Story by आवाज़ मराठी | Published by Pooja Nayak • 13 d ago
मेहबुबा मुफ्ती पूंच येथील नवग्रह मंदिरात
श्रीनगर: पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पूंच येथील नवग्रह मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक केला.या जलाभिषेकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी मंदिराचे संस्थापक आणि पीडीपीचे नेते दिवंगत यशपाल शर्मा यांच्या प्रतिमेवर फुलही वाहिले. दरम्यान, भाजपने मेहबुबा यांच्या मंदिर भेटीवर टीका केली. मेहबुबा यांची नौटंकी असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
चौदा मार्च रोजी मेहबुबा मुफ्ती या पूंच येथील नवग्रह मंदिरात गेल्या होत्या. तेथे त्यांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला. त्या म्हणाल्या, की मंदिराची उभारणी पीडीपीचे बडे नेते यशपाल शर्मा यांनी केली. त्यांच्या मुलाला वाटत होते, की मंदिरात यावे. त्यामुळे आपण मंदिरात गेलो. तेथे मला कोणीतरी पाण्याने भरलेले भांडे दिले. ते परत दिले असते तर चुकीचे ठरले असते. त्यामुळे आपण शिवलिंगावर जलाभिषेक केला आणि प्रार्थना केली. यापूर्वी मेहबुबा मुफ्ती या २०१७ मध्ये गंदरबल येथील क्षीर भवानी मंदिरात देखील गेल्या होत्या. त्यावेळी त्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री होत्या. दरम्यान, जम्मू काश्मीरचे भाजपचे प्रवक्ते रणबीर सिंह पठाणिया यांनी मंदिर भेटीवर टीका केली. ते म्हणाले की २००८ रोजी मेहबुबा आणि त्यांच्या पक्षाने अमरनाथ धामसाठी जमीन देण्यास नकार दिला होता. या जमिनीवर भाविकांसाठी धर्मशाळा उभी करायची होती. आता मंदिराला भेट देणे ही निव्वळ नौटंकी आहे. या पूजेतून त्यांच्या हाती काहीच पडणार नाही. राजकीय नौटंकीतून मिळाले असते तर जम्मू आणि काश्मीर हे समृद्धीचे नंदनवन बनले असते.दुसरीकडे देवबंदचे मौलाना असद कासमी यांनी मेहबुबा यांच्या मंदिर भेटीला आणि शिवलिंगावर जलाभिषेक करण्याला विरोध केला. कासमी म्हणाले, की मेहबुबा यांनी जे काही केले ते चुकीचे आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्या भेटीवर उदेश पाल शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की मेहबुबा यांनी मंदिराला भेट देऊन प्रार्थना आणि जलाभिषेक केल्याने आनंद वाटला. नोव्हेंबर २०१७ रोजी या मंदिराचे बांधकाम माझ्या वडिलांच्या दिवंगत यशपाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते. या मंदिर उभारणी पूंचमधील प्रत्येक नागरिकांचे योगदान राहिले आहे..