ईशान्य भारतात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादविरोधी मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशातील कट्टरतावादी संघटनांशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून आसाम आणि त्रिपुरा या दोन राज्यांतून एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधून ९ जणांना तर त्रिपुरातून २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण 'अन्सारुल्ला बांग्ला टीम' (ABT) या संघटनेशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही संघटना 'अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' (AQIS) या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न मानली जाते. अटक करण्यात आलेले संशयित तरुण स्थानिक पातळीवर या संघटनेचे जाळे पसरवण्याचे काम करत होते.
आसाममधील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यातून ९ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच वेळी त्रिपुरा पोलिसांनीही कारवाई करत दोघांना अटक केली. हे सर्वजण गुप्तपणे तरुणांची माथी भडकवणे, संघटनेसाठी निधी गोळा करणे आणि जिहादी साहित्याचा प्रसार करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.
सुरक्षा यंत्रणांना त्यांच्याकडून मोबाईल फोन, सिम कार्ड आणि काही आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. या आरोपींचे नेटवर्क किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन भारतात कट्टरतावादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न हे गट करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अटकसत्रामुळे या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास सुरू असून आणखी काहींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.