पारशी अंत्यविधीचे आक्षेपार्ह कॉमेंट्रीसह चित्रीकरण; मुंबई पोलिसांकडून युट्युबरवर गुन्हा दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मुंबईतील टाॅवर ऑफ सायलेन्स
मुंबईतील टाॅवर ऑफ सायलेन्स

 

दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरामध्ये असलेल्या पारशी समाजाच्या पवित्र टाॅवर ऑफ सायलेन्स परिसरात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून अंत्यसंस्काराचे चित्रीकरण करणाऱ्या एका सोशल मीडिया कंटेट क्रिएटरविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पारशी अंत्यविधीचे चित्रीकरण करून त्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत कॉमेंट्री केल्याचा आरोप या युट्युबरवर करण्यात आला आहे. या कृत्यामुळे संपूर्ण पारशी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

खाजगी आणि प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश
हा संपूर्ण प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा बॉम्बे पारशी पंचायत (BPP) च्या एका विश्वस्तांना त्यांच्या मित्राकडून इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओची लिंक मिळाली. हा व्हिडिओ मलबार हिल येथील डूंगरवाडी परिसरातील टाॅवर ऑफ सायलेन्स येथे चित्रित करण्यात आला होता. 

बॉम्बे पारशी पंचायतीच्या विश्वस्तांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी प्रिन्स शितलाप्रसाद कनोजिया याने कमला नेहरू पार्कच्या बाजूने पारशी पंचायतीच्या खाजगी आणि अत्यंत प्रतिबंधित असलेल्या डूंगरवाडी परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तेथे परवानगीशिवाय पारशी समाजाच्या अंत्यसंस्कार विधींचे गुपचूप चित्रीकरण करण्यात आले.

आक्षेपार्ह कॉमेंट्रीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, या इन्फ्लुएन्सरने केवळ चित्रीकरणच केले नाही, तर त्या व्हिडिओसोबत अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीची कॉमेंट्री जोडली. यामुळे पारशी समुदायाच्या पवित्र धार्मिक परंपरांचा अपमान झाला असून मृत व्यक्तींच्या प्रतिष्ठेला आणि आदराला ठेच पोहोचली आहे. आरोपी प्रिन्स कनोजिया हा यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे चॅनेल्स चालवतो.

पारशी पंचायतीच्या तक्रारीची दखल घेत मलबार हिल पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला देखील तपासात सामील करून घेण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संबंधित वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्हिडिओ तातडीने हटवण्यासाठी सायबर पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.