‘‘भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचे कोणतेही नुकसान नाही त्यामुळे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, त्यांनी वर्चस्ववादी मानसिकतेचे विचार सोडायला हवे. सत्य हे आहे की हे हिंदुस्थान हिंदुस्थानच राहिले पाहिजे,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
आयोजक आणि पांचजन्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, ‘‘आम्ही महान आहोत. एकेकाळी आम्ही या देशावर राज्य केले होते. आता पुन्हा आम्ही राज्य करणार. फक्त आपलाच मार्ग योग्य आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. आम्ही वेगळे आहोत, म्हणून आम्ही असेच राहणार. आम्ही एकत्र राहू शकत नाही, मुस्लिमांनी असे विचार सोडून द्यायला हवे. खरे तर इथे राहणाऱ्या सर्वांनी मग ते हिंदू असो किवा कम्युनिस्ट, हा वाद सोडून द्यायला हवा.’’
याचबरोबर एलजीबीटी समुदायाच्या समर्थनार्थ बोलताना ते म्हणाले की, ‘‘एलजीबीटी समुदायाचे एक स्वतंत्र स्थान असले पाहिजे. संघाने या दृष्टिकोनाला चालना द्यायला हवी.’’ ते पुढे म्हणाले कि, ‘‘अशा प्रकारची लोक मानव अस्तित्वात आहे तोपर्यंत असणारच आहेत. ते सुद्धा समाजाचाच एक भाग आहेत, असे त्यांना वाटायला हवे. हे काम फार सोपे नाही. आपल्याला या दृष्टिकोनाचा प्रचार करावा लागेल. अन्यथा, त्याचे निराकरण करण्याचे इतर सर्व मार्ग व्यर्थ ठरतील.’’
भागवत म्हणाले की, ‘‘जगभरातील हिंदूंमध्ये समाजातील प्रबोधनामुळे आक्रमकता आहे. हिंदू समाज १,००० वर्षांहून अधिक काळापासून युद्धात आहे. परकीय आक्रमणे, परकीय प्रभाव आणि परकीय कारस्थानांविरुद्ध हा लढा सुरूच आहे. संघाने या कार्याला पाठिंबा दिल्यामुळे इतरांचाही पाठींबा मिळाला आहे. त्यामुळेच हिंदू समाज जागृत झाला आहे.’’ ते पुढे म्हणाले की, ‘‘युद्धात सहभागी असलेले लोकं आक्रमक होणे स्वाभाविक आहे. इतिहासाच्या सुरुवातीच्या काळापासून भारत अविभाजित (अखंड) आहे, परंतु जेव्हा जेव्हा मूळ हिंदू भावनेचा विसर पडला, तेव्हा ते विभागले गेले. हिंदू ही आपली ओळख आहे, आपले राष्ट्रीयत्व आहे, आपल्या सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे. जे प्रत्येकाला आपले मानते, सर्वांना सोबत घेऊन जाते. माझे खरे आणि तुझे खोटे असे आपण कधीच म्हणत नाही. तू तुझ्या जागी बरोबर आहेस, मी माझ्या जागी बरोबर आहे. आपापसात का लढायचे, एकत्र पुढे जाऊ, हे विचार म्हणजे हिंदुत्व आहे.’’
एक सांस्कृतिक संघटना असूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय मुद्द्यांशी संबंध असल्याबद्दल ते म्हणाले, ‘‘संघाने जाणीवपूर्वक स्वतः ला दैनंदिन राजकारणापासून दूर ठेवले आहे, परंतु नेहमीच आपल्या राष्ट्रीय धोरणांशी, राष्ट्रीय हिताशी सुसंगत असलेल्या राजकारणात स्वतः ला गुंतवले आहे. फरक एवढाच आहे की, पूर्वी आमचे स्वयंसेवक राजकीय सत्तेच्या पदावर नव्हते. सध्याच्या स्थितीत ही एकमेव भर आहे. पण, राजकीय पक्षाच्या माध्यमातून काही राजकीय पदांवर पोहोचलेले स्वयंसेवकच आहेत, हे लोक विसरतात.’’
‘‘संघ समाजाचे संघटन करत राहतो. मात्र, राजकारणात स्वयंसेवक जे काही करतात, त्यासाठी संघाला जबाबदार धरले जाते. जरी आमचा इतरांशी थेट संबंध नसला तरी काही जबाबदारी नक्कीच आहे. कारण शेवटी संघामध्येच स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. आपले नाते कसे असावे, कोणत्या गोष्टी आपण (राष्ट्रहिताच्या दृष्टीने) पूर्ण समर्पणाने कराव्यात याचा विचार करायला भाग पाडले जाते.’’
‘‘याआधी संघाकडे तुच्छतेने पाहिले जात होते, पण आता ते दिवस संपले आहेत. याआधी त्यांना रस्त्यात ज्या काट्यांचा सामना करावा लागला त्यामुळे त्यांचे चरित्र बदलले आहे,’’ याची आठवण भागवत यांनी करून दिली. ‘‘पूर्वी विरोध आणि हेटाळणीच्या काट्यांचा सामना करावा लागला होता. जे आपण टाळू शकलो असतो आणि अनेकवेळा आपण त्यांना टाळलेही आहे. पण, नव्याने मिळालेल्या स्वीकृतीने आम्हाला संसाधने, सुविधा आणि विपुलता दिली आहे.’’ ते म्हणाले की, ‘‘नवीन परिस्थितीत लोकप्रियता आणि संसाधने हा संघाचा काटा बनला आहे. आज जर आपल्याकडे साधने आणि संसाधने असतील तर त्यांना आपल्या कामासाठी आवश्यक साधनांपेक्षा जास्त म्हणून पाहिले जाऊ नये. आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यांचे व्यसन करू नये. अडचणींना तोंड देण्याची आपली जुनी सवय कधीही सोडू नये. काळ अनुकूल आहे, पण गर्व करू नये.’’