डॉ. आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करताना मौलाना हसरत मोहानी
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास इंकलाब जिंदाबाद, वंदे मातरम् या दोन घोषणांनी व्यापलेला आहे. या दोन्ही घोषणांनी क्रांतीकारक, स्वातंत्र्यसेनानी आणि स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांना स्फुरण चढत होते. वंदे मातरम् ही घोषणा बंकीमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत असलेल्या वंदे मातरम् गीतावरुन जन्माला आली आहे. वंदे मातरम् नंतर सर्वाधीक परिणामकारक ठरलेली घोषणा इंकलाब जिंदाबाद ही होती. ही घोषणा मौलाना हसरत मोहानी यांनी जन्माला घातली.
विद्यार्थीदशेतच इंग्रजांशी संघर्ष
मौलाना मोहानी हे मुळचे उन्नाव जिल्ह्याच्या मोहान कसब्यातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील होते. त्यांचा जन्म १८८१ साली झाला होता. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोहानमध्येच पुर्ण झाले होते. फतेहपूर गव्हर्मेंट कॉलेजमधून त्यांनी मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अलीगढ विद्यापीठात असतानाच त्यांनी आपल्यातील पारतंत्र्याच्याविरोधात लढण्याची मनोभुमिका दाखवून दिली होती. अलीगढच्या एमओयू कॉलेजचा प्राचार्य म्हणून त्याकाळी एक इंग्रज प्राध्यापक नियुक्त होता. तो भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुजाभावाचे वर्तन करीत असे. विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तनाच्याही काही घटना घडल्या होत्या. अलीगढ विद्यापीठात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका भारतीय विद्यार्थ्याला एका पोलीस आधिकाऱ्याने रोखले. तेव्हा तो विद्यार्थी पोलीस आधिकाऱ्याला धक्का देऊन प्रदर्शनात दाखल झाला. तेव्हा पोलीस आधिकाऱ्याने याविषयी अतिरंजक पध्दतीने पोलीस सुप्रिटेडंटकडे तक्रार केली. सुप्रिटेडंटने प्राचार्याने याविषयी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर प्राचार्यांनी संबंधीत विद्यार्थ्याला निलंबीत केले.
प्राचार्यांच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला. विद्यार्थ्यांमधील असंतोषांचे नेतृत्व हसरत मोहानी यांनी केले. प्राचार्याकडे विद्यार्थ्यांनी सदरचा निर्णय परत घेण्याची मागणी केली. पण प्राचार्याने ही मागणी धुडकावून लावली. तेव्हा विद्यार्थ्यांने माफी मागून महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला. या घटनेने हसरत मोहानींचे मन विषण्ण झाले. या घटनेनंतर इंग्रजांना या देशातून बाहेर काढण्याचा व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे विचार आधिक प्रकर्षाने समोर यायला लागले.
अलीगढ मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘उर्दू ए मुअल्ला’ हे वर्तमानपत्र काढले. मोहानी यांनी या वर्तमानपत्राच्या सुरुवात करताना त्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. आपण या देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी हे वर्तमानपत्र चालवत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. एकदा इजिप्तमधील इंग्रजांच्या धोरणावर टिका करणारा एक लेख त्यांनी लिहीला होता. हा लेख राजद्रोह करणारा असल्याचा ठपका ठेऊन त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांना काही वेळा घाण्यालाही जुंपले जात होते.
तरीही हसरत मोहानी आपल्या स्वातंत्र्यनिष्ठेपासून तसूभरही ढळले नाहीत. ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपली पत्रकारीता सुरु केली. ते सातत्याने इंग्रजांवर टिका करुन लागले. इंग्रजांच्या विरोधात वेगवेगळ्या आंदोलनात देखील ते सहभागी झाले होते. त्यांच्या या स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागामुळे त्यांना सातत्याने तुरुंगात जावे लागे. त्यांनी आपल्या आयुष्यातील एकूण दहा वर्षे तुरुंगात घालवली. त्यांच्या वर्तमानपत्रावरही जप्ती आणली.
टिळकांशी स्नेह
मौलानांच्या जोषपूर्ण भाषणांमुळे आणि त्यांच्या लिखाणामुळे त्यांचा समावेश राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या नेत्यांमध्ये व्हायला लागला. ते स्वतः लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांच्यापासून प्रभावित होते. घोष यांना ते आपला गुरु मानायचे. टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर मोहानी यांनी याविषयी एक शेर लिहीला होता. त्या शेर मध्ये ते म्हणतात,
आझादी ए हिंद की ख्वाहीश को मकबूल ए ख्वास व आम किया
दिल अहल ए सितम के बैठ गए, वो बाल तिलक ने काम किया॥
सब हिंद के गरम अखबारों में मजमून लिखे कैसे कैसे
जिसे फिरंगी डरते थे, इस काम को सरे अंजाम दिया॥
हसरत मोहानी यांचे टिळकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. टिळकांच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्यासाठी ते प्रयत्न करत असत. टिळकांनी पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरु केल्यानंतर मोहानी यांनी त्याचे समर्थन केले होते. या सार्वजनिक गणेशोत्सवात सामील होण्यासाठी मोहानी दरवर्षी महाराष्ट्रात येत असत. मोहानी यांनी याच्या समर्थनार्थ काही लेखही लिहीले होते. गणेशोत्सवाच्या संकल्पनेविषयी मोहानींना असणारी आस्था किती महत्वाची होती. याविषयी काही समकालीनांनी लिखाण केले आहे.
टिळकांच्यानंतर मोहानी यांनी काँग्रेसच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. अहमदाबादच्या काँग्रेसच्या आधिवेशनात हसरत मोहानी यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता. हा ठराव गांधीनी संमत होऊ दिला नाही. खादी कपड्याच्या वापराचा संदर्भात गांधींची भूमिका महत्वाची होती. पण गांधींच्या बरोबरीने खादीच्या प्रचारासाठी मोहानी यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी खादी कपड्याच्या वापराला स्वातंत्र्याचे एक माध्यम मानले होते. ब्रिटीशांच्या सत्तेचे मुळ व्यापारपेठतील शोषण हे होते. त्याविरोधात खादीच्या माध्यमातून ब्रिटीशांच्या व्यापारी धोरणाला सुरुंग लावता येतो हे मोहानी यांनी लोकांना आपल्या कविता व लेखातून पटवून सांगितले.
कानपूरचे खिलाफत स्वदेशी स्टोअर
स्वदेशी चळवळीला लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मोठमोठ्या सभा घेतल्या. कानपूरमध्ये मोहानी यांनी भारतातील पहिले खादी भांडार ‘खिलाफत स्वदेशी स्टोअर’ या नावाने उघडले होते. मौलाना हसरत मोहानी यांनी या खादी स्टोअरचा वापर स्वातंत्र्य चळवळीतील भुमिगत संपर्क जाळे चालवण्यासाठी देखील केले. गांधींच्या आंदोलनातील महत्वाच्या निर्णयांसंदर्भात या खादी स्टोअरमध्येच चर्चा केली जात होती.
खिलाफत चळवळीचे नेते अली बंधू देखील याच खादी स्टोअर मध्ये मौलाना हसरत मोहानी यांच्या चर्चा करत होते. खिलाफत चळवळीच्या अनेक महत्वाच्या निर्णयांवर येथेच शिक्कामोर्तब झाले होते. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या स्वराज्य पार्टीचे ध्येय धोरण देखील येथेच ठरवण्यात आले होते. जमिअत उलेमाचे महत्वाचे नेते मौलाना हुसैन अहमद मदनी हे देखील जमिअत उलेमाच्या चळवळीच्या बैठका येथेच घेत असत. स्वदेशी स्टोअर चळवळ्या तरुणांचे केंद्र बनले होते. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग हे काही दिवस या स्टोअरमध्ये आश्रयाला होते.
कालांतराने गांधींशी मोहानी यांचे मतभेद झाले. त्यानंतर या स्वदेशी स्टोअरमध्ये मौलाना हसरत मोहानी यांनी सहकाऱ्यांसोबत मिळून 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया'ची स्थापना केली. कम्युनिस्ट पार्टीच्या भविष्यकालीन वाटचालीसंदर्भातील निर्णय देखील मोहानी व सहकऱ्यांनी या स्टोअरमध्ये घेतले होते. कम्युनिस्ट पक्षाच्या फाऊंडेशन कमिटीमध्ये बेगम हसरत मोहानी, रामप्रसाद मिश्रा, सरदार अली साबरी, वाहिदयार खान यांच्यासह काही तरुणांचा समावेश होता. स्टोअरमध्ये पार्टीची बैठक झाल्यानंतर सत्यभगत यांना सचिव म्हणून नेमण्यात आले होते.
हसरत मोहानी स्वातंत्र्याच्या अनेक चळवळींमध्ये सहभागी होते. खिलाफत आंदोलनासाठी ते देशभर फिरत होते. त्यामाध्यमातून मुस्लिम समाज आणि हिंदू बांधवांमध्ये परस्पर सहकार्य प्रस्थपित करण्याचा त्यांनी प्रयत्न केल. इसवी सन १९२१ मध्ये इंकलाब जिंदाबाद ही घोषणा दिली. त्यानंतर भगतसिंगानी हीच घोषणा देत ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या ॲसेम्बलीत बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर ही घोषणा प्रत्येक भारतीय क्रांतीकारकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली होती. हसरत मोहानी यांनी आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षाहून आधिक काळ भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्यात घालवला.
~ सरफराज अहमद