MAH FDA: महाराष्ट्रात शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड आणि शीतपेयांच्या विक्रीवर बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
 शालेय परिसराच्या ५० मीटर परिघात जंक फूड आणि उच्च फॅट्स असलेल्या खाद्यपदर्भांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाची बंदी.
शालेय परिसराच्या ५० मीटर परिघात जंक फूड आणि उच्च फॅट्स असलेल्या खाद्यपदर्भांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाची बंदी.

 

मुंबई

लहान मुलांमध्ये आरोग्याची सवय रुजवण्यासाठी आणि पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळांच्या आवारात आणि शाळांच्या आवारापासून ५० मीटरच्या परिघात चरबी, साखर आणि मीठ यांचे प्रमाण जास्त असलेल्या (HFSS) प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज्ड फूड आणि पेयांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बुधवारी ही माहिती दिली.

या आदेशानुसार, राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये हा नियम कठोरपणे लागू केला जाईल. यामुळे राज्यातील सुमारे १ लाख ८ हजार शाळांमधील जवळपास दोन कोटी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शाळांच्या कँटीन, मध्यान्ह भोजन (midday meal) पुरवठादार, वसतिगृह किचेन आणि अन्न पुरवठा करणाऱ्या प्रत्येक चालकाकडे अन्न सुरक्षा नियमांनुसार वैध परवाना आणि नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शाळा आणि मुख्याध्यापकांची जबाबदारी

शाळांचे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक आणि स्थानिक प्रशासनावर या नियमांच्या कठोर अंमलबजावणीची मोठी जबाबदारी असणार आहे. २२ महिन्यांच्या बालकांपासून ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांवर हे नियम लागू होणार असून शाळांच्या परिसरात अशा पदार्थांची जाहिरात किंवा विनामूल्य वाटप करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.