उत्तराखंडमध्ये बोगद्यात थरार! दोन गाड्यांच्या भीषण धडकेत ६० कामगार जखमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
विष्णुगड पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात घडलेली दुर्घटना
विष्णुगड पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात घडलेली दुर्घटना

 

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील विष्णुगड पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात कामगारांची ने-आण करणाऱ्या दोन लोको गाड्यांची (रेल्वेची) समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सुमारे ६० कामगार जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता जास्त असल्याने जखमींची संख्या मोठी आहे.

हा प्रकल्प अलकनंदा नदीवर उभारला जात आहे. प्रकल्पाच्या कामासाठी बोगद्याच्या आत कामगारांना घेऊन जाण्यासाठी आणि बाहेर आणण्यासाठी या विशेष लोको गाड्या वापरल्या जातात. रविवारी दुपारी कामाच्या पाळीत बदल होत असताना ही दुर्दैवी घटना घडली. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या आमनेसामने आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धडक झाल्यानंतर बोगद्यात एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि प्रकल्प अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेगाने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना बोगद्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. काहींना प्राथमिक उपचारानंतर सोडून दिले जाण्याची शक्यता आहे.

टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) इंडिया लिमिटेड या कंपनीकडे या प्रकल्पाचे काम आहे. या घटनेनंतर बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड झाला की मानवी चूक घडली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.