चेन्नईच्या सुफीदार मंदिराची रमजान इफ्तारची परंपरा

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 27 d ago
चेन्नईच्या सुफीदार मंदिराकडून आयोजित रमजान इफ्तार
चेन्नईच्या सुफीदार मंदिराकडून आयोजित रमजान इफ्तार

 

१२ फेब्रुवारी पासून रमजानचा पवित्र महिना सुरू झालाय. या काळात, हिंदूंनी मुस्लिमांसाठी आयोजित केलेल्या इफ्तारची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. असेच एक उदाहरण तामिळनाडू राज्यातून समोर आले आहे. धार्मिक सौहार्दाचे मर्म अत्यंत संवेदनशील जपणारे चेन्नईतील सुफिदार या मंदिराचे हे कार्य. हे मंदिर थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ४० वर्षांपासून धार्मिक सौहार्द जपण्याचे काम करत आहे. जाणून घेऊया त्यांच्या विषयी.

तामिळनाडू राज्यातील मायलापोर या ठिकाणी एका हिंदू व्यक्तीने हे मंदिर स्थापन केले. सिंधमधील सुफी संत शेहनशाह बाबा नेभराज यांच्या शिकवणींचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने हे मंदिर उभारले गेले. हे मंदिर धार्मिक सौहार्द्याचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे.

या मंदिराची खासियत म्हणजे मंदिराच्या भिंती विविध सुफी संत, हिंदू संत, येशू ख्रिस्त, मदर मेरी, गुरू नानक, शीख गुरू, राधास्वामी आणि चिदाकाशी पंथाचे नेते आणि साई बाबा यांच्या चित्रांनी सजलेल्या आहेत. यातून या मंदिराच्या धार्मिक ऐक्य प्रतीची भावना दिसून येते. एवढेच नाही तर त्यादृष्टीने कार्यही करते. या मंदिराची उभारणी करणारे दादा रतनचंद यांनी ४० वर्षापूर्वी रमजानमध्ये मुस्लीम बांधवांसाठी इफ्तरी सुरु केली. आज दादाचंद हयात नाहीत मात्र त्यांची परंपरा सुफीदार मंदिराने अखंडपणे सुरू ठेवली आहे.

दादा रतनचंद हे मुळचे पाकिस्तानातील सिंध या प्रांतातील आहेत. परंतु १९४७ च्या फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले. सुरुवातीला ते चेन्नई येथे आश्रित म्हणून राहिले. गोडाऊन रोडवरील एका दुकानात कामाला लागले आणि पुढे इथेच स्थायिक झाले. लहानपणापासून अध्यात्माची आवड असणाऱ्या रतनचंदानी सिंध मधील सुफी संतांच्या नावे एक मंदिर उभारले. 

पुढे रमजानमध्ये मुस्लीम बांधवांसाठी इफ्तारी करण्याचा सिलसिला सुरु झाला.  यामागे एक रंजक कहाणी आहे. एकेवेळी सुफिदार मंदिराने इफ्तारीची व्यवस्था केली होती. हे पाहून अर्कोट कुटुंबांतील काही सदस्यांनी दादा रतनचंद यांच्या मंदिराला भेट दिली. तिथे गेल्यानंतर त्यांनी मंदिराच्या स्वयंपाक घराची पाहणी केली. त्यावेळी दादा रतनचंद यांच्या मंदिरातील स्वच्छता आणि नीटनेटकापणा पाहून अर्कोट कुटुंबियांनी रमजानमधील इफ्तारचे जेवण बनवण्याचे काम यांच्या मंदिराकडे सोपवले. त्या दिवसांपासून आजपर्यंत वल्लाजह मस्जीद आणि सुफिदार संस्था यांच्यातील स्नेहपूर्ण संबंध टिकून आहेत. 
 

 
वल्लाजह मस्जीदिला ही एक इतिहास आहे. १७९५ मध्ये अर्कोटच्या नवाबांनी ही मस्जिद बांधली आहे. विशेष म्हणजे या मस्जिदीत बहुतेक कर्मचारी वर्ग हा हिंदू आहे. ही मस्जिद सुद्धा हिंदू- मुस्लीम धर्माच्या एकीचे प्रतिक आहे. 

वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत दादा रतनचंद स्वतः हे काम पाहत होते.  त्यांच्यानंतर रामदेव या गृहस्थाने संस्थेतील काही स्वयंसेवकांच्या मदतीने ही परंपरा टिकवून ठेवली. आज ४ दशकानंतरही इफ्तारचे आयोजन केले जाते. सायंकाळी ५.३० पर्यंत काहीही करून वल्लाजह मस्जीदित खाद्यपदार्थ पोहचलेच पाहिजे यासाठी रामदेव आग्रही असतात. यासाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून ते कामाला लागतात. मायलापोर येथील राधाकृष्णरोड वर असणाऱ्या या मंदिरात दररोज जवळपास १२०० लोकांना पुरेल एवढ्या अन्न बनवले जाते. यांत फ्राइड राइस, बिर्याणी, विविध भाज्यांचे लोणचे, केसर दुध, फळे असे नानविध प्रकार असतात.
 

नानविध खाद्यपदार्थ 
त्यांनतर हे सर्व एका मालवाहू गाडीतून त्या मस्जिदी पर्यंत आणले जाते. प्लास्टिकच्या ताटात ते वाढले जाते. त्यासाठी जवळपास ६०-७० सेवेकरी तैनात असतात. हे सेवेकरी मुस्लीम बांधव घालतात तशी टोपी घालून मगच जेवण वाढतात. यातून इस्लाम धर्माप्रती संवेदनशीलता आणि आदराची भावना वाढीस लागते.  

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रामदेव या सेवेकऱ्याने सेवेप्रती असणारी आपली निष्ठा बोलून दाखवली. ते म्हणाले, "ऑटोमोबाईलचे दुकान असल्याने मला इकडे जास्त वेळ देता येत नसे. त्यामुळे मी त्या दुकानाच्या व्यापापासून बाहेर पडलो आणि पूर्ण वेळ सेवेत द्यायचा ठरवला. महाराष्ट्र, राजस्थान यांसारख्या राज्यातूनही लोक येथे येऊन सेवा करतात."

या ४० वर्षाच्या अखंड परंपरेबद्दल अर्कोटचे प्रिन्स नवाब अब्दुल अली ‘द हिंदू’शी बोलताना म्हणाले, “हा खरा  जातीय सलोखा आहे. तीन दशकांहून अधिक काळ लोटला तरीही सुफिदार मंदिरातील हे सेवेक रमजान दरम्यान दररोज इफ्तारची व्यवस्था करतात, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. एवढेच नव्हे तर ते हे कार्य करत असताना इस्लामप्रति निष्ठा बाळगून, अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात.”

यासोबतच ते म्हणाले की, “भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. आपण सर्व एकाच देवाची लेकरं आहोत त्यामुळे एकमेकांसोबत भावा-बहिणीसारखे वागले पाहिजे. आपण एक आहोत हे जगाला दाखवून दिले पाहिजे.”

याचवेळी इलियाज या मुस्लीम व्यक्तीने द हिंदू या वृत्त पत्रासोबत बोलताना येथील खाद्यपदार्थाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “मी अनेक वर्षांपासून इथे जेवण करतो. इथले जेवण खरोखर खूप स्वादिष्ट असते. शिवाय हे अन्न रात्रभर ठेवले तरी ते खराब होत नाही.” 
 
तसेच इफ्तार करणारी ५० वर्षांची जमिला सांगतात, “मी येथे मशिदीजवळ काम करते. इथून माझं घर दूर आहे. त्यामुळे कामानंतर रोज इथेच इफ्तार करून मगच घरी जाते.”
 
दादा रतनचंद यांनी सुरू केलेल्या धार्मिक सौहार्द वाढवणाऱ्या एका उपक्रमाला सुफिदार मंदिराच्या माध्यमातून चळवळीचे स्वरूप आले आहे. या उपक्रमाने आणि यात सहभागी झालेल्या दोन्ही धर्मातील हजारो नागरिकांनी धार्मिक सदभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण देशासमोर ठेवले आहे. दादा रतनचंद आणि सुफिदार मंदिराचे काम पाहता माणुसकी, जिव्हाळा आणि बंधुता यांसारख्या शब्दांची खऱ्या अर्थाने ओळख पटते.  त्यांच्या या कार्याला आवाज मराठीचा सलाम!
 
- पूजा नायक 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter