पंचवीस वर्षांपासून रमजानमध्ये उपवास करणारे सुरेश गंभिरे

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
सुरेश गंभिरे
सुरेश गंभिरे

 

भारतात अनेक धर्मांचे लोक पिढ्यान्‌पिढ्या एकत्र राहात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी स्वहितासाठी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. असे असताना जातीपातीच्याच नव्हे तर धर्माच्या भिंती तोडून अकलूजमधील एका हिंदू बांधवाने गत पंचवीस वर्षांपासून अखंडपणे रमजान महिन्याचे रोजे धरून समाजासमोर सर्वधर्मसमभावाचा आदर्श निर्माण केला आहे.

अकलूज येथील सुरेश शिवाजी गंभिरे हे वयाच्या २८व्या वर्षापासून मुस्लिम समाजाचे रमजानचे संपूर्ण महिन्याचे रोजे करतात. गेली २५ वर्षे त्यांचे हे कार्य अखंडपणे चालू आहे. सुरेश हे अनेक वर्षांपासून अकलूजमधील रामायण चौकात राहतात. त्यांच्या शेजारी हिंदूंबरोबरच अनेक मुस्लिम कुटुंबंही राहात आहेत.

शेजारी राहणाऱ्या या मुस्लिम कुटुंबांशी पिढ्यान्‌पिढ्या संबंध असल्याने त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. सुरेश गंभिरे यांच्या वडिलांचे त्यांच्या समवयस्क मुस्लिम बांधवांशी मैत्रीचे संबंध होते. ते सर्वजण एकमेकांच्या धर्माचा आदर करून त्यांच्या सर्व सण- उत्सवात सहभागी होत होते. यामुळे सुरेश गंभिरे यांना लहानपणापासूनच मुस्लिम समाजाचे रीतिरिवाज, सण- उत्सवाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते.

हल्लीच्या युगात अनेक तरुण स्वधर्माचे आचरण करण्यास टाळाटाळ करत असतात; मात्र सुरेश गंभिरे यांनी मुस्लिम समाजाचे रोजे करून रोजाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. त्यांचे हे कार्य स्वतःच्या हितासाठी परधर्मावर टीका- टिप्पणी करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन टाकण्यासारखे आहे. जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या आपल्या देशाला आज अशाच युवकांची गरज असून, अशा युवकांमुळे समाजातील जातीय विषमतेची दरी दूर होण्यास मदत होणार आहे.

सहेरीला फक्त एक खजूर अन्‌ दोन चमचे दही
मुस्लिम धर्मात रमजानचे रोजे केले जातात; परंतु त्यासाठी पहाटे उठून सहेरी करणे म्हणजेच अल्पोपाहार घेणे अनिवार्य असते. मात्र सुरेश गंभिरे हे सहेरीला फक्त एक खजूर आणि दोन चमचे दही घेऊन रोजाला प्रारंभ करतात. विशेष म्हणजे आज अशा रखरखत्या उन्हात केवळ एक खजूर आणि दोन चमचे दहीवर दिवसभर रोजा (उपवास) करणे म्हणजे जिकिरीचे आणि आव्हानात्मक आहे.

रोजे का करावेसे वाटले यांवर सुरेश गंभिरे यांनी सांगितले की, लहानपणापासून मुस्लिम समाजातील बांधवांबरोबर घनिष्ठ संबंधांमुळे त्यांच्या सणांबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे रोजा करण्याचे मी ठरविले. त्यास आई मालन, पत्नी ऊर्मिला व दोन्ही मुलांनी वेळोवेळी प्रोत्साहनच दिले.

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter