अल्फिया शेख, पुणे
इस्लाममध्ये बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा या सणाला विशेष महत्व आहे. त्यागाचे मूल्य जनमानसात रुजवणे, वर्षातून एकदा तरी सर्वांनी एकत्र येऊन बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणे आणि समाजातील वंचितांना, दुर्बलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणे, असे बकरी ईदचे त्रिवेणी महत्त्व आहे. पैगंबर इब्राहिम यांच्या त्याग आणि विश्वासाचे स्मरण म्हणजे बकरी ईद. या दिवशी धर्मानुसार वैध जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.
धार्मिक नियमांनुसार, या कुर्बानीच्या मांसाचे प्रामुख्याने तीन समान भाग केले जातात. यातला पहिला भाग आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी राखला जातो. दुसरा भाग जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना दिला जातो, तर तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग हा गरीब, अनाथ, गरजू आणि वंचित समाज बांधवांमध्ये वाटप केला जातो. या वाटपाच्या मागे समाजात समता, बंधुभाव आणि आपुलकी वाढीस लागावी, हाच मुख्य उदात्त हेतू असतो.
आजच्या धावपळीच्या या आधुनिक युगात, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट्स किंवा सोसायट्यांमध्ये राहताना ही धार्मिक प्रथा पूर्वीसारखी साजरी करणे फार अवघड बनले आहे. जागेची तीव्र टंचाई, इमारतींमधील स्वच्छतेचे कडक नियम, दुर्गंधी पसरण्याची भीती आणि सणापूर्वी प्राण्यांची देखभाल करणे अशा कित्येक समस्या आज प्रत्येकासमोर उभ्या ठाकल्या आहेत.
याहून मोठी अडचण म्हणजे शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात किंवा थेट परदेशात स्थायिक झालेला तरुण नोकरदार वर्ग. ईदच्या या मुख्य सणाला प्रत्येकालाच गावी किंवा घरी येणे जमत नाही. मनात तीव्र इच्छा असूनही वेळेअभावी आणि सुविधेअभावी या अनेकांना आपली कुर्बानीची इबादत पूर्ण करता येत नाही. नेमक्या याच सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एक भन्नाट संकल्पना पुढे आली आहे, तिचे नाव आहे 'कुर्बानी ईझ' (Qurbani Ease)!
घरबसल्या होणार 'हॅसल-फ्री' इबादत
'आवाज-द-व्हॉईस मराठी'ने या अभिनव उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक मोहम्मद सैफ यांच्याशी विशेष संवाद साधला. आपल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना मोहम्मद सैफ यांनी आजच्या पिढीची गरज आणि त्यावरील उपाय मांडले. शहरी भागातील अडचणींबद्दल बोलताना मोहम्मद सैफ म्हणतात, "आज काल शहरातल्या फ्लॅट संस्कृतीमुळे कुर्बानी देणं म्हणजे मोठं जिकिरीचं काम बनलंय. कुठं जागा नाही, तर कुठं स्वच्छतेचा प्रश्न. त्यात आपली तरुणाई शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा थेट सातासमुद्रापार परदेशात बसली आहेत. ईदला त्यांना घरी येणं जमतच असं नाही. मग अशा वेळी त्यांची इबादत राहून जाते. याच गोष्टीचा विचार करून आम्ही 'कुर्बानी ईझ' सुरू केलं."
ते पुढे म्हणतात की, "या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची हीच मोठी डोकेदुखी दूर करणं आणि त्यांना एकदम विनासायास म्हणजेच 'हॅसल-फ्री' सुविधा देणं हाच आमचा खरा उद्देश आहे. आम्ही अल्लाच्या दरबारातील सर्व धार्मिक नियमांचं अगदी चोख पालन करतो. पूर्ण स्वच्छता राखून ही सगळी प्रक्रिया पार पाडली जाते."
मोहम्मद सैफ यांच्या या उपक्रमामुळे आता मुंबई, पुणे किंवा जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात बसलेला व्यक्ती केवळ एका क्लिकवर आपली मन्नत पूर्ण करू शकतो. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कार्य करणारे स्वयंसेवक हे सर्वधर्मीय आहेत.
थेट गरजूंच्या घरापर्यंत वाटप
'कुर्बानी ईझ' ही संकल्पना प्रत्यक्षात कशी काम करते आणि लोकांपर्यंत याचे लाभ कसे पोहोचतात, यावरही सैफ यांनी भाष्य केले. या उपक्रमांतर्गत गरजूंसाठी एक विशेष आणि पारदर्शक पॅकेज तयार करण्यात आले आहे. यामुळे प्राण्यांच्या खरेदीपासून ते थेट मांस वितरणापर्यंत सर्व गोष्टी अत्यंत सुलभ होतात.
या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देताना मोहम्मद सैफ पुढे म्हणतात, "आमचा हा कारभार एकदम सोपा आणि पारदर्शक आहे. आम्ही थेट ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकडे जातो आणि तिथून एकदम धष्टपुष्ट, निरोगी आणि चांगल्या दर्जाचे बकरे खरेदी करतो. ज्या बांधवांना काही कारणास्तव स्वतः कुर्बानी करणं शक्य नसेल, त्यांच्या नावावरून आम्ही सर्व धार्मिक विधी पूर्ण करून ही कुर्बानी देतो. त्यानंतर त्या मांसाची एकदम शास्त्रोक्त आणि हायजिनिक पद्धतीने पॅकिंग केली जाते. हे पॅक केलेलं मांस आम्ही थेट तुमच्या घरपोच पाठवतो."
ते पुढे म्हणतात की, "इतकंच नाही, तर तुमच्या इच्छेनुसार अनाथालयांमध्ये, गरीब वस्त्यांमध्ये आणि गरजू लोकांमध्ये त्याचं रीतसर वाटप करतो. तुम्ही जगात कुठंही असा, फक्त एक फोन किंवा ऑनलाईन बुकिंग करून या कार्यात सामील होऊ शकता. यामुळे तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात आणि तुमची इबादतही अगदी वेळेवर पूर्ण होते."
सामाजिक बांधिलकीचा नवा चेहरा
कुर्बानीच्या तिसऱ्या भागाचे महत्त्व लक्षात घेऊन, जे कुटुंब परदेशात आहेत त्यांचे मांस थेट भारतातील झोपडपट्ट्या आणि अनाथ आश्रमांपर्यंत पोहोचवले जाते. याचा लाभ सर्वधर्मीयांना मिळतो. यामुळे सणाचा आनंद खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो. गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी ही डिजिटल पद्धत आताच्या काळाची गरज बनली आहे.
परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना तर या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका, लंडन किंवा आखाती देशात राहूनही आपल्या मायभूमीतल्या गरजू बांधवांना ईदच्या सणाचे अन्न पोहोचवणे आता शक्य झाले आहे.
तंत्रज्ञान आणि धर्माची योग्य सांगड घातली तर जुन्या परंपरांचे पावित्र्य राखत आधुनिक समस्यांवर किती सुंदर उत्तर शोधता येते, याचे 'कुर्बानी ईझ' हे एक उत्तम उदाहरण आहे. यंदाच्या बकरी ईदला ही नवी डिजिटल पद्धत अनेकांच्या घरातील सणाचा आनंद द्विगुणित करेल, यात शंका नाही.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter