुझे मौन, ओयासिस, आभास, अनुराग, अनुष्का आणि १५  हजार दोह्यांचा समावेश असलेले ‘दोहे इलाहीचे' भाग १  आणि भाग २  अशी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.

 

मराठीची आणि गझलेची सेवा करणाऱ्या इलाही जमादारांचे ३१ जानेवारी २०२१ रोजी पुणे इथे निधन झालं. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या जानदार गझला जगभरातल्या मराठी रसिकांना गेल्या अर्धशतकापासून चिंब करीत आली आहे. त्यांच्या या गझलांचे स्वर मराठी वैखरीत सदासर्वदा दरवळत राहतील.