जन्माने कोणीही हिंदू किंवा मुस्लिम नसतो - अभिनेता आदिल हुसेन

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
अभिनेता आदिल हुसेन
अभिनेता आदिल हुसेन

 

एक उत्कृष्ट थिएटर कलाकार, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातील शिक्षक आणि आता बॉलीवूड व हॉलीवूड चित्रपटांमधील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे आदिल हुसेन. आसामचा अभिमान म्हणून आदिल यांची ओळख आहे. त्यांच्या पुरस्कारांमध्ये नॉर्वेजियनचा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' व 'शेक्सपियरच्या ऑथेलोची निर्मिती : ए प्ले इन ब्लॅक अँड व्हाईट' आणि 'गुडबाय डेस्डेमोनाचे यूके स्टेजिंग' राष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे. आदिल यांनी हिंदी, आसामी, बंगाली, तमिळ, मराठी, मल्याळम, नॉर्वेजियन, फ्रेंच आणि रिलकंट फंडामेंटलिस्ट आणि लाइफ ऑफ पाय यांसारख्या मुख्य प्रवाहातील हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पश्चिम आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एका आसामी मुस्लिम कुटुंबात जन्मलेले आदिल हुसेन यांचा सार्वभौमिकता, सर्वधर्म समानता आणि वसुदैव कुटुंबकम या पारंपरिक भारतीय मूल्यांवर ठाम विश्वास आहे. आवाज-द व्हॉईसला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत आदिल यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी, धर्म, राजकारण, भ्रष्टाचार, चित्रपट, त्यांचे स्वप्नांबद्दलचे विचार आणि श्रद्धा याबद्दल चर्चा केली. 

आवाज : लहानपणीचा आदिल हुसेन आणि आजचा आदिल हुसेन यात काय फरक आहे?
आदिल हुसेन : माणूस हळूहळू मोठा होत जातो. अनेक गोष्टींचा अभ्यास करतो आणि शेवटी म्हातारा होतो. माझ्याबाबतीतही तसेच आहे. पण माझ्या पालकांनी आणि माझ्या शिक्षकांनी मला हुशार, तीक्ष्ण आणि खोल विचार करायला शिकवले. जेव्हा मी नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) येथे शिकायला गेलो तेव्हा मी आणखी सखोल विचार करायला लागलो. एनएसडीमधील शिक्षकांनी मला शिकवले की आयुष्यात नेहमीच कोणत्याही घटनेला काळा किंवा पांढरा ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही घटनेला फक्त एक किंवा दोन बाजू नसतात, तर अनेक बाजू असतात. लहानपणी मला अनेक गोष्टी समजत नहोत्या. पण आता मला बऱ्याच गोष्टी कळतात. लहानपणापासून अनेक गोष्टींवरच्या माझ्या प्रतिक्रिया फार वेगळ्या आहेत. या जगात ७.५ अब्ज लोक राहतात. त्यामुळे मी ज्या प्रकारे एखाद्या घटनेकडे बघतो, त्याच घटनेकडे दुसरा व्यक्ती दुसऱ्या दृष्टीकोनातून बघतो. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात, मी कोणतीही घटना केवळ एक किंवा दोन दृष्टिकोनातून समजू शकलो, परंतु आता मी कोणत्याही घटनेला सर्व दृष्टिकोनातून पाहू किंवा समजू शकतो.

आवाज : तुमचा प्रवास किती आव्हानात्मक होता? तुमची प्रतिभा योग्य वेळी ओळखली गेली का?
आदिल हुसेन : प्रत्येकाची स्वतःची स्वतंत्र प्रतिभा असते. इतरांची किंवा स्वतःमधली अशी प्रतिभा ओळखता यायला हवी. आता अरिफुल, तू पत्रकारितेत आहेस कारण तुझ्याकडे या व्यवसायासाठी आवश्यक असलेली प्रतिभा आहे. जर तुमच्या वडिलांनी तुम्हाला वैद्यकशास्त्र शिकण्यास भाग पाडले असते, तर तुम्ही कदाचित निराश डॉक्टर बनला असता. मला वाटते की या जगातील जवळपास ९९ टक्के लोक त्यांना जे करायला आवडते ते करू शकत नाहीत. तसेच, माझ्या अभिनेता होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याबद्दल मी लोकांना दोष देऊ शकत नाही, कारण आसामच्या गोलपारा जिल्ह्यातील एका छोट्याशा ठिकाणचा आदिल हुसेन एक दिवस अभिनेता होईल असे त्यांना वाटणेही शक्य नव्हते. काळ्या त्वचेचा माणूस मोठा अभिनेता कसा होऊ शकतो, अशी लोकांची मानसिकता होती. जरी लोकांच्या धारणा आणि मानसिकतेमुळे काही प्रकरणांमध्ये नकारात्मक परिणाम झाले, तरीही मी ते सकारात्मक आणि आव्हानात्मक म्हणून स्वीकारले. माणसांनी किंवा निसर्गाने मला थांबवले नसते तर मला अभिनयाची किती आवड आहे हे मला कसे कळले असते? मला जर खरोखरच अभिनयाची आवड असेल तर सर्व अडथळ्यांना न जुमानता मी सराव करेन किंवा मला जे आवडते त्याची तयारी करेन. माझ्या प्रतिभेच्या विकासात मी माझ्या वडिलांनाही हस्तक्षेप करू दिला नाही.

एकदा मी मुंबईतील एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत असताना, त्या प्रॉडक्शन हाऊसला माझ्यासोबत स्टॅम्प पेपरवर एक करार करून घ्यायचा होता. तो करार असा होता की, पुढील दोन वर्षांत मी जे चित्रपट बनवणार, ते त्यांच्या परवानगीनेच बनवेन. मात्र, मी लगेचच प्रॉडक्शन हाऊसला सांगितले की मी एक असा व्यक्ती आहे ज्याने स्वतःच्या टॅलेंटचा विकास करताना स्वतःच्या वडिलांचेही ऐकले नाही. अशाप्रकारचा करार करून मी प्रोडक्शन हाऊसमध्ये कसे काम करू शकतो? तुम्ही ही अट दूर केली तरच मी तुमच्यासोबत काम करेन, असा ईमेल मी त्यांना पाठवला. त्यानंतर त्यांनी ती अट काढून टाकली.

आवाज : तुम्ही सुरुवातीला थिएटर ॲक्टर होते. सिनेमाकडे तुम्ही कसे आकर्षित झाले?
आदिल हुसेन : मी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आसामी चित्रपटातील नायक बिजू दा आणि निपोन दा यांना बघत मोठा झालो आहे. त्यामुळे मला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. एनएसडीमध्ये येण्यापूर्वी मी आसामीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. जेव्हा मी अभिनय शिकण्यासाठी एनएसडीमध्ये गेलो तेव्हा मी रंगमंचाच्या प्रेमात पडलो. स्टेजने मला माझी प्रतिभा दाखवण्याची संधी दिली. एसएसडीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशंसित दिग्दर्शक आहेत जे शेक्सपियर आणि बर्नार्ड शॉ यांच्यासह जगातील सर्वोत्तम लेखकांची नाटके आमच्यासमोर आणतात. ती नाटकं समजून घेणं, वेगवेगळी पात्रं साकारणं आणि रंगमंचावर सादर करणं महत्त्वाचं आहे. वर्षभर नाटकं करून जो आनंद मिळतो तो २५-३० वर्ष मी चित्रपटात काम करून गमावला आहे.

मी २००८ मध्ये एनएसडीमध्ये शिकवत होतो. एनएसडीमध्ये शिकवून मला जास्त पैसे मिळवता आले नाहीत. म्हणून माझ्या एका मित्राला त्याच्या चित्रपटात मला काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तो चित्रपट खूप लोकप्रिय झाला. त्या चित्रपटाचे नाव होते 'इस्किया'. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, अर्शद वारसी आहे. विद्या बालन यांनी त्यात माझ्या पत्नीची भूमिका साकारली आहे. पुढे काही दिवसांनी माझं लग्न झालं. लग्नानंतर मला आणखी काही पैशांची गरज होती, म्हणून मी चित्रपटांमध्ये अधिक अभिनय करू लागलो.

आवाज : तुम्ही चित्रपट किंवा चित्रपटातील पात्र कसे निवडता?
आदिल हुसेन : ९९ टक्के चित्रपटांच्या मी आधी कथा वाचतो आणि मग 'कॅरेक्टर ब्रीफ' बघतो. त्यांनतर मी माझ्या कामाचा तपशील विचारतो. सगळं वाचून, आवडलं तरच मी दिग्दर्शकाशी बोलतो. जर दिग्दर्शक ओळखीचा नसेल तर त्याच्याशी स्वत:हून जुळवून घ्यावं लागतं. कारण चित्रपटात काम करताना मला ३०-४० दिवस पत्नी किंवा मुलांपासून दूर राहावे लागते. मी ज्या लोकांसोबत काम करतो त्यांची कंपनी मला आवडली नाही तर मी त्यांच्यासोबत काम करू शकत नाही. तसेच, जेव्हा माझ्या बँक खात्यात पैसे संपतात आणि अक्षय कुमार मला चित्रपटात काम करण्यासाठी आमंत्रित करतात तेव्हा मी चित्रपटाची कथा आणि माझा रोल बघतो. 

