दखनी- उर्दू कवितांमध्ये मराठी शब्दांची पखरण करणारा महाकवी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सिराज औरंगाबादी यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख
सिराज औरंगाबादी यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख

 

सिराज औरंगाबादी हा वली दखनीनंतरचा दखनी भाषेतील महत्वाचा कवी आहे. वली दखनीने दखनी काव्यात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा वारसा सिराज औरंगाबादीने तितक्याच नेटाने चालवला. सिराज औरंगाबादीचे मुळ नाव सय्यद सिराजुद्दीन आहे. सआदात हुसैनी या प्रख्यात घराण्यात त्याचा सन १७१२ मध्ये जन्म झाला. त्याने ‘सिराज’ हे तखल्लुस घेऊन कविता लिहील्या आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण औरंगाबादेत झाले. 

वयाच्या सातव्या वर्षापासून तो सुफी बुरहानुद्दीन गरीब यांच्या मजारवर जात असे. आणि तेथेच शायरीची रचना करायला त्याने सुरुवात केली. कालांतराने सय्यद अ. रहमान चिश्ती यांचे त्याने शिष्यत्व घेतले. त्याचे गुरुबंधू अ. रसूल खान यांच्या सांगण्यावरुन सिराजने रेख्ता भाषेत शायरी करायला सुरुवात केली. काही दिवसांनी अ. रसूल खान यांनी सिराजच्या शायरीचा एक दिवान प्रकाशित केला. हा दिवान प्रकाशित झाल्यानंतर सिराजच्या नावाची दखनेत चर्चा व्हायला लागली. 

थोड्याच दिवसात दखनी साहित्यात सिराज औरंगाबादी हे नाव कुली कुतूबशाह, इब्राहीम आदिलशाह. वली दखनी, नुसरती यांच्यासोबत घेतले जाउ लागले. सिराजच्या नावावर रेख्ता आणि फारसी भाषेतील दोन दिवान आणि ‘बोस्तान खयाल’ ही मसनवी वगैरे साहित्य आहे. सिराजच्या अनेक कविता आजही गायल्या जातात. त्यापैकी खालील कविता महत्वाची आहे.

‘बात कर दिल सती हिजाब निकाल 
गूंचा ए लब सती गुलाब निकाल
शब ए हिज्रां कीं तैरगी कर दुर 
हुस्न ताबां का आफताब निकाल
बैत ए अब्रू का दर्स मुझ कूं 
फर्द ए दिवान ए इंतेखाब निकाल’
 
गोवळकोंड्याचा दखनीचा महाकवी मुल्ला गवासी हा सिराज औरंगाबादीचा पुर्वसुरी होता. मुल्ला गवासी याने सुलतान  अब्दुल्लाह कुतुबशाहच्या दरबारी चुका, प्रशासकीय सुधारणा यांची दखल काव्यातून घेतली होती.  मुल्ला गवासी यांनी दखनी भाषेत केलेल्या अशा अनेक प्रयोगांना सिराज यांनी  चालना दिली. सिराज औरंगाबादी यांच्या काव्यात वर्तमान समाजाचे प्रतिबिंब उमटते. दखनी भाषेत शायरी करताना सिराज यांनी  प्रेमकवितांपासून, सुफीगीतांपर्यंत अनेक काव्यप्रकार हाताळले. त्याच्या कवितांमध्ये विद्रोहासोबतच समर्पणभावना आहे. ‘‘बात करत सती हिजाब निकाल’’ म्हणणारा सिराज औरंगाबादी सखीवरील आपल्या प्रेमाची  प्रत्यवाही साक्ष देताना स्वतःला आपल्या अस्तित्वासह कुर्बान करायला तयार होतो.  
 
‘‘ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्क़ सुन न जुनूँ रहा न परी रही 
न तो तू रहा न तो मैं रहा जो रही सो बे-ख़बरी रही 
शह-ए-बे-ख़ुदी ने अता किया मुझे अब लिबास-ए-बरहनगी 
न ख़िरद की बख़िया-गरी रही न जुनूँ की पर्दा-दरी रही 
चली सम्त-ए-ग़ैब सीं क्या हवा कि चमन ज़ुहूर का जल गया 
मगर एक शाख़-ए-निहाल-ए-ग़म जिसे दिल कहो सो हरी रही’’
 
सिराज औरंगबादी अमीर खुसरोंप्रमाणे प्रेमकाव्याच्या अनेक प्रकारात लिखाण करतो. जिवन जगताना मिळालेलील बंधनं प्रेमाची अभिव्यक्ती करताना तो उधळून लावतो. खुसरो ज्यापध्दतीने ‘‘काफिरे इश्कम मन मुसलमानी मन दरकार निस्त म्हणतो, त्याचपध्दतीने सिराज औरंगाबादी सनम ला ‘अस्ल हस्ती ए नाबूद’ म्हणून श्रध्देच्या प्रस्थापित  धारणांना छेद देण्याचा प्रयत्न करतो. 
 
‘‘सनम हज़ार हुआ तो वही सनम का सनम 
कि अस्ल हस्ती-ए-नाबूद है अदम का अदम 
इसी जहान में गोया मुझे बहिश्त मिली
अगर रखोगे मिरे पर यही करम का करम’’ 
 
सिराज औरंगाबादीने लिहीलेल्या वेगवेगळ्या दिवान आणि रचनांमध्ये हीच पध्दत आढळते. त्याने दखनी समाजाचा प्रतिनिधी म्हणून लिखाण करताना उत्तरेच्या प्रभावाला नाकारले. दखनी कवितांमध्ये समकालीन सुफी, भक्ती चळवळीतील अनेक धुरीणांची त्याने दखल घेतली. कधी समकालीनांच्या संकल्पनांना उत्तर दिले तर कधी त्या संकल्पनांचा विस्तारदेखील केला. वजही, सिराजी, मुल्ला गवासी, कुली कुतुबशाह, इब्राहीम आदिलशाह, नुसरतीप्रमाणेच दखनी साहित्याचा इतिहास  सिराज औरंगाबादीची दखल घेतल्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. त्याच्या काव्यातून दखनी साहित्याचा इतिहास आणि त्याचा प्रवास उलगडण्यास मदत होते. सन १७६४ मध्ये सिराजचे निधन झाले. अवघे ५२ वर्षांचे आयुष्य जगलेल्या सिराजने कित्येक शतके दखनी  साहित्याला आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याची प्रतिभा, शब्दसामर्थ्य ऐतिहासिक असे होते. फारसीसोबत, तुर्की, मराठी, कानडी  भाषेतील अनेक शब्द दखनीत वापरुन या भाषेला आधिकाधीक रुंदावत नेण्याचे श्रेय त्याला जाते. 

- सरफराज अहमद 
(लेखक मध्ययुगीन दखनेच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

 

फरीद आयाज आणि अबू मुहम्मद यांच्या आवाजात ऐका सिराज औरंगाबादी यांची गझल 'ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्क़ सुन'