ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील एका हाऊसिंग सोसायटीत बकरीदनिमित्त बकऱ्या बांधण्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. या वादानंतर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. महानगरपालिकेच्या मदतीने सोसायटीतून ५१ बकऱ्या बाहेर काढण्यात आल्या असून, परिसरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोसायटीतील नेमका वाद काय?
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील पूनम क्लस्टर परिसरातील 'सृष्टी कॉम्प्लेक्स'मध्ये रविवारी हा वाद सुरू झाला. सोसायटीच्या आवारात बकऱ्यांसाठी तात्पुरता निवारा उभारण्यात आला होता, ज्याला काही रहिवासी आणि हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला.
या विरोधानंतर हा तात्पुरता निवारा हटवण्यात आला, मात्र सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा तणाव निर्माण झाला. काही रहिवाशांनी सोसायटीच्या गेटवर जमून घोषणाबाजी केली, हनुमान चालिसाचे पठण केले आणि डुकराला आत आणण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान झालेल्या झटापटीत एका विहिप कार्यकर्त्यासह तिघे ब्लेडच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
पोलिसांची कारवाई आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया
परिस्थिती चिघळू नये म्हणून काशीमिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त ठेवला. मंगळवारी रात्री महानगरपालिकेच्या चार वाहनांतून ५१ बकऱ्या सोसायटीच्या बाहेर नेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "लोक ठरवून दिलेल्या ठिकाणी धार्मिक विधी करू शकतात, मात्र हाऊसिंग सोसायटीत उघड्यावर बकऱ्या कापणे खपवून घेतले जाणार नाही." दुसरीकडे, स्थानिक शिवसेना आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. "येथे सर्व समुदायाचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. सणांच्या वेळी बाहेरचे लोक येऊन येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात," असे सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.