मायभूमीशीच 'ती' चं अतूट नातं!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 13 d ago
 सानिया मिर्झा
सानिया मिर्झा

 

- प्रतिमा जोशी
 
जगातील वलयांकित खेळाडू सानिया मिर्झा हिने आपल्या रॅकेटची अनोखी, पण शेवटची करामत पेश केली ती आपल्या होमग्राऊंडवर. या भारत देशाची ती सुकन्या आहे, हेच तिच्या या कृतीने अधोरेखित केले आहे. जगभरातील स्वर्गीय नजारे पाहिले, अवीट चवी चाखल्या तरी आपल्या मायभूमीतील आपल्या घरातील साधे जेवण माणसाला गोड लागते ते असे...
 
 रविवारी, ५ मार्च रोजी हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियममध्ये आपल्या रॅकेटची अनोखी, पण शेवटची करामत पेश करत देशाची टेनिसकन्या सानिया मिर्झा हिने क्रीडा रसिकांचा निरोप घेतला. ज्या टेनिस कोर्टवरून तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली, तेथेच...
 
‘आपल्या’ लोकांच्या साक्षीने त्याची सांगता करण्याचे तिचे स्वप्न तिने जिद्दीने पूर्णत्वाला नेले. आपल्या देशाला तीन महिला दुहेरी आणि तीन मिश्र दुहेरी अशी टेनिसमधील तब्बल सहा मोठी जागतिक नामांकित विजेतेपदे मिळवून देणारी ही स्टार खेळाडू.
 
तिने २००३ला खेळायला सुरुवात केली तिथपासून ते एकेरीमधून तिने निवृत्ती घेईपर्यंत, म्हणजे २०१३ पर्यंत वुमेन्स टेनिस असोसिएशनने तिची नोंद एकेरी सामन्यांतील अव्वल, क्रमांक एकची खेळाडू अशी केली होती. एक पूर्ण दशक अशी नोंद नावावर असणे ही मोठीच कर्तबगारी आहे.
 
ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन, ऑलिम्पिक अशा सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये तिने आपली ‘हाथ की सफाई’ दाखवली आहे. एकूण ४३ टायटल ती जिंकली आहे. तिच्या टेनिस कारकिर्दीवर एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल इतके कर्तृत्व तिच्या नावावर जमा आहे आणि ते तिने मेहनतीने आणि अपार जिद्दीने कमावले आहे.
 
चोख २० वर्षांची अभिमानास्पद कारकीर्द वयाच्या ३६व्या वर्षी थांबवताना आपल्या ‘होम ग्राऊंड’वरच हा व्यावसायिक पूर्णविराम तिला द्यावासा वाटला. आपण जिथे घडलो, जिथे आपण वाट चालायला सुरुवात केली, तिथेच...
 
त्याच मातीच्या साक्षीने हा विराम तिला घ्यावासा वाटला. जगातील वलयांकित खेळाडू, गाजलेली टेनिस कोर्ट, जागतिक कीर्तीचे मान्यवर या सर्व झगमगाटात मानाने मिरवलेली सानिया अखेरीस या भारत देशाची सुकन्या आहे, हेच तिच्या या कृतीने अधोरेखित केले आहे. जगभरातील स्वर्गीय नजारे पाहिले, अवीट चवी चाखल्या तरी आपल्या मायभूमीतील आपल्या घरातील साधे जेवण माणसाला गोड लागते, ते असे.
 
पण सारे असे गोडगोडच आहे का? सानियाला आपण देशवासीयांनी खरेच किती कौतुकाने वागवले आहे? तिच्या गुणांची कदर केली आहे? तिला देशाची मुलगी मानली आहे?
 
थोडे मागे वळून पाहिले, तर सानियाशी आपण थोडे हातचे राखूनच वागलो आहोत... एवढेच नव्हे, तर तिला अवमानकारक बोललो आहोत... सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. तिने पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याच्याशी सन २०१० मध्ये विवाह केला आणि तिचे सगळे गुण, कामगिरी आणि देशासाठी तिने आणलेले सन्मान या कशाचीही पर्वा न करता तिच्या देशप्रेमाबद्दल...
 
एकंदर तिच्याबद्दलच शंका उपस्थित करत टीकेचा भडिमार केला गेला. शत्रूशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला. तिचा जन्मधर्म अनेकांना खुपू लागला... क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ असला, तरी आपल्याकडे आधीच भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जणू युद्ध असल्यागत वातावरण तापलेले असते. तो खेळ उरत नाही. हे एक वेळ बाजूला ठेवू...
 
पण देशात सामंजस्याने राहावे, धर्मावरून दुही नको, अशी भूमिका घेणाऱ्या कायदाप्रिय सर्वसामान्य आणि अगदी मान्यवर भारतीय नागरिकांनाही : त्यांची ‘बाजू घेता... पाकिस्तानात चालते व्हा’, असे पवित्रे काही कट्टर मंडळींकडून घेतले जातात. अशा वातावरणात सानियाचा जोडीदार निवडीचा निर्णय विवादास्पद बनून गेला; पण सानियाची झुंज इतकीच नव्हती.
 
तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला टेनिसपटूंच्या ड्रेस कोडनुसार ती परिधान करत असलेल्या स्कर्टबद्दल काही कडव्या मौलानांनी नापसंतीचे सूर काढले होते. स्त्रियांचे खुल्या जगात वावरणे, वेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करणे हे धर्मविरोधी आहे, असा दबाव आणला गेला; पण ही जिद्दी मुलगी खेळायची थांबली नाही..
 
आणि पुढच्या आयुष्यातही आपण कोणाबरोबर आयुष्य घालवायचे, याचा एकदा घेतलेला निर्णय तिने बदलला नाही. ती सर्व प्रकारच्या कट्टरवाद्यांना पुरून उरली. या सर्व संघर्षातून तिने तिचा सराव, खेळावरील ध्यान हटू दिले नाही. मैदानावरील सामन्यात प्रत्येक खेळाडूला सामोरे जावे लागणाऱ्या शारीरिक दुखापतींनी तिलाही बेजार केले.
 
तिने त्यावरही मात केली. एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर खंबीर राहिलेली सानिया अर्जुनाला जसा केवळ पोपटाचा डोळा दिसत होता, तशी केवळ आपल्या खेळावर... कामगिरीवर लक्ष केंद्रित करत राहिली. अधूनमधून वादातसुद्धा सापडली; पण हाही टप्पा अनेक खेळाडूंना पार करावा लागतोच.
 
मुद्दा आपण भारतीय नागरिक म्हणून कसे वागतो, हा आहे. जात, धर्म यांच्या वेटोळ्यातून कधी बाहेर पडणार हा आहे. न आवडलेल्या गोष्टी घट्ट धरून बसत समोरच्यावर वैयक्तिक दोषारोप आणि कधी कधी हल्लेसुद्धा करणे कधी थांबवणार, हा आहे. पी. व्ही. सिंधूच्या पहिल्या जागतिक कामगिरीनंतर गुगलवर सर्वाधिक सर्च काय केलं गेलं होतं, तर पी. व्ही. सिंधू कास्ट!
 
नीरज चोप्राच्या सोनेरी कामगिरीनंतर तो हरियाणवी की रोड मराठा याची चर्चा होते... हे सगळेच प्रथम भारतीय आहेत आणि अखेरीसही भारतीयच आहेत!! पेशावरमध्ये जन्मलेला मोहम्मद युसुफ खान याची जागतिक पटलांवरील नोंद दिलीप कुमार, द ग्रेट इंडियन ॲक्टर अशी होते... ते जसे भारताची शान पद्मविभूषण दिलीप कुमारजी असतात तसेच निशान ए पाकिस्तानसुद्धा असतात...
 
खरे तर ते जागतिक व्यक्तिमत्त्व असते... भारताच्या मातीत अखेरचे मिसळून गेलेले जागतिक व्यक्तिमत्त्व! अगदी असेच भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना कराची येथे जाऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो.
 
राजकीय वाद होत राहतील, भौगोलिक सीमा कदाचित पुसता येणार नाहीत... एकाच आईच्या पोटी जन्मलेली भावंडेसुद्धा स्वतंत्र संसार थाटतात, एकाच देशातील दोन राज्ये परस्परांशी स्पर्धा करतात... नवे राज्य मागतात तिथे आंतरराष्ट्रीय राजकारण राहणार...
 
पण कलावंत, खेळाडू, लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत, संशोधक यांच्या मायभूमीवरील प्रेमाबाबत शंका कशाला घ्यावी? भारतावर ऐतिहासिक आणि धार्मिक हक्क सांगणाऱ्या कित्येकांची मुले स्वेच्छेने दुसऱ्या देशाची नागरिक होतात आणि मायभूमीचा कायमचा निरोप घेतातच ना?