भारतातील मुस्लिमांसह सर्वच वंचित आणि उपेक्षित घटकांच्या बौद्धिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे प्रसिद्ध विद्वान, जागतिक विचारवंत डॉ. मोहम्मद मंजूर आलम यांचे १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी निधन झाले. डॉ. आलम केवळ एक संशोधक नव्हते, तर ते शेकडो विद्वान आणि कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
९ ऑक्टोबर १९४५ रोजी बिहारमध्ये जन्मलेल्या डॉ. आलम यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी मिळवली. त्यांनी सौदी अरेबियाच्या अर्थ मंत्रालयात 'आर्थिक सल्लागार' म्हणून जबाबदारी पार पाडली आणि मदिना येथील 'किंग फाहद प्रिंटिंग कॉम्प्लेक्स'मध्ये कुराणच्या अनुवादाचे मुख्य समन्वयक म्हणून ऐतिहासिक कार्य केले.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे १९८६ मध्ये त्यांनी दिल्लीत स्थापन केलेली 'इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीज' (IOS). भारतीय मुस्लिम आणि इतर मागासवर्गीयांच्या बौद्धिक उन्नतीसाठी एक हक्काचा 'थिंक टँक' असावा, हे त्यांचे स्वप्न होते. डॉ. आलम यांच्या दूरदृष्टीमुळे आज ही संस्था शैक्षणिक संशोधन आणि आंतरधर्मीय संवादाचे जागतिक केंद्र बनली आहे. त्यांचे 'दी फायनल वेकअप कॉल' हे पुस्तक आजही वंचितांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते.
डॉ. आलम यांच्या निधनानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी त्यांना शब्दांजली वाहताना म्हटले आहे की, "डॉ. मोहम्मद मंजूर आलम हे प्रेरणेचे एक महान स्तंभ होते, ज्यांनी नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य केले. उपेक्षितांची उन्नती करणे, त्यांचे अश्रू पुसणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच त्यांचे जीवनव्रत होते. हीच ईश्वराची खरी सेवा आणि भक्ती आहे. भेदभावाच्या पलीकडे जाऊन पीडितांच्या बाजूने उभे राहणारे ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत राहील."
डॉ. आलम यांची खरी ओळख त्यांच्या नम्रतेत आणि समोरच्या माणसाला मोठे करण्याच्या वृत्तीत होती. विलक्षण नेतृत्वगुण असूनही ते नेहमीच जमिनीवर राहिले. वंचितांप्रति असलेली त्यांची तळमळ केवळ शब्दांत नव्हती, तर ती त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांमधून आजही दिसून येते.
ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलचे सहाय्यक सरचिटणीस शेख निजामुद्दीन यांनी डॉ. आलम यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे की, "डॉ. मोहम्मद मंजूर आलम यांनी विद्वत्ता, नेतृत्व आणि समाजसुधारणेचा एक अविस्मरणीय वारसा मागे ठेवला आहे. उपेक्षितांचे सक्षमीकरण, ज्ञानाचा प्रसार आणि नैतिक विकासाची त्यांची दृष्टी त्यांनी उभारलेल्या संस्थांच्या माध्यमातून आणि त्यांनी घडवलेल्या हजारो लोकांच्या आयुष्यातून सदैव जिवंत राहील. त्यांचे जीवन आपल्याला आठवण करून देते की, खरे नेतृत्व हे सेवा, विद्वत्ता आणि नैतिक सचोटीमध्ये दडलेले असते. ते आपल्यासाठी नेहमीच एक मार्गदर्शक प्रकाश आणि न्यायाचे खंबीर समर्थक म्हणून स्मरणात राहतील."