पुण्यात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 14 d ago
पुणे भीमजयंती फेस्टिवल
पुणे भीमजयंती फेस्टिवल

 

डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहराच्या मध्य भागात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत पोवाडे आणि भीमवंदना सादर करण्यात आली. मिरवणुकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अनेक मार्गात बदल करण्यात आला होता.

मिरवणुकांमध्ये प्रबोधनात्मक देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई पुणेकरांना पाहायला मिळाली. सायंकाळी पाचनंतर मिरवणुका मार्गस्थ झाल्या होत्या. त्या वेळी ध्वनिक्षेपकावर भीमगीते लावण्यात आली. मिरवणूक मार्गावर महिला डोक्याला फेटे बांधून सहभागी झाल्या होत्या. हातातील निळे झेंडे फडकावत ते डॉ. आंबेडकर यांचा जयजयकार करीत होत्या. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता.

बाजीराव रस्ता, मालधक्का चौक आणि दांडेकर पूल परिसरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यामुळे या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांच्या वाहनांसाठी आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान, पुणे स्टेशन येथील तुकाराम शिदि वाहनतळ आणि ससून कॉलनी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. 

जीवनकार्याचा आढावा
कैटोन्मेंट: पुणे कॅम्पमधील अरोरा टॉवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार सुनील कांबळे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटोळे, बापूसाहेब गानला, पुणे कँटोन्मेंट बोडर्डाचे अध्यक्ष सचिन मथुरावाला, माजी नगरसेवक अविनाश बागवे, शैलेंद्र बिडकर, मिलिंद अहिरे, अभिनेते अभिजित बिचुकले, नीलेश आल्हाट, गोविंद साठे, विकास भांबुरे, अशोक देशमुख, सचिन कांबळे, महेंद्र कांबळे, जावेदभाई खान, अॅड. भूपेंद्र शेंडगे, अॅड. रफिक शेख, दत्ता जाधव, रोहित कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या कार्यावर आधारित संपूर्ण जीवनपट एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आला. 

जय गणेश व्यासपीठ 
'वाचून करूयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन' या संकल्पनेला अनुसरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नू. म. वि. प्रशाला आणि जय गणेश व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, नू, म. वि. शाळा समिती अध्यक्ष पराग ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, कार्यक्रमाचे संयोजक पियुष शहा, प्रभारी मुख्याध्यापिका स्मिता कांगुणे, उपप्राचार्य राजेश्री हेंद्रे व्यासपीठावर होते. 

भीम जयंती महोत्सव समिती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आदर्श भीमजयंती स्पर्धे'त २०० पेक्षा अधिक मंडळांनी सहभाग नोंदवला. परीक्षणासाठी गेलेल्या प्रतिनिधींनी या सर्व मंडळांना भेटी दिल्या असून, त्यांनी तयार केलेले देखावे, सजावट, प्रबोधनपर कार्यक्रम, लोकोपयोगी उपक्रम, तसेच सध्या सुरू असलेल्या मिरवणुका यांबाबतचे नोंदी घेऊन त्यांचा अहवाल तयार केला आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करून संबंधितांना बक्षीस वाटपदेखील केले जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.