मालेगाव शहराचे माजी महापौर तसेच माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रशीद शेख यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मालेगाव शहराच्या राजकारणात पोकळी तयारी झाली आहे.
मालेगाव शहरातील काँग्रेसचे नेते अशी रशीद शेख यांची ओळख होती. त्यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते (कै) निहाल अहमद यांचा पराभव केल्याने ते चर्चेत आले. शहराच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली. त्यांनी गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
श्री. शेख (वय ६८) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात १९८५ मध्ये नगरसेवक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९१ आणि १९९६ असे सलग तीन वेळा ते नगरसेवक झाले. या कालावधीत १९९२ मध्ये ते शहराचे नगराध्यक्ष झाले.
मालेगाव विधानसभेच्या निवडणुकीत १९९९ मध्ये त्यांनी माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद यांचा पराभव केला. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात जायंट किलर ठरले. २००४ मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. याकाळात त्यांनी शहरासाठी महत्वाकांक्षी अशा १२५ कोटींची गिरणा धरण पाणीपुरवठा योजना मार्गी लावली होती.
त्यांचा मुलगा आसीफ शेख महापौर आणि आमदार तसेच पत्नी ताहेरा शेख या देखील महापौर करण्यात त्यांचा सहभाग होता. यानंतर देखील त्यांनी लोकाग्रहास्तव महानगरपालिकेची निवडणूक लढविली. शिवसेनेशी युती करून २०१७ मध्ये पुन्हा महापौर झाले. गेली चार दशके त्यांनी शहरातील राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांची कारकीर्द चित्रपटाच्या कथानकात शोभेल अशी होती. सुरवातीच्या काळात त्यांनी बांगड्या विक्रीचा व्यवसाय केला. दानशूर अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला कोणीही रित्या हाताने परतत नसे. गरजूंना ते सढळ हाताने मदत करीत असत. ‘क्या लेके आए थे और क्या लेके जाएंगे’ अशी त्यांची भूमिका होती.