आवाज : बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या तुलनेत तुम्ही आसामी चित्रपटांमध्ये कमी काम केले आहे. याचे कारण काय?
आदिल हुसेन : आसाममधून जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट येते तेव्हा मी सर्व प्रकारच्या चित्रपटांसाठी समान नियम पाळतो. मी सर्व चित्रपटांमध्ये असेच काम करतो. आसामी सिनेमाचा दर्जा कमी आहे असे मला कधीच वाटले नाही. एखादी चांगली कथा आणि सशक्त पात्रांचा चित्रपट माझ्याकडे आला तर तो मी करतो. मी आसामी चित्रपटांचा विचार इतर चित्रपटांप्रमाणेच करतो. मी श्रृंगाल नावाचा आसामी चित्रपट बनवला आहे, तो खूप सुंदर चित्रपट आहे. मी 'मिडनाईट कॅटरपिलर', 'कठनाडी' हेही चित्रपट केले आहेत. आसामी चित्रपटांमध्ये खूप पैसे कमवण्याचा विचार मी करू शकत नाही, कारण आसाममध्ये फार कमी पैसे आहेत. त्यामुळे कथा आणि पात्राचा दर्जा चांगला असेल तरच मी आसामी चित्रपट करतो. आसामी चित्रपटांसाठी जेवढे पैसे मी परदेशी किंवा मुंबईत मागतो तेवढे पैसे मला मागण्याची गरज नाही. जेव्हा एखादा चित्रपट कलात्मक दृष्टिकोनातून उच्च दर्जाचा असतो, तेव्हा मी तो करतो आणि चांगला वेळ स्पेंट केल्याचा मला आनंद असतो. 

आवाज : 'रघुपती'सारख्या काही आसामी चित्रपटांचे अलीकडचे यश पाहता, आसामी चित्रपटाचे भविष्य काय आहे असे तुम्हाला वाटते?
आदिल हुसेन : मी अद्याप कोणताही नवीन आसामी चित्रपट किंवा 'रघुपती' पाहिला नाही. मी मागे 'डॉ. 'बेझबरुआ' हा चित्रपट पाहिला कारण तो निपोन दा यांनी केला होता. एखादा कलात्मकदृष्ट्या चांगला असलेला चित्रपट पहिला की चित्रपटांना चांगले दिवस आलेत, असे मी म्हणतो. रीमा दासचा 'तारा का पती' खूप चांगला चित्रपट आहे. हा चित्रपट आसामी चित्रपट उद्योगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.

आवाज : आदिल हुसेन धर्माला कसं समजतात?
आदिल हुसेन : मला वाटतं धर्म ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. हिंदू कुटुंबात जन्म घेतला तरी हिंदू होऊ शकत नाही आणि मुस्लिमांचीही तीच परिस्थिती आहे. जेव्हा तो हिंदुत्वाच्या सर्वोच्च मूल्यांचे पालन करेल तेव्हाच मी त्याला खरा हिंदू म्हणेन. मुस्लिमांच्या बाबतीतही हेच आहे. खरे तर आपण सगळे हिंदूच होतो. आपली भारतातील सभ्यता दहा हजार वर्षे जुनी आहे. आपल्या पूर्वजांनी इस्लाम धर्म स्वीकारला ही दुसरी बाब आहे. मला असं वाटतं की मुलं शाळेत ज्या प्रकारे विषय निवडतात त्याच पद्धतीने त्यांना सर्व धार्मिक ग्रंथ वाचण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी कुराण, गीता आणि बायबल वाचावे. त्यांनी कोणता धर्म पाळायचा हा निर्णय त्याचा असावा. मी माझ्या निर्मात्याशी बांधलेल्या नात्यावर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, ना माझ्या वडिलांना, ना समाजाला, ना सरकारला. मी कोणता धर्म पाळावा हे सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही.

आवाज : आसामला नेहमीच शंकर आणि अजानची भूमी म्हटले जाते. आजकाल हिंदू-मुस्लिम एकमेकांशी भांडताना दिसतात, तुम्ही अशी घटना कधी पाहिली आहे का?
आदिल हुसेन : मला वैयक्तिकरित्या अशी घटना कुठेही पहिली नाही. अशा घटना घडवून आणण्यासाठी सहसा काही घटकांकडून काही लोकांचा वापर केला जातो. हे लोक कमी शिकलेले असतात. त्यांचा वापर करणारे अत्यंत हुशार असतात. धर्माच्या आधारे वाद निर्माण करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने धर्म माहीत नसतो. त्याचे पालनही ते करत नाही. मात्र, ते धर्माचा वापर वैयक्तिक हितासाठी करत असतात. मी माझ्या दुचाकीवरून दोन वर्ष संपूर्ण भारत फिरलो. मी खेड्यापाड्यात गेलो. मात्र, असा प्रसंग मला कधीच दिसला नाही. एकही मुस्लिम घर नसलेल्या गावातही मी खूप सुंदर वेळ घालवला.

जेव्हा जेव्हा मी धार्मिक भांडणे ऐकतो तेव्हा मला असे वाटते की ही सर्व भांडणे राजकारणातील आहेत. आरिफुल, तुझे नाव मुस्लिम नाव नाही, तुझे नाव अरबी नाव आहे. जगात असे अनेक अरबी भाषिक आहेत जे मुस्लिम नाहीत. जेव्हा लोक माझे नाव आदिल हुसैन ऐकतात तेव्हा ते समजतात की मी मुस्लिम आहे. अरबी भाषा आहे, इस्लाम धर्म आहे. भाषेचा धर्माशी काही संबंध नाही. आता जर पैगंबर मुहम्मद यांचा जन्म नॉर्वेमध्ये झाला असता तर ते नॉर्वेजियन झाले असते. त्यामुळे सर्व धार्मिक संघर्ष राजकारण किंवा सत्तेमुळे होतात असे माझे मत आहे.

आवाज : तुम्ही भारतीयाची व्याख्या कशी करता?
आदिल हुसेन : मी असे ऐकले आहे की भारताची सीमा एकेकाळी अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली होती. आता मला सध्याची राजकीय मर्यादा मान्य आहे. भारतीय ते आहेत जे जुन्या भारताच्या सीमेत राहतात आणि प्राचीन काळापासून भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे पालन करतात आणि त्याच्या तात्विक ग्रंथांचा आदर करतात. या देशात अजान फकीरही आला आहे, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीही आला आहे. या सुफी संतांकडे सर्व धर्मांचे लोक जात होते. निर्मात्याशी माझे नाते वैयक्तिक आहे. त्या वैयक्तिक नात्याचा आदर करणे महत्त्वाचे आहे. जर कोणी आदर करत नसेल, त्याने भारतीय सभ्यता स्वीकारली नाही, याचा अर्थ तो भारतीय नाही.

आवाज : तुमच्या लोकप्रियतेमुळे कोणी तुम्हाला राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले तर तुम्ही ते स्वीकारणार का?
आदिल हुसेन : राजकारणात येण्याचे निमंत्रण मला २०१४ मध्येच आले होते. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, गेल्या चार दशकांपासून मी माझ्या अभिनय कारकिर्दीत परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अजूनही मी त्यात परिपूर्ण झालेलो नाही. तर मग मी अचानक एक दोन रात्रीत राजकारणी कसा बनून जाऊ? मी राजकारणाचा अभ्यास केलेला नाही, मी अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाही, मी आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केलेला नाही, मी कधी सामाजिक अभ्यास केलेला नाही. अशा करिअरशी निगडित प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय मी राजकारणाला न्याय कसा देऊ शकतो? राजकारण करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. राजकारण करायचे असेल तर जनतेची सेवा करण्याची वृत्ती असायला हवी. त्याला मी स्वधर्म म्हणतो. एका गायकाला पोलिसात नोकरी दिली तर त्या नोकरीला तो कसा न्याय देणार? तुम्हाला जे करायला आवडते किंवा तुम्ही त्यात फिट असाल तरच तुम्ही त्यात पुढे जाऊ शकता.

माझे अनेक अभिनेते आणि कलाकार मित्र आहेत जे आता पोलीस आहेत. ते चांगले पोलीस कसे होवू शकतात? जी गोष्ट तुमच्या हृदयातून आणि आत्म्यातून येत नाही ती लादण्यात काय अर्थ आहे. मला वाटते राजकारण करायचे असेल तर नीट अभ्यास करावा लागतो. एक चांगला राजकारणी होण्यासाठी तुम्ही केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही मजबूत असायला हवे. माझा असा विश्वास आहे की, सध्याचे बहुतांश राजकारणी व्यवसायासाठी राजकारण करतात.

आवाज : तुम्हाला भविष्यात कोणत्या अभिनेत्यासोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडेल? 
आदिल हुसेन : मला अमोल पालेकरसोबत भारतात काम करण्याची खूप इच्छा आहे. परदेशात मला बेन किंग्सले, रॉबर्ट डी नीरो, डॅनियल डेलुइस यांच्यासोबत काम करायचे आहे. मला मार्टिन स्कोरसे आणि इतर काही जपानी दिग्दर्शकांसोबत काम करायलाही खूप आवडेल.

- अरिफुल इस्लाम, गुवाहाटी