भारत ग्लोबल साऊथचे नेतृत्व करणार, अमेरिका-चीनच्या दबावासमोर झुकणार नाही - सरसंघचालक मोहन भागवत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत

 

भारत भविष्यात ग्लोबल साऊथचे नेतृत्व करेल आणि त्यानंतर कोणताही देश किंवा कोणतेही आयात शुल्क (टॅरिफ) आपले नुकसान करू शकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. बुधवारी (१८ फेब्रुवारी, २०२६) लखनौ येथे आयोजित संघाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'ग्लोबल साऊथ' म्हणजे दक्षिण गोलार्धातील विकसनशील किंवा अल्पविकसित मानले जाणारे देश. अमेरिकेसोबतच्या अलीकडील आयात शुल्क वादाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे व्यावसायिकांशी संवाद साधताना भागवत म्हणाले, "भारत ग्लोबल साऊथचे नेतृत्व करेल. एक दिवस असा येईल की आयात शुल्काचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. भारत खंबीरपणे उभा राहील आणि कोणत्याही राष्ट्रासमोर झुकणार नाही. काही काळातच सर्व काही पुन्हा पूर्ववत होईल."

तत्पूर्वी, लखनौ विद्यापीठाच्या मालवीय सभागृहात आयोजित 'शोधार्थी संवाद' कार्यक्रमात भागवत यांनी अमेरिका आणि चीनवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "पाश्चात्य देश कट्टरतावाद पसरवतात. सामर्थ्यवान बनणे, स्वतःसाठी जगणे आणि इतरांना वाऱ्यावर सोडणे, तसेच अडथळा ठरणाऱ्यांना संपवणे ही त्यांची विचारसरणी आहे. आज अमेरिका आणि चीन हेच करत आहेत."

सामाजिक समरसता हाच समाजातील एकतेचा पाया असल्याचे सांगत भागवत यांनी स्पष्ट केले की, संघ सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रासाठी कार्य करतो. "हिंदू धर्म हाच खरा मानव धर्म आहे. जगात जर कोणता खरोखर धर्मनिरपेक्ष समाज असेल, तर तो हिंदू समाज आहे," असे सांगत हिंदूंनी स्वतःची ओळख जात, पंथ किंवा संप्रदायाऐवजी केवळ 'हिंदू' म्हणून करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

त्यांच्या मते, जात आणि भाषेची ओळख श्रेष्ठ नाही; आपण सर्व हिंदू आहोत ही भावना आपण जोपासली पाहिजे. तरुण पिढीमध्ये जातीव्यवस्था हळूहळू कमकुवत होत असून एकदा का जातीचे सामाजिक महत्त्व संपुष्टात आले की, त्याभोवती फिरणारे राजकारणही बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"संघात कोणाचीही जात विचारली जात नाही. सर्व हिंदू बांधव आहेत. समाजातून जात नष्ट करण्यासाठी आपल्याला आधी जात विसरावी लागेल," असे ते म्हणाले. मुलांनी घरीच धार्मिक शिक्षण घेतले पाहिजे आणि भौगोलिक अंतर असूनही कुटुंबे भावनिकदृष्ट्या जोडलेली राहिली पाहिजेत, असे मत भागवत यांनी व्यक्त केले. 

परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि तरुण पिढीला मूल्ये देण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी सर्व कुटुंबाने एकत्र येण्याची सूचना त्यांनी केली. "चांगले कुटुंब चांगल्या समाजाची निर्मिती करते," असे ते म्हणाले.

आधुनिकता ही भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असली तरी संघ आंधळ्या पाश्चात्यीकरणाच्या विरोधात आहे. "संपत्तीचे प्रदर्शन करणे ही आपली परंपरा कधीच नव्हती," असेही त्यांनी नमूद केले. मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात असावीत, असे भागवत म्हणाले. 

"मंदिरांचे नियंत्रण भक्तांकडे असावे, अशी आमची इच्छा आहे. धार्मिक नेते आणि सुजाण लोकांनी एकत्र येऊन ती चालवावीत," असे सांगत विश्व हिंदू परिषद या दिशेने कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिरांचा निधी राष्ट्रहित आणि हिंदूंच्या कल्याणासाठी वापरला जावा, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

संघाचे लक्ष चारित्र्यनिर्मितीवर असून काही मिळवण्यापेक्षा देण्याची संस्कृती संघ रुजवतो. "संघ व्यक्ती निर्माण करण्याचे काम करतो. समर्पित कार्यकर्त्यांमध्ये निराशेला जागा नसते," असे भागवत म्हणाले. त्यांनी दावा केला की, संघाने देशातील ५,००० गावांमध्ये विकास उपक्रम हाती घेतले असून त्यापैकी ३३३ गावांनी लक्षणीय प्रगती केली आहे. 

काही गावांमध्ये रहिवाशांनी १२ वी पर्यंतच्या शाळा स्थापन केल्या आहेत, खटल्याशिवाय वाद सोडवले आहेत, भूमिहीनांना जमीन मिळवून दिली आहे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण केला आहे, ज्यामुळे कृषी आणि आर्थिक प्रगती झाली आहे. भागवत यांनी लोकांना संघ जवळून समजून घेण्यासाठी शाखेत येण्याचे आवाहन केले आणि 'सज्जन शक्ती'ला एकत्र येण्याचे बोलावणे धाडले.