शेकडो मुस्लिम करणार अवयवदानाचा संकल्प

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 13 d ago
वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रिलिजन अँड नॉलेज
वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रिलिजन अँड नॉलेज

 

अवयव हे श्रेष्ठदान आहे, आज हा केवळ मौखिक प्रचाराचा भाग असला तरी प्रत्यक्षात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रिलिजन अँड नॉलेज (WORK) या स्वयंसेवी संस्थेने अवयवदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक उपक्रमाची घोषणा केली आहे. 

समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. अंधश्रध्दा, अपुरी माहिती अशा अनेक कारणांमुळे अवयवदानाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. अवयवदानाविषयीची ही उदासीनता सर्वधर्मीयांमध्ये दिसते. हीच बाब लक्षात घेऊन WORK या संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातून पुढाकार घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संस्थेच्या ३७व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पसच्या असेम्बली हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी WORK चे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अवैस अन्सारी, कार्यकारी सदस्य शहानवाज पठाण, कार्यकारी सदस्य अनवर अहमद, पुणे जिल्हा समितीच्या प्रमुख सलमा पठाण, महाराष्ट्र राज्य महिला समितीच्या प्रमुख फौझिया इरफान, इंकलाब जयतेचे विक्रांत सिंग हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. 

वर्धापनदिनानिमित्त समाजासाठी असामान्य योगदान 
भारतातील अवयवदानाची सद्यस्तिथी पहिली तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. दहा लाखांमध्ये फक्त एकच व्यक्ती अवयवदान करत आहे.  त्यामुळे गरजूंना अवयवदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या प्रतीक्षेत अनेकांचा मृत्यूही होतो. मग अशा गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी WORKच्या माध्यमातून तब्बल ४०० हून अधिक जण मृत्यूपश्च्यात अवयवदानाचा संकल्प संस्थेच्या स्थापनादिनी करणार आहेत. त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तताही यावेळी करण्यात येणार आहे.  

WORK चे महाराष्ट्र राज्य प्रमुख अवैस अन्सारी यावेळी म्हणाले, “या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अवयवदानाचा संकल्प करणाऱ्यांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण लक्षणीय आहे. WORK संस्थेने अवयव दानाबाबत मुस्लिम समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा आणि त्याविषयी जनजागृतीचे मोठे कार्य हाती घेतले आहे. त्यासाठीच आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.”
      
WORK चे कार्यकारी सदस्य अनवर अहमद म्हणाले, “या अवयवदानाच्या चळवळीतून अवयवाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण व अवयव दाते यांच्यातील दरी कमी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गात अवयवदानाबाबत असलेले अज्ञान, अनास्था आणि गैरसमज दूर करून मानवी जीवनाला एक नवसंजीवनी देण्याचा संस्थेचा दृढ संकल्प आहे. यावेळी समाज आणि मानवतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ३६ हून अधिक स्वयंसेवी संस्थांचा सम्मानही करण्यात येणार आहे.”

जाणून घेऊ संस्थेविषयी...
वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रिलिजन अँड नॉलेज (WORK) ही स्वयंसेवी संस्था १९८८ मध्ये स्थापन झाली. स्थापनेपासूनच ही संस्था करुणा आणि सेवेचा दीपस्तंभ ठरली आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे, WORK अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रम राबवत आहे. संस्थेचे आजवरचे सर्वच उपक्रम धर्म आणि जात यांच्या पलिकडे जाणारे आणि मानवतेचा उद्घोष करणारे राहिले आहेत. 

WORK चे हे समाजोपयोगी उपक्रम तब्बल आठ देशांमध्ये राबवले जातात. भारतातील सुमारे २०० हून अधिक जिल्ह्यांमधून WORKचे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमुळे समाजात सकरात्मक बदल घडवणे हाच या संस्थेचा महत्वाचा उद्देश आहे.