मक्का चार्टर : सनद इस्लामच्या शांततेच्या आणि सहिष्णुतेच्या वारशाची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
मुस्लीम नेते
मुस्लीम नेते

 

डॉ. उझमा खातून

२०१९ मध्ये घोषित झालेली 'मक्का सनद' (Makkah Charter) हा इस्लाममध्ये बदल घडवून आणण्याचा कोणताही नवीन किंवा आधुनिक प्रयत्न नाही. उलट, तो धर्माच्या मूळ संदेशाकडे, म्हणजेच शांतता, समानता आणि सहअस्तित्वाच्या शिकवणीकडे एक प्रभावी पुनरागमन आहे. या मूळ संदेशाची सुरुवात स्वतः प्रेषित मुहम्मद यांच्या काळात झाली होती. आधुनिक मक्का सनदेचे खरे स्वरूप आणि तिचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी, आपल्याला प्रथम प्रेषितांनी मदिना शहरात घालून दिलेल्या आदर्शाकडे पाहावे लागेल.

प्रेषित मुहम्मद ६२२ साली मदिनेला गेले, तेव्हा ते शहर अंतर्गत कलहांमुळे पूर्णपणे विखुरलेले होते. अनेक दशकांपासून विविध जमाती आपापसात लढत होत्या आणि लोकांची निष्ठा फक्त स्वतःच्या वंशापुरती मर्यादित होती. अशा परिस्थितीत, प्रेषितांनी नियंत्रणासाठी बळाचा वापर करण्याऐवजी एक विलक्षण आणि दूरदृष्टीचे राजकीय पाऊल उचलले. त्यांनी एक लिखित संविधान तयार केले, जे आज 'मदिनेचे संविधान' म्हणून ओळखले जाते. 

या ऐतिहासिक करारामुळे मुस्लिम, ज्यू आणि इतर सर्व जमाती एकत्र आल्या आणि एक नवा समाज, म्हणजेच 'उम्मा' (Ummah), उदयास आला. 'आपण एक आहोत,' या पहिल्याच वाक्याने एका नवीन प्रकारच्या समाजाचा पाया घातला, जो समान नागरिकत्व आणि सामूहिक जबाबदारीच्या विचारांवर आधारित होता. मदिनेचे हेच मूळ संविधान होते, ज्याच्या मूल्यांना आधुनिक मक्का सनदेने पुन्हा जिवंत केले आहे.

'उम्मा' हा शब्द कुराणात अनेक वेळा येतो, ज्याचा अर्थ समान विश्वासाने एकत्र आलेला एक समुदाय असा होतो. प्रेषित मुहम्मद यांनी आपल्या शिकवणीतून सुरुवातीच्या मुस्लिमांना एकत्र करून पहिल्या 'उम्मा'चा पाया घातला, परंतु मदिनेच्या संविधानाने या ऐक्याला राजकीय स्वरूप दिले. 

श्रद्धेचे बंधन हे जुन्या कौटुंबिक किंवा वांशिक नात्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, हे या संविधानाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या संविधानाने ज्यू जमातींना संरक्षित हक्क आणि स्वातंत्र्यासह समाजाचे समान सदस्य म्हणून सामील करून घेतले. हा इस्लाम-पूर्व 'असॅबिया'च्या (Asabiyyah) कल्पनेपासून एक मोठा बदल होता, जिथे निष्ठा केवळ स्वतःच्या जमातीशीच ठेवली जायची, ज्यामुळे अनेकदा सूडाचे आणि युद्धाचे न संपणारे चक्र सुरू राहायचे.

मदिना सनदेची तत्त्वे खऱ्या अर्थाने काळाच्या खूप पुढे होती. त्यात धार्मिक स्वातंत्र्याचे स्पष्टपणे संरक्षण केले गेले होते. ज्यू आणि इतर गैर-मुस्लिम जमातींना कोणत्याही दबावाशिवाय त्यांच्या धर्मानुसार उपासना करण्याचा पूर्ण अधिकार होता. या हक्कांसोबतच, सनदेने स्पष्ट जबाबदाऱ्याही निश्चित केल्या. शहरावर बाहेरून हल्ला झाल्यास, सर्व समुदायांनी, मग त्यांचा धर्म कोणताही असो, एकमेकांचे संरक्षण करणे बंधनकारक होते. जॉर्जटाऊन विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. जॉन एल. एस्पोसिटो म्हणतात, "मदिना सनद कदाचित इतिहासातील पहिले लिखित संविधान आहे, जे धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांची हमी देते. याच्या बरोबरीत यायला युरोपला अनेक शतके लागली."

मात्र, 'उम्मा'च्या या एकत्रित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाला पुढे वसाहतवादामुळे प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागले. युरोपीय साम्राज्यांनी मुस्लिम जगाचे तुकडे केले, ज्यामुळे समाजात फूट, परक्यांविषयी भीती आणि वंशवाद वाढला. याच विखुरलेल्या वास्तवाला प्रतिसाद म्हणून 'मक्का सनद' अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

मे २०१९ मध्ये, १३९ देशांतील १२०० हून अधिक मुस्लिम विद्वान आणि नेते मक्का येथे एकत्र आले. त्यांचे ध्येय इस्लामच्या खऱ्या, करुणामय स्वरूपाला अतिरेकी आणि इस्लाम-द्वेषी या दोघांपासून परत मिळवणे हे होते. याचा परिणाम म्हणजे ‘मक्का सनद’ हा ३०-कलमी जाहीरनामा. 

या जाहीरनाम्यातून पाच प्रमुख सुधारणांचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यात मुस्लिम बहुसंख्य देशांमधील धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे, वंशवाद आणि द्वेषपूर्ण भाषणाचा त्याग करणे, गैर-मुस्लिमांसाठी समान नागरिकत्व प्रस्थापित करणे, महिला व तरुणांना नेतृत्वात सक्षम करणे, आणि युद्धाला चिथावणी देणारे फतवे नाकारणे यांचा समावेश आहे.

ही आधुनिक सनद तिची शक्ती कुराण, प्रेषितांचे उदाहरण आणि विद्वानांची सहमती म्हणजेच 'इज्मा' (Ijma) यांसारख्या स्रोतांमधूनच घेते. मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस डॉ. अल-इसा यांच्या शब्दांत, "जी भूमिका प्रेषितांच्या काळात मदिना सनदेची होती, तीच आजच्या काळात मक्का सनदेची आहे."

ही सनद अतिरेकी विचारसरणीला थेट धार्मिक पातळीवर आव्हान देते. ती 'तकफिर' (Takfir) - म्हणजेच इतर मुस्लिमांना काफि‍र घोषित करण्याची धोकादायक प्रथा - स्पष्टपणे नाकारते. याउलट, ती सर्व इस्लामिक परंपरांमध्ये बंधुत्वाची हाक देते. ती सीमारहित खलिफातच्या हिंसक विचारसरणीला नाकारते आणि मुस्लिमांना आपापल्या देशांचे निष्ठावान नागरिक बनण्यास प्रोत्साहित करते.

ही सनद कालातीत इस्लामिक शिकवणींना आजच्या जागतिक आव्हानांशी जोडते. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन हे कुराणमधील माणूस पृथ्वीचा 'खलिफा' (संरक्षक) असल्याच्या कल्पनेवर आधारित आहे. तिचे मानवाधिकार, सन्मान आणि समानतेचे समर्थन इस्लामिक कायद्याच्या उच्च उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळते. 

अर्थात, या सनदेचे यश तिच्या प्रामाणिक अंमलबजावणीवर अवलंबून आहे. नायजेरिया आणि इंडोनेशियासारख्या राष्ट्रांनी तिचे विचार त्यांच्या आंतर-धर्मीय शांतता कार्यक्रमांमध्ये आणि शालेय अभ्यासक्रमांमध्ये स्वीकारण्यास सुरुवात केली आहे, जे तिची सलोखा निर्माण करण्याची क्षमता दर्शवते.

'मक्का सनद' ही इस्लामच्या मूळ वचनाचे नूतनीकरण आहे. ती मुस्लिमांना त्या दयाळू आणि सहकारी इस्लामचा पुन्हा शोध घेण्यास प्रोत्साहन देते. कारण या विचाराने एकेकाळी जगाला समान नैतिक मूल्यांबाबत  एकात्मिक भूमिका दिली होती. इस्लामची खरी ताकद सत्तेत नाही, तर दयेत आहे; वर्चस्वात नाही, तर न्यायात आहे; आणि अलिप्ततेत नाही, तर सहकार्यात आहे, हाच संदेश या ‘मक्का सनद’मधून अधोरेखित झाला आहे.

(लेखिकेने अलिगढ मुस्लीम विद्यापीठात अध्यापन केले आहे)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter