जुमाच्या नमाजच्यावेळी काश्मिरी मान्यवरांनी प्रवचनातून दिला शांती आणि एकतेचा संदेश
काश्मीरमधील प्रमुख इस्लामी विद्वानांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. जुमाच्या नमाजच्यावेळी या मान्यवरांनी आपल्या प्रवचनातून शांती आणि एकतेचा संदेश दिला. ग्रँड मुफ्ती नसीरुल इस्लाम, दरगाह दस्तगीर साहिबचे इमाम मुफ्ती सैयद मुदस्सर गिलानी आणि मौलवी सज्जाद यांनी या घटनेला मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा म्हटले आहे.
'हिंसेचा इस्लामशी काडीचाही संबंध नाही. निष्पापांचा जीव घेणे इस्लामच्या शिकवणींविरुद्ध आहे.' असा संदेश या मान्यवरांनी आपल्या प्रवचनातून दिला.
'काश्मीरने नेहमीच पाहुण्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या सुरक्षेला आपले कर्तव्य मानले आहे. पर्यटक आमची शान आहेत. त्यामुळे त्यांचा आदर आणि प्रतिष्ठा आम्ही कधीही कमी होऊ देणार नाही.' अशी ग्वाही या मान्यवरांनी संयुक्त निवेदानातून दिली.
हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि कश्मीरमधील प्रमुख इस्लामी नेते मीरवाइज उमर फारूक यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा कठोर निषेध केला. ते म्हणाले, "या घटनेमुळे आम्ही खूप दुखावलो असून आमच्या मनाला ठेच पोहोचली आहे. त्या दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून, कुटुंबासमोर निर्घृणपणे मारले. आम्ही जम्मू-कश्मीरमधील जनता या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो."
शुक्रवारच्या नमाजनंतर हल्ल्याचा निषेध करताना मीरवाइज म्हणाले, "प्रियजन गमावण्याची वेदना आम्हापेक्षा जास्त कोणाला कळेल? आम्ही किती सहन केले आहे. आज जम्मू-कश्मीरमधील लोक रक्ताचे अश्रू ढाळत आहेत. त्यांचे प्रियजन हिरावले गेलेत. प्रत्येकजण ही वेदना अनुभवतो आहे. आम्ही अल्लाहकडे प्रार्थना करतो की जखमी लवकर बरे व्हावेत आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताकद मिळो. काश्मिरींचा पाहुणचार जगभर प्रसिद्ध आहे. कश्मिरींनी मानवता, आपुलकी आणि करुणेची परंपरा जपली आहे. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला."
पर्यटकांना वाचवताना आदिलचा मृत्यू झाला होता. अनेक काश्मिरी तरुणांनी जखमींना खांद्यावर उचलून मैलभर पायी चालत रुग्णालयात पोहोचवले. काश्मिरी लोकांनी पर्यटकांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडले. या संकटात कश्मिरींनी केलेल्या मदतीसाठी पर्यटक त्यांचे आभार मानत कौतुक करत आहेत.
काश्मीर आणि शुक्रवारची नमाज यांचा विशेष संबंध आहे. कालच्या नमाजनंतर काश्मीरी धर्मगुरूंनी आणि जनतेने दहशतवादाला नाकारत एकमुखाने शांतीचा संदेश देत हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केल्या आहेत.