प्रज्ञा शिंदे,
आपली भारतीय संस्कृती सर्वधर्म समभाव जपणारी आहे. त्यात भारत देश हा नेहमीच हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे प्रतीक राहिला आहे. इथे सर्वधर्मीय लोक एकत्र येत सण - उत्सव साजरे करतात. त्याचबरोबर एकत्र येऊन व्यवसायही करतात. नुकतीच उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून अशीच एक धार्मिक सौहार्दाची घटना समोर आली आहे; जी धार्मिक एकतेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
मथुरेतील एक मुस्लिम कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून बाल गोपाळांच्या मूर्तींना रंग देण्याच आणि पितळ पॉलिश करण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या मेहनतीमुळे आणि कौशल्यामुळे हिंदू धर्माचे सर्व लोक त्यांच्या मूर्तींना नेहमीच प्राधान्य देतात. कोणताही भेदभाव न करता आपल्या मूर्ती त्यांच्याकडूनच रंगवून घेतात.
झाकीर हुसेन हे या कुटुंबातील एक सदस्य आहे. अत्यंत निष्ठेने या मूर्तींना रंग देण्याचे आणि पॉलिश करण्याचे काम ते करतात. बाल गोपाळांच्या मूर्तीबद्दल हुसेन सांगतात, "ही मूर्ती साक्षात भगवान श्रीकृष्णाचे रूप आहे. हिंदू बांधव या मूर्ती रुपात असलेल्या श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा करतात."
हुसेन यांचे कुटुंब ब्रजधाम येथे राहते. ते सांगतात की, गेल्या पन्नास वर्षांपासून मूर्तींना रंग देण्याचे काम करत आहे आणि त्यांच्या मुलांनीही या कामात हातभार लावला आहे. हे काम करताना कोणताही धार्मिक भेदभाव नसून केवळ कलेचा आणि एकमेकांच्या श्रद्धेचा आदर केला जातो. विशेष म्हणजे झाकीर हुसेन हे मूर्ती पॉलिश करण्यासाठी केवळ पाच रुपये घेतात.
‘झाकीर हुसेन यांच्या कुटुंबाच्या कलाकौशल्यामुळे या मूर्ती अधिकच सुंदर बनतात.’ असे मथुरेतील रहिवासी सांगतात. हिंदू- मुस्लीम यांच्यातील हा बंधुभाव आणि आपुलकीचे हे संबंध धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवतात. या दोन समाजातील धार्मिक सौहार्द भारताच्या सांस्कृतिक एकतेला ही बळकट करते.
जरूर वाचा :
मथुरेत जन्माष्टमीनिमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -