MARATHA RESERVATION: हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील

 

मुंबई

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारे ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत येत्या २९ ऑगस्टपासून "शेवटचे आणि निर्णायक आंदोलन" छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यभरात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंतरवाली सराटी येथे समर्थकांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला २९ ऑगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारने ५८ लाख कुणबी नोंदी शोधूनही अद्याप प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. २८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे न मिळाल्यास २९ ऑगस्टपासून अंतिम लढा सुरू केला जाईल, असे सांगत त्यांनी मराठा बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, सारथीच्या योजना पूर्ववत सुरू करणे आणि स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करणे यांसारख्या मागण्या त्यांनी पुन्हा एकदा रेटून धरल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि शासनाची भूमिका

मनोज जरांगे यांच्या घोषणेन्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महायुती सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली असून प्रलंबित प्रकरणांची संख्या फार कमी आहे. जर काही अडचणी किंवा प्रलंबित प्रश्न असतील, तर सरकार चर्चेद्वारे त्यावर निश्चित मार्ग काढण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.