प्रख्यात इस्लामिक अभ्यासक आणि विचारवंत आझमी नदवी यांचे निधन: अखिलेश यादव, श्री श्री रविशंकर यांच्याकडून श्रद्धांजली

Story by  पुणे | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
प्रख्यात इस्लामिक अभ्यासक आणि विचारवंत आझमी नदवी
प्रख्यात इस्लामिक अभ्यासक आणि विचारवंत आझमी नदवी

 

मृदगंधा दीक्षित 

समाजात अशी काही मोजकीच माणसं असतात, ज्यांच्या असण्याने त्या त्या संपूर्ण पिढीला आणि समाजाला एक वैचारिक आधार मिळत असतो. अशी माणसं या जगाचा निरोप घेतात, तेव्हा ज्ञानाचं आणि परंपरेचं एक चालतंबोलतं विद्यापीठच आपल्यातून कायमचं निघून जातं. जगभरात आणि देशभरात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवणारे प्रख्यात अभ्यासक आणि विचारवंत आझमी नदवी यांचं नुकतंच निधन झालं. धार्मिक किंवा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांचे मूळ नाव सईद-उर-रहमान असे होते.त्यांच्या नावातील 'आझमी' हा शब्द त्यांच्या मूळ भौगोलिक परिसराशी (उत्तर प्रदेशातील आझमगढ) संबंधित आहे, तर 'नदवी' ही उपाधी त्यांनी 'नदवतुल उलेमा' या संस्थेतून शिक्षण घेतल्यामुळे लागलेली आहे.

लखनौ येथील जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक इस्लामिक शिक्षण संस्था 'दारुल उलूम नदवतुल उलेमा'चे मुहतमिम, 'अल-बास अल-इस्लामी'या प्रसिद्ध आणि जगभर वाचल्या जाणाऱ्या अरबी मासिकाचे मुख्य संपादक आहेत आणि लखनौ येथीलइंटिग्रल युनिव्हर्सिटीचे कुलपती असणारे आझमी नदवी यांचे काल म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी येताच विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीज'पासून ते उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळापर्यंत सर्वांनीच त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

ज्ञान आणि साहित्याचा चालताबोलता कोश हरपला!

'इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीज'चे महासचिव मोहम्मद आलम यांनी आझमी नदवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नदवी साहेबांच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिले, तर ते एका ध्येयवेड्या तपस्व्यासारखे भासते. मोहम्मद आलम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. आलम यांच्या मते, आझमी नदवी हे असे एक थोर अभ्यासक आणि विद्वानहोते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ शिक्षण, विपुल लेखन, इस्लामिक विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी खर्ची घातले.

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात स्वतःचे आयुष्य दुसऱ्यांचे भविष्य घडवण्यासाठी वाहून घेणारी माणसं खरंच खूप कमी उरली आहेत. आझमी नदवी हे त्यापैकीच एक होते. ते विद्यार्थ्यांसाठी एका दीपस्तंभासारखे होते. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या किंवा संभ्रमात असलेल्या शेकडो-हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणले.

अरबी भाषा, संशोधन आणि ज्ञानाचा प्रसार

अरबी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रात नदवी साहेबांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. अरबी भाषेतील बारकावे, त्यातील सौंदर्य आणि त्या भाषेचा सखोल अभ्यास त्यांनी  स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजापर्यंत पोहोचवला.

त्यांचे ग्रंथलेखन, त्यांचे सखोल संशोधन आणि इस्लामिक ज्ञानाचा सकारात्मक प्रसार करण्याची त्यांची तळमळ कायमच सर्वांसाठी प्रेरणादायी राहिली आहे. धार्मिक ज्ञानाचा खरा अर्थ काय असतो आणि तो मानवी कल्याणासाठी कसा वापरावा, याचा एक उत्तम आदर्श त्यांनी आपल्या लेखनातून आणि संशोधनातून समाजासमोर ठेवला. त्यांच्या या विपुल ग्रंथसंपदेमुळे आणि संशोधनामुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन मिळत राहील, यात कसलीही शंका नाही.

राजकीय वर्तुळातूनही हळहळ: अखिलेश यादव यांची भावपूर्ण श्रद्धांजली

एखाद्या अभ्यासकाचे किंवा विचारवंताचे काम जेव्हा खऱ्या अर्थाने मोठे असते, तेव्हा त्याची दखल समाजाच्या प्रत्येक घटकाला घ्यावीच लागते. आझमी नदवी यांच्या निधनानंतर केवळ शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांनीच नाही, तर देशातील आणि राज्यातील मोठ्या राजकीय नेत्यांनीहीत्यांना आदराने श्रद्धांजली वाहिली आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आझमी नदवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अखिलेश यादव यांनी नदवी साहेबांचे वर्णन 'एक अत्यंत उमदा आणि थोर माणूस' असे केले आहे. राजकारणाच्या पल्याड जाऊन एका राजकीय नेत्याने एका शिक्षणतज्ज्ञाला वाहिलेली ही श्रद्धांजली खूप काही सांगून जाते.

अखिलेश यादव यांनी आपल्या अधिकृत शोकसंदेशात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर— "ही बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. ते एक अत्यंत थोर आणि उमद्या स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना शिकवण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आणि 'नदवा'ची महान परंपरा पुढे नेण्यासाठी समर्पित केलं."

अखिलेश यादव पुढे म्हणाले, 'आज ते आपल्यात नाहीत, ही खरोखरच अत्यंत दुःखाची बाब आहे. त्यांच्यासारखी माणसं आताच्या काळात मिळणं खूप दुर्मिळ (Rare) झालं आहे आणि तशा माणसांची ती जुनी, निस्सीम पिढी आता आपल्यातून कायमची निघून जात आहे."

अखिलेश यादव यांचे हे शब्द खरेच आहेत. कारण 'नदवा'सारख्या (नदवतुल उलामा) ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेची वैचारिक परंपरा जतन करणे आणि ती पुढच्या पिढीकडे अत्यंत सुरक्षितपणे सोपवणे, हे शिवधनुष्य पेलण्याचे काम आझमी नदवी यांनी लिलया पार पाडले.

श्री श्री रविशंकर यांनीही आझमी नदवी यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत त्यांना आपल्या 'ऑफिस ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर' च्या अधिकृत पत्राद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे:

 "आम्ही सर्वजण त्याच एका तेजातून (नूर) आलो आहोत आणि शेवटी त्याच तेजात विलीन होतो. जन्म आणि मृत्यू हे तर या शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाही. देह पंचमहाभूतात विलीन होतो, परंतु आत्मा सदैव अजन्मा, नित्य आणि अविनाशी राहतो. मौलाना डॉ. सईदउर्रहमान आझमी नदवी यांनी आपल्या अफाट ज्ञान आणि सेवेच्या बळावर हजारो जीवन समृद्ध केले. त्यांचा हा वारसा त्यांनी स्पर्श केलेल्या, सावरलेल्या आणि नवी दिशा दिलेल्या हजारो हृदयात व आयुष्यात कायम सुरक्षित राहील. त्यांचे ज्ञान, त्यांचे आदर्श आणि सेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा येणाऱ्या अनेक पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करत राहील. हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली असेल."

जेव्हा एखादा माणूस खऱ्या अर्थाने ज्ञानाची उपासना करतो आणि समाजातील अंधार दूर करण्यासाठी शिक्षणाची ज्योत हाती घेतो, तेव्हा त्याचे कार्य हे कोणत्याही एका धर्माचे किंवा जातीचे राहत नाही; तो माणूस संपूर्ण देशाचा आणि मानवतेचा अनमोल ठेवा बनतो. आझमी नदवी हे याच मानवतेचे आणि ज्ञानाचे चालतेबोलते प्रतीक होते.

माणूस जेव्हा जन्म घेतो, तेव्हा तो सोबत काहीही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. पण आझमी नदवींसारखी माणसं जाताना मागे ज्ञानाचा, साहित्याचा आणि संस्कारांचा असा काही मोठा खजिना सोडून जातात, जो हजारो वर्षे समाजाला योग्य रस्ता दाखवत राहतो. 'इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीज'ने गमावलेला एक मोठा मार्गदर्शक, 'नदवा'ने गमावलेला आपला एक मजबूत आधारस्तंभ आणि हजारो विद्यार्थ्यांनी गमावलेला त्यांचा एक सच्चा गुरु... ही पोकळी कदाचित कधीच भरून निघणार नाही.

त्यांच्या अरबी साहित्यातील योगदानाला, त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अखंड तपश्चर्येला आणि त्यांनी घडवलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला 'आवाज मराठी'चा सलाम.