वर्षपूर्ती 'आवाज द व्हॉईस - मराठी'ची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
आवाज द व्हॉईस - मराठीवर प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचे कोलाज
आवाज द व्हॉईस - मराठीवर प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचे कोलाज

 

नमस्कार आदाब, 

'आवाज द व्हॉईस' ही बहुभाषिक वेबसाईट २३ जानेवारी २०२३ पासून मराठीतही सुरू झाली. या उपक्रमाला वर्ष पूर्ण होत असून 'आवाज - द व्हॉइस मराठी' आज दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या वर्षभरात 'आवाज'वर २६०० हून अधिक बातम्या आणि लेख प्रसिद्ध झाले. धार्मिक सौहार्द जपणाऱ्या आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणाऱ्या घटनांना, उपक्रमांना आणि व्यक्तींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा 'आवाज मराठी'चा प्रयत्न राहिला.

मुस्लीम समुदाय हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरा सर्वांत मोठा धार्मिक समुदाय आहे. या मुस्लीम समाजातील सकारात्मक घडामोडी,  प्रेरणादायी यशोगाथा यांना 'आवाज'वर विशेष स्थान देण्यात आले. त्यापैकी मुस्लीम महिला उद्योजिका, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील मुस्लीमांचे योगदान, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भूमिका बजावणारे मुस्लीम तरुण, मुस्लीम खाद्यसंस्कृती, मुस्लीमबहुल खेडेगावांमधील धार्मिक सौहार्द या विषयांवरील 'आवाज'च्या स्टोरीज विशेष लोकप्रिय ठरल्या. 

गेल्या वर्षभरात घडलेल्या धार्मिक सलोख्याच्या घटनांना 'आवाज'ने विशेष प्रसिद्धी दिली. महाराष्ट्राच्या खेडोपाडी दिसणाऱ्या धार्मिक सहजीवनाचे प्रतिबिंबच त्यामधून दिसले. हिंदू आणि मुस्लीम या दोन समाजांमधील सद्भावाची वीण किती घट्ट आहे याचे अनेक दाखले या वर्षभरात 'आवाज'वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेख यांमधून पाहायला मिळाले. दोन्ही समाजातील बहुसंख्य लोक एकमेकांच्या सुखदु:खामध्ये अतिशय आत्मीयतेने सहभागी होतात. 'आवाज'वर वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या शेकडो कहाण्या याचीच साक्ष्य देतात. 

महिला सक्षमीकरण, सामाजिक- धार्मिक सुधारणा यांना चालना देणाऱ्या बातम्यांना आणि लेखांना 'आवाज'वर विशेष प्राधान्य देण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपापल्या क्षेत्रांत शिखर गाठणाऱ्या महिलांच्या यशोगाथा असोत की 'इज्तिहाद' सारख्या धार्मिक संकल्पनांचा सामाजिक सुधारणेत विधायक उपयोग करण्याची मागणी करणारे धर्मगुरुंचे सुधारणावादी विचार असोत, 'आवाज'ने या विचारांना अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला.
 
धर्माच्या भिंती ओलांडून अखिल मानवजातीसाठी झटणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्थांची आणि निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची ओळखही ‘आवाज’ने करून दिली. 

एकूणच जनसामान्यांच्या असामान्य कर्तृत्वाला, समाजात खोलवर रुजलेल्या सद्भावाला, धार्मिक सौहार्द जपणाऱ्या सलोख्याच्या  प्रदेशांना ठळकपणे समोर आणण्याचा प्रयत्न या वर्षभरात ‘आवाज मराठी’ने केला. 

गेल्या वर्षभरात ‘आवाज मराठी’च्या या प्रयत्नांना समाजातील सर्वच स्तरांतून दाद मिळाली. 'आवाज'वर प्रसिद्ध झालेल्या लेखांना आणि व्हिडिओजना मोठा प्रतिसाद मिळाला. आज ‘आवाज मराठी’ दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, टीमचे सहकार्य, वाचकांच्या प्रतिक्रिया आणि हितचिंतकांचे सल्ले अशी चौफेर साथ लाभल्यामुळे ‘आवाज मराठी’ला हा वर्षपूर्तीचा प्रवास यशस्वीपणे करता आला. पुढच्या प्रवासातही ‘आवाज मराठी’वरील आपल्या सर्वांचे प्रेम असेच कायम राहो ही सदिच्छा आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा!


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter