जागतिक मेमन दिन : मातीशी एकनिष्ठ राहून समाजसेवेचे व्रत जपणारा समाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
प्रसिद्ध मेमन नेते एडव्होकेट यूसुफ अब्राहानी
प्रसिद्ध मेमन नेते एडव्होकेट यूसुफ अब्राहानी

 

मन्सुरुद्दीन फरीदी

गुजरात आणि सिंध प्रांतातून आलेला मुस्लीम समाजातील एक अत्यंत कर्तृत्ववान आणि व्यापारी समुदाय म्हणजे मेमन समाज. आज जगाच्या कानाकोपऱ्यात मेमन बिरादरीचे लोक विखुरलेले आहेत. त्यांची एकूण लोकसंख्या साधारण ४० लाखांच्या आसपास आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की, मेमन लोक जिथे कुठे राहतात, तिथे ते अत्यंत सुखी आणि समाधानी आहेत. ते आपल्या देशाशी एकनिष्ठ आहेत आणि प्रगतीसोबतच समाजसेवेच्या कामात नेहमीच आघाडीवर असतात. हीच मेमन बिरादरीची खरी ओळख आहे.

'जागतिक मेमन दिना'निमित्त प्रसिद्ध मेमन नेते एडव्होकेट यूसुफ अब्राहानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मेमन ही एक प्राचीन जमात आहे. लोकसंख्येने ही जमात लहान असली, तर तिला खूप मोठा इतिहास लाभला आहे. भारत आणि पाकिस्तानातून बाहेर पडून आज जगभर पसरलेल्या या बिरादरीचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. आपल्या शांतताप्रिय स्वभावामुळे हा समाज केवळ समृद्धच नाही, तर सेवाभावी म्हणूनही ओळखला जातो.

यूसुफ अब्राहानी हे मेमन समाजातील एक मोठे नाव आहे. ते माजी आमदार असून मुंबईतील 'इस्लाम जिमखाना'चे अध्यक्षही आहेत. मुंबईचे राजकारण, व्यापार आणि समाजसेवा अशा सर्वच क्षेत्रांत ते सक्रिय असतात.

मन्सुरुद्दीन फरीदी यांच्याशी संवाद साधताना यूसुफ अब्राहानी म्हणाले, "मेमन समाज जगभर पसरलेला असला तरी त्यांची मुळे गुजरातशी जोडलेली आहेत. तिथूनच बाहेर पडून हे लोक जगभरात स्थायिक झाले."

उदार आणि सेवाभावी समाज

अब्राहानी पुढे म्हणाले, "हा समाज मनाचा खूप मोठा आणि दिलदार आहे. देवाने त्यांना भरभरून दिले आहे. मी नेहमी तीन गोष्टी सांगतो- देवाने मेमन समाजाला संपत्ती दिली आहे, मोठे हृदय दिले आहे आणि सौंदर्यही दिले आहे. मेमन माणूस जिथे कुठे वस्ती करतो, तिथे तो सर्वात आधी मदरसा, मशीद, जमातखाना आणि दवाखाना सुरू करतो. ही त्यांची जुनी परंपरा आहे. जिथे जिथे मेमन लोक गेले तिथे त्यांनी शिक्षण, धर्म आणि मदतीची एक उत्तम व्यवस्था उभी केली. मी माझ्या साठ वर्षांच्या आयुष्यात पाहिले आहे की, या समाजाने मुंबईत असंख्य संस्था उभारल्या आहेत. यात मोठी रुग्णालये, मशिदी आणि दवाखान्यांचा समावेश आहे."

जागतिक मेमन दिनाचा उत्साह

१० एप्रिल हा दिवस जगभरात 'मेमन दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विशेष करून दानधर्माची कामे केली जातात. लोक रुग्णालयांना भेटी देतात, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गरीब, विधवा, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाते. धान्य वाटप केले जाते आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. ही परंपरा सुरुवातीपासून चालत आली असून इक्बाल मेमन यांच्या नेतृत्वाखाली या कामांना अधिक गती मिळाली आहे. भारतासोबतच इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्येही या दिवशी विविध कार्यक्रम होतात.

शिक्षण आणि प्रगती

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मेमन बिरादरी संख्येने कमी असली तरी शिक्षण आणि प्रगतीत खूप पुढे आहे. जगभरात त्यांची लोकसंख्या सुमारे ४० लाख असून त्यातील मोठी संख्या भारतात राहते. हा मुळात एक व्यापारी समाज आहे. प्रामाणिकपणा हीच त्यांची ओळख आहे. लहानपणापासूनच मुलांच्या जडणघडणीवर विशेष लक्ष दिले जाते. त्यांना धर्माची आणि नैतिकतेची शिकवण दिली जाते.

जमातखान्यांचे जाळे

यूसुफ अब्राहानी सांगतात, "भारतात साधारण पाचशे मेमन जमातखाने आहेत. प्रत्येक जमात आपापल्या भागात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करते. याशिवाय 'वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन' ही संस्था जागतिक पातळीवर सक्रिय आहे. यात विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. जर एखाद्या गरजूला मदतीची गरज असेल, तर तो आपल्या स्थानिक जमातखान्याशी संपर्क साधतो. तिथे योग्य चौकशी केल्यानंतर त्याला मदत केली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल त्यांना बक्षिसे दिली जातात आणि शिक्षकांनाही प्रोत्साहित केले जाते."

व्यापाराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मेमन समाज सुरुवातीपासूनच कापड, लाकूड आणि लोखंडाच्या व्यवसायात सक्रिय आहे. अनेक कंपन्या १०० ते १५० वर्षे जुन्या आहेत. मुंबईतील साबू सिद्दीक मुसाफिरखाना, साबू सिद्दीक हॉस्पिटल आणि अंजुमन इस्लाम कॉलेज यांसारख्या संस्थांच्या उभारणीत मेमन समाजाचे मोठे योगदान राहिले आहे.

राजकारण आणि विचारसरणी

राजकीय मैदानातही मेमन बिरादरीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाने या समाजातून अनेक महापौर, आमदार, खासदार आणि नगरसेवक पाहिले आहेत. मुळात मेमन लोक नेहमीच आपल्या देशाशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि भविष्यातही अशीच सेवा करत राहतील. शेवटी त्यांनी सांगितले की, मेमन समाज केवळ आपल्या समाजाचीच नाही, तर इतर गरजूंचीही मदत करतो, कारण हीच आपल्या धर्माची शिकवण आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या काळातही मेमन बिरादरीने पुढे येऊन मोठी आर्थिक मदत केली होती. दुष्काळी भागात बोअरवेल खोदण्यासारखी कामेही केली जातात. ही मदत करताना जात किंवा धर्माचा कोणताही भेदभाव केला जात नाही. मेमन समाज केवळ सेवा करण्यावर विश्वास ठेवतो. याच गुणामुळे हा समाज जिथे कुठे आहे, तिथे तो अत्यंत खंबीर आणि लोकप्रिय आहे.

(संवादक ‘आवाज द व्हॉईस- उर्दू’चे संपादक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter