तब्बल २५० ॲप बनविणारे ‘ॲपगुरू’

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
सुरेंद्र तेतरवाल आणि सुरेश ओला
सुरेंद्र तेतरवाल आणि सुरेश ओला

 

जयपूर : राजस्थानातील दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ वर्षांत एक-दोन नव्हे तर तब्बल २५० मोबाईल ॲप विकसित केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हिंदीमध्ये विनामूल्य अभ्याससाहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने त्यांनी हे ॲप्स विकसित केले. सुरेंद्र तेतरवाल आणि सुरेश ओला अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या या डिजिटल कामगिरीमुळे त्यांना ‘ॲप गुरू’ म्हणूनही ओळखले जाते.

 

विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये ऑनलाइन अभ्याससाहित्य उपलब्ध होणे अवघड जात असल्याने या दोघांनीही २०१५ मध्ये एकत्र काम करण्यास सुरुवात केली. हे दोघेही राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील असून दोघांनीही कॉम्प्युटर सायन्समधील पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. तेतरवाल हे विक्रीकर अधिकारी तर ओला हे शिक्षण खात्यात आहेत.

 

सुरेश ओला म्हणले, की आम्ही सरकारी नोकरीव्यतिरिक्तच्या वेळेतून हे ॲप्स विकसित केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हिंदीतून अभ्यास साहित्य उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर, आम्ही सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी ब्लॉगवरून साहित्य अपलोड केले.

 

त्यानंतर, २०१५ मध्ये विषयानुसार मोबाईल ॲप्स विकसित करण्यास सुरुवात केली. या ॲप्समध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसह पदवीचे शिक्षण घेणाऱ्या तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्याससाहित्याचाही समावेश आहे. आम्ही ही ॲप्स अधिक विकसित करून विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे १०० मोबाईल ॲप्स राज्य सरकारला दिली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ व्हावे म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना केंद्र व राज्य सरकारने विविध पुरस्काराने गौरविले आहे. या पुरस्कारांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्काराचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, राजस्थान सरकारला राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी हे विकसित केलेले मोबाईल ॲप दिल्याबद्दल त्यांना ‘राजस्थान भामाशाह शिक्षा विभूषण सन्मान’ही देण्यात आला. तसेच राजस्थान ई-गव्हर्नन्स पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले.

 

शिक्षकांसाठी ॲपनिर्मितीचा प्लॅटफॉर्म

शिक्षणात माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचे (आयसीटी) महत्त्व लक्षात घेऊन तेतरवाल व ओला यांनी ही ॲप्स विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. त्याचप्रमाणे, शिक्षकांसाठीही ॲप बनविण्याचा प्लॅटफॉर्म विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. http://theappstation.com"theappstation.com या लिंकवरून शिक्षकांना तंत्रज्ञानाचे ज्ञान नसतानाही ॲप बनविण्याचे प्रशिक्षण घेता येईल. आतापर्यंत हजारो शिक्षकांनी स्वत:च्या मोबाईल ॲपची निर्मिती करून शिक्षणाच्या डिजिटायझेशनमध्ये हातभार लावला आहे, असेही सुरेश ओला म्हणाले.

 

याशिवाय सुरेंद्र तेतरवाल यांनी या ॲप्स बद्दल माहिती दिली. आमची मोबाईल ॲप्स लाखो विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केली आहेत. विशेषत: कोरोना साथीच्या काळात या ॲप्समुळे विद्यार्थ्यांचा खूपच फायदा झाला. गुगल प्ले स्टोअरवर ही ॲप्स विनामूल्य उपलब्ध आहेत.