शुभांशु शुक्ला : पृथ्वीच्या पलीकडे भारताचा झेंडा फडकवणारा अंतराळवीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
अंतराळवीर शुभांशु शुक्ला
अंतराळवीर शुभांशु शुक्ला

 

मलिक असगर हाशमी

“तो आला आणि त्याने आसमंत व्यापला” - २०२५ सालातील भारताच्या एखाद्या नायकाला ही ओळ सर्वात चपखल बसत असेल, तर ते नाव आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. अंतराळाचा अथांग वेध घेत त्यांनी केवळ इतिहासच रचला नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांना नवी भरारी दिली. वर्षाच्या शेवटी २०२५ ला निरोप देताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचून ब्रह्मांडाच्या नकाशावर भारताची उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित करणाऱ्या या भारतीयाचे स्मरण करणे स्वाभाविकच आहे.

अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाऊल ठेवणारे पहिले भारतीय बनून इतिहास घडवला. ते पृथ्वीवर परतले तेव्हा संपूर्ण देश अभिमानाने मोहरून गेला. एक्सिओम-४ (Ax-4) मोहिमेचे अंतराळयान जेव्हा कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो किनाऱ्याजवळ प्रशांत महासागरात सुरक्षित उतरले, तेव्हा तो केवळ एक यशस्वी 'स्प्लॅशडाऊन' नव्हता, तर भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षांचा भक्कम पुरावा होता. भारतीय वेळेनुसार १५:०१ वाजता झालेल्या या लँडिंगचे थेट प्रक्षेपण लाखो लोकांनी डोळ्यांत आशा, चेहऱ्यावर अभिमान आणि मनात थरार अनुभवत पाहिले.

ह्युस्टनस्थित खाजगी कंपनी 'एक्सिओम स्पेस'द्वारे ही मोहीम संचालित होती, तरी तिचा आत्मा आंतरराष्ट्रीय सहकार्यात वसलेला होता. नासा, इस्रो, युरोपियन स्पेस एजन्सी आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त प्रयत्नांतून Ax-4 मोहीम पार पडली. मोहिमेची सूत्रे नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या हाती होती, तर वैमानिकाची (पायलट) भूमिका ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी पार पाडली. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोश उझनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हेदेखील या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार होते.

२६ जूनला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेली ही टीम मूळात दोन आठवड्यांच्या मुक्कासाठी गेली होती, परंतु मोहीम काही दिवस अधिक चालली. या काळात चमूने ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले. यातील सात प्रयोग इस्रोने डिझाइन केलेले होते. या प्रयोगांचे महत्त्व केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित नाही; भारताच्या भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांचा पाया भक्कम करणारे हे अनुभव आहेत. या मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला यांच्या जागेवर आणि प्रशिक्षणावर इस्रोने सुमारे ५ अब्ज रुपये खर्च केले. याला संस्था भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक मानते.

राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोयुझ यानातून अंतराळात झेप घेतली होती. त्यानंतर ४१ वर्षांनी हा योग जुळून आला. फरक इतकाच होता की, यावेळी भारत केवळ सहभागी नव्हता, तर भविष्याची दिशा ठरवणाऱ्यांमध्येही सामील होता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून निरोप घेताना शुभांशु शुक्ला यांनी केलेले भाषण भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. भारताचा मानवी अंतराळ प्रवास कठीण असला तरी तो सुरू झाला आहे आणि संकल्प पक्का असेल तर ताऱ्यांनाही स्पर्श करता येतो, असे त्यांनी सांगितले.

राकेश शर्मांच्या त्या ऐतिहासिक शब्दांची आठवण करून देत त्यांनी प्रसिद्ध उर्दू गीत “सारे जहाँ से अच्छा”चा संदर्भ दिला आणि त्यानंतर स्वतःच्या शब्दांत आजच्या भारताचे चित्र रेखाटले. अंतराळातून पाहताना भारत महत्त्वाकांक्षी, निडर, आत्मविश्वासपूर्ण आणि अभिमानाने भरलेला दिसतो, असे त्यांनी सांगितले. हे केवळ भावुक विधान नव्हते, तर भारताचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि तरुणांच्या डोळ्यांत चमकणाऱ्या आत्मविश्वासाचे ते प्रतिबिंब होते.

शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास एका दिवसात पूर्ण झालेला नाही. १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये जन्मलेल्या शुक्ला यांनी २००६ मध्ये भारतीय वायुसेनेत फायटर पायलट म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. मिग, सुखोई, जग्वार, हॉक आणि डॉर्नियरसारखी विमाने उडवत त्यांनी २,००० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव गाठीशी बांधला. २०१९ मध्ये इस्रोकडून आलेला तो फोन कॉल त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. त्यानंतर त्यांनी रशियाच्या स्टार सिटी येथील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांमध्ये त्यांचा समावेश करून त्यांना देशासमोर आणले होते. मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर झालेली बढती त्यांच्या असाधारण योगदानावर शिक्कामोर्तब करणारी होती. Ax-4 मोहिमेत वैमानिकाची भूमिका निभावून, भारतीय वायुसेनेचा एक फायटर पायलट अंतराळातही तितक्याच कौशल्याने काम करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

अंतराळात जाण्यापूर्वी शुभांशु शुक्ला म्हणाले होते की, ते केवळ उपकरणे आणि यंत्रे घेऊन जात नाहीत, तर अब्जावधी भारतीयांच्या आशा आणि स्वप्ने सोबत नेत आहेत. आज त्यांच्या सुरक्षित वापसीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, ती स्वप्ने ते अधिक मोठी करून परतले आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter