सावित्रीबाई फुले जयंती विशेष : फुले दाम्पत्याच्या विचारातून आजही प्रेरणा घेतोय मुस्लिम समाज
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 1 d ago
सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले
समीर दि. शेख
भारतीय स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. १९ व्या शतकातील समाजसुधारणेचे पर्व महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. फुले दाम्पत्याने शूद्र-अतिशूद्र आणि महिलांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यात मुस्लिम समाजाच्या योगदानाविषयी अनेकांना फारशी माहिती नाही.
महात्मा फुलेंचा इस्लामप्रती आदर
महात्मा जोतिराव फुले यांचा इस्लामबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत उदार होता. अर्थात इस्लाममधील समतेची कल्पना त्यांना विशेष भावली. त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याचा गौरव करणारा एक पोवाडा लिहिला आहे. त्यातील ओळी इस्लाममधील समतेचा संदेश अधोरेखित करतात:
"धनी गरिबासी एकची मानितो ।
सर्वही देतो सुख त्यांना ॥
मोहम्मद ज्याचा जगी बोलबाला ।
सत्य मार्ग त्याने दाखविला ॥"
(हा पूर्ण पोवाडा 'आवाज-द-व्हॉईस'च्या युट्यूब चॅनेलवर वाचता आणि पाहता येईल.)
उस्मान शेख आणि फातिमा शेख : संकटातील आधारस्तंभ
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई जेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या, तेव्हा त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. विरोधाची धार इतकी तीव्र होती की खुद्द वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. अशा कठीण प्रसंगी उस्मान शेख हे मुस्लिम मित्र त्यांच्या मदतीला धावून आले. उस्मान शेख यांनी फुले दाम्पत्याला केवळ राहण्यासाठी घरच दिले नाही, तर आपल्याच घरात शाळा सुरू करण्याची परवानगीही दिली.
या प्रवासात सावित्रीबाईंना साथ मिळाली ती फातिमा शेख यांची. फातिमा शेख या सावित्रीबाईंच्या पहिल्या मुस्लिम सहकारी शिक्षिका होत्या. सावित्रीबाई जेव्हा पुण्याच्या रस्त्यावरून शाळेत जायला निघायच्या, तेव्हा लोक त्यांच्यावर शेण-दगड फेकायचे. अशा वेळी सावित्रीबाई आपल्या पिशवीत दुसरी साडी सोबत ठेवायच्या. हा अपमान आणि छळ सोसताना फातिमा शेख सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या.
सावित्रीबाई यांनी महात्मा फुले यांना लिहिलेल्या पत्रात फातिमावरील त्यांचा विश्वास अधोरेखित होतो. परगावी असलेल्या सावित्रीबाई लिहितात, ‘माझ्या अनुपस्थितीत फातिमावर कामाचा भार पडेल, पण ती कुरकुर करणार नाही.’
सावित्रीबाईंचे कार्य आणि 'काव्यफुले'
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासोबतच विधवांच्या केशवपनासारख्या प्रथांविरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला आणि 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. त्यांच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थिनींमध्ये मुस्लिम मुलींचा मोठा सहभाग होता. फातिमा शेख यांनी या मुलींना शाळेत आणण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.
सावित्रीबाईंनी परगावी असताना सावित्रीबाईंच्या 'काव्यफुले' या कवितासंग्रहातून त्यांच्या विचारांची प्रगल्भता जाणवते. पुण्यातील येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नसरीन रमजान यांनी या संग्रहाचे उर्दूमध्ये भाषांतर केले आहे, जेणेकरून हा विचार मुस्लिम समुदायापर्यंत पोहोचावा. आवाज मराठीने यावर विस्तृतपणे केलेली स्टोरी तुम्ही इथे वाचू शकाल.
फुले दाम्पत्याकडून आजच्या पिढीला मिळतेय प्रेरणा
९० च्या दशकात फुले दाम्पत्याचे अनुवादित साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यामुळे बहुजन समाजाने या विचारांतून मोठी प्रेरणा घेतली. आता मुस्लिम समुदायाने फुले दाम्पत्य आणि फातिमा शेख यांच्यापासून मोठी प्रेरणा घेतली आहे. आज महाराष्ट्रात आणि देशभर फातिमा शेख यांच्या नावाने ५० हून अधिक फेसबुक पेजेस आहेत. मुंबईतील मुस्लीमबहुल मुंब्रासारख्या ठिकाणी 'फातिमा शेख स्टडी सर्कल' कार्यरत आहेत. तिथे मुस्लिम तरुण-तरुणी एकत्र येऊन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवतात.
पुणे येथील गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यावर आज केवळ बहुजन समाजातील लोकच नाही, तर मोठ्या संख्येने मुस्लिम महिला अभिवादन करण्यासाठी येतात. आजही तेच चित्र पाहायला मिळाले. आझम कॅम्पससारख्या पुण्यातील मुस्लीमबहुल मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांच्या नावाने अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. मुले-मुली सावित्री-फातिमा यांच्यावर भाषणे करतात, त्यातून प्रेरणा घेतात.
एकूणच, महात्मा फुले सावित्रीबाईंचे कार्य आणि त्यांना मिळालेली मुस्लिम सहकाऱ्यांची साथ हे धार्मिक सौहार्दाचे एक जिवंत उदाहरण आहे. ही ऐतिहासिक युती आजही मुस्लीम समाजाला मोठी प्रेरणा देत आहे यात शंका नाही!
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